computer

बर्फाच्छादित ज्वालामुखीचं तितकंच बर्फाच्छादित आणि अतिदूर अंतरावरचं बेट-बुवे!! जाणून घ्या याचं आणखी वेगळेपण काय आहे ते!!

आज माणूस मंगळावर, चंद्रावर, जाण्याचा आणि तिथे मानवी अस्तित्व असेल का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण माणसाला सगळी पृथ्वी आधी नीट कळली आहे का? पृथ्वीवरच अशा किती तरी जागा असतील जिथे माणूस अजून पोहोचू शकला नाही. आपला प्रदेश, आपला देश सोडून इतर देशात जाण्यासाठी माणूस जेव्हा समुद्रीसफर करू लागला तेव्हा एका एका प्रदेशाचा, देशाचा, खंडाचा शोध लागत गेला. अशाच एका समुद्र सफरीत १७३९ साली एका फ्रेंच कमांडरला एका संपूर्ण दूरस्थ बेटाचा शोध लागला. याला दूरस्थ यासाठी म्हणायचं कारण, या समुद्रातून सहसा कुणी प्रवास करत नाही. अगदी आजच्या काळातही समुद्र प्रवासासाठी या मार्गाचा वापर केला जात नाही. आज आपण अशा दूरस्थ समजल्या जाणाऱ्या बुवे बेटाविषयीची रंजक माहिती जाणून घेणार आहोत.

बुवे, एकदम नवं, कधी न ऐकलेलं आणि विचित्र नाव वाटतं ना? तर वाचकहो, जगात अशी कितीतरी बेटे आहेत जिथे मानवी वस्ती नाही, बुवे बेटही याला अपवाद नाहीच. असे असले तरी बुवे बेटाची एकदम वेगळी खासियत म्हणजे हे बेट चोहोबाजूंनी बर्फाने म्हणजेच हिमनद्यांनी वेढलेले आहे. या बेटाचा संपूर्ण भाग बर्फानेच आच्छादलेला आहे. यातील फक्त ४९ चौरस किमी क्षेत्रफळाची जागा सोडली तर सगळीकडे बर्फच बर्फ आहे. कहर म्हणजे बर्फाने आच्छादलेल्या या बेटावर एक ज्वालामुखीसुद्धा आहे आणि तोही बर्फाने आच्छादलेलाच आहे

दक्षिण आफ्रिका आणि अंटार्टिका यांच्यामध्ये कुठेतरी असणाऱ्या या बेटाचा पहिला शोध लावला तो फ्रेंच कमांडर चार्ल्स बुवे याने. त्याने या बेटाला आपल्या नावावरून बुवे असे नाव दिले. पण नंतर गंमत म्हणजे त्याला हे बेटाकडे येण्याचा रस्ताच सापडेना. त्यांतर पुन्हा १८०८ साली जेम्स लिंडसेला या बेटाचा शोध लागला आणि त्याने या बेटाला लिंडसे आईसलँड असे नाव दिले. त्यानंतर १८२५ साली कॅप्टन नॉरिस यांना पुन्हा एकदा या बेटाचा शोध लागला आणि त्यांनी याला लिव्हरपूल आईसलँड असे नाव दिले आणि हे बेट ब्रिटिश राजसत्तेच्या अखत्यारीत येत असल्याचे घोषितदेखील केले.

अर्थात त्यांनी दावा केला असला तरी इतर कुणी तो मान्य केला नव्हता. म्हणून १ डिसेंबर १९२७ साली जेव्हा नॉर्वेने आपली माणसे त्या बेटावर पाठवली आणि तिथे आपला झेंडा रोवूनच ते परत आले. यावर ब्रिटनने काही काळ आपत्ती दर्शवली. परंतु नंतर त्यांनीही ते बेट नॉर्वेच्या मालकीचे असल्याचे मान्य केले. तसेही इतक्या दूरवर आणि बर्फाळ बेटावर हक्क सांगून ब्रिटनला काय मिळणार होते? तसे हे बेट नॉर्वेपेक्षा ब्रिटनलाच जवळ आहे म्हणावे इतके या दोन देशांत अंतर आहे. असो, नॉर्वेने याला याच्या मूळ संशोधकाचे नाव देत पुन्हा एकदा बