computer

रंगावरून हिणवले गेलेले पण सर्वांवर मात करून यशस्वी झालेले १० प्रसिद्ध लोक..

कितीही म्हटलं तरी जगात रंग,रुप, राहाणीमान याला महत्त्व देणारे खूप सापडतात. बरं, हे विचार ते फक्त मनात ठेवत नाहीत, तर बरेचदा उघडपणे बोलून दाखवतात, त्यावरून भेदभावही करतातच. या गोष्टीला खतपाणी घालण्यात कुठलीच कसर सिनेमा, नाटक, सिरीयली सोडत नाहीत. इंग्रजीतली अग्ली बेट्टी, हिंदीतली जस्सी आणि मराठीतली 'रंग माझा वेगळा'.. सगळीकडे तीच कथा आहे.

गाणी, सिनेमातले डायलॉग, जाहिराती यावरून गोरेच असायला हवे अन्यथा काय खरे नाही हेच ठसवले जाते. आताच्या रिल्स, इन्स्टाग्राम आणि युट्युब पिढीतील एक सेलेब्रिटी कॅरीमिनाटी एका व्हिडिओत सावळ्या आणि लठ्ठ लोकांना ट्रोल करणे कसे योग्य आहे हे सांगताना दिसला होता आणि त्याला या गोष्टीसाठी समर्थन पण मोठे मिळाले होते.

आज आयडॉल म्हणून ओळखले जातात अशा अनेक लोकांना त्यांच्या रंगावरून हिणवले गेल्याची आणि कामे नाकारली गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण हे लोक खचले नाहीत आणि आपल्या कामातून स्वतःला सिद्ध करत आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. अशाच काही लोकांची गोष्ट आज आपण वाचणार आहोत.

१) शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीला बॉलिवूडमध्ये प्रवेश व्हावा यासाठी जर कुठली अडचण आली असेल तर ती तिच्या सावळ्या रंगाची. या सगळ्याला पार करून बॉलिवूडमध्ये जम बसवून देखील २००८ साली अमेरिकन शो बिग ब्रदरमध्ये तिला रंगावरून शेरेबाजी ऐकावी लागली होती. जेड गुडीने केलेल्या शेरेबाजीने मोठे वादळ तेव्हा उठले होते. शेवटी शो बंद पडण्यासाठी ही घटना कारणीभूत ठरली होती. शिल्पा शहाणी ठरली, तिला पुढे याचा फायदाच झाला.

२) प्रियांका चोप्रा

परदेशात शिकत असताना प्रियांका चोप्राला तिच्या रंगावरून चिडवण्याच्या अनेक घडना घडल्या आहेत. एका मुलाखतीत या विषयावर ती भरभरून बोलली होती. हाच त्रास तिला बॉलिवूड प्रवेशावेळी पण झाला होता. एकदा तिची मॅनेजर एका सिनेमासाठी बोलणी करत असताना प्रियंका शारीरिक दृष्ट्या योग्य नाही असा निरोप देण्यात आला. जेव्हा शारीरिकदृष्ट्या योग्य याचा अर्थ गोरा रंग असायला हवा हे समजले तेव्हा त्या मॅनेजरला रडू कोसळले होते. या सगळ्या गोष्टींना पार करत ती बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्ही ठिकाणी यशस्वी झाली आणि ज्या अमेरिकेत तिला रंगावरून टोमणे बसले त्याच अमेरिकन नवऱ्यासोबत सेलेब्रिटी म्हणून वावरत असते.

३) नवाझुद्दीन सिद्दीकी

बॉलिवूडमध्ये यशस्वी व्हायचे तर चांगला रंग, चांगला चेहरा, सिक्स पॅक्स लागतात याला छेद देत स्वतःचे नाणे खणखणीत वाजवणारा हा पठ्ठ्या. नवाजला रंगावरून त्रास झाला म्हणून त्याचा बॉलिवूड प्रवेश लांबत गेला. एकदा तर ऋषी कपूरने त्याला त्याच्या रंगावरून त्याला तू कसा यशस्वी होऊ शकणार नाही असे सांगितले होते. एवढेच नव्हेतर कास्टिंग डायरेक्टर संजय चौहान याने नवाजला गोऱ्या अभिनेते/ अभिनेत्रींसोबत काम देता येणार नाही कारण तो त्यांच्यासोबत शोभणार नाही असे जाहीररीत्या म्हटले होते. पण या सर्वाला मात देत फक्त अभिनयाच्या जोरावर आज तो यशस्वी ठरला आहे. युट्यूबवर नवाजचा एक भन्नाट व्हिडिओ आहे यात तो सावळ्या रंगाबद्दल तिटकारा असलेल्या लोकांची तुफान फिरकी घेतो.

४) स्मिता पाटील

अल्पायुष्य आणि बॉलिवूडमधील मोजके सिनेमे तरीही लेजेंड ठरलेली स्मिता पाटील. आजही स्मिता पाटीलचे सिनेमे आवडीने बघितले जातात. तिच्या अभिनयाची मनसोक्त स्तुती होते. पण एकेकाळी तिलाही रंगावरून त्रास सहन करावा लागला होता. पण कृत्रिमरित्या गोरे दिसणे हे स्मिता पाटीलला मान्य नव्हते. तिने तशी कधीही तडजोड केली नाही. याविषयी महेश भट्टने एका मुलाखतीत सांगितले होते. स्मिता पाटीलला देखील या गोष्टी सहन कराव्या लागल्या होत्या. पण ती कणखर होती.

५) बिपाशा बासू

सध्या करनसिंग ग्रोव्हर सोबत सुखी संसार करत असलेली बिपाशा बासू एकवेळ बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री होती. अजनबी हा तिचा सुरुवातीच्या काळात गाजलेला सिनेमा. यात अक्षय कुमार, बॉबी देओल आणि करीना कपूर यांच्यासोबत तिने काम केले होते. यात सिनेमाच्या शूटवेळी करीना आणि बिपाशा यांच्यात भांडण झाले. भांडण होणे काही मोठी गोष्ट नाही, पण या भांडणात करीनाने बिपाशाला 'काळी मांजर' म्हटले होते. साहजिक या गोष्टीचा परिणाम बिपाशाच्या मनावर झाला होता.

६) मनोज वाजपेयी

एका सामान्य घरातून येऊन बॉलिवूडमधील दिग्गज ठरलेला मनोज वाजपेयी अनेकांचा आयडॉल आहे. भिकू म्हात्रे असो की आताचा फॅमिली मॅन मधील त्याचा रोल. तो सिनेमात असला म्हणजे तोच भाव खाऊन जाणार हे निश्चित असते. २००१ साली जेव्हा त्याचा पुरेसा जम बॉलिवूडमध्ये बसला नव्हता. तेव्हा झुबेदा नावाचा शाम बेनेगलचा सिनेमा आला होता. यात मनोज एका राजपूतच्या भूमिकेत होता. या भूमिकेसाठी खुद्द शाम बेनेगलच्या नजरेत मनोज वाजपेयी होता. तरीही हा कुठल्या अंगाने राजपूत दिसतो? अशा प्रकारची शेरेबाजी त्याला त्यावेळी ऐकावी लागली होती.

७) फ्रिडा पिंटो

स्लॅमडॉग मिलेनियर या ऑस्कर विजेत्या सिनेमातून सिनेमजगताचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री फ्रेडा पिंटो सध्या हॉलिवूडमध्ये काम करते. तिचे अनेक सिनेमे गेल्या काही वर्षांत येऊन गेले. पण तिच्या मॉडेलिंग दिवसात तिला रंगामुळे मोठा संघर्ष करावा लागला होता. एका ऑडीशनमध्ये क्रीम लावली नाही म्हणून तिच्याकडे कोणी बघायला तयार नव्हते. ती अधूनमधून बॉलिवूडची गोऱ्या रंगाबद्दल असलेली हौस किती चुकीची हे यावर बोलताना दिसते.

८) रिहाना

रंगावरून हिनवण्याचे प्रकरण भारतातच आहे असे नाही, तर पाश्चात्य जगतात तर ते अधिकच जास्त आहे. उलट भारतात तिकडून आले आहे असे म्हणता येईल. तेथील गोरे विरुद्ध काळे हाच सर्वात मोठा मुद्दा आहे. याचा फटका तिथे प्रत्येक काळ्या व्यक्तीला बसतो. यापासून सेलेब्रिटीही सुटत नाहीत. रिहानाच्या रंगावरून एका मोठया मॅगझीनने अशीच शेरेबाजी केली होती. पण तिने हे प्रकरण सहज घेतले नाही. मॅगझीनचा संपादक हाकलला जाईपर्यंत तिने हे प्रकरण तडीस नेले होते.

९) ऑफ्रा विन्फ्रे

ऑफ्रा विन्फ्रे ही फक्त स्वताच्या मेहनतीच्या आणि अभ्यासाच्या जीवावर मोठी झालेली सेलेब्रिटी आहे. तिच्याबद्दल जगभर आदर बघायला मिळतो मात्र तीही या सर्व गोष्टींपासून सुटू शकलेली नाही. एकदा स्वित्झर्लंडला शॉपिंग करण्यासाठी गेली असताना तिला दुकानदाराने बॅग दाखवण्यास नकार दिला. 'तू इतकी महाग बॅग घेऊ शकत नाही' असा तो टोमणा होता.

१०) किम कार्देशियन आणि कान्ये वेस्ट

हॉलिवूडमधील किम कार्देशियन आणि कान्ये वेस्ट हे दाम्पत्य आता वेगळे झाले असले तरी दोघेही यशाच्या शिखरावर आहेत. पण ते देखील रंगावरून केल्या जाणाऱ्या अन्यायाचे शिकार झाले आहेत. एकदा तर एका १८ वर्षांच्या मुलाने त्यांना ओरडून रंगावरून चिडवले होते.

हे झाली मोजकी उदाहरणे. अशी उदाहरणे कुठेही गेले ढिगाने सापडतील. पण हे लोक अशा सर्व गोष्टींवर मात देत पुढे जात आहेत हे महत्वाचे आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required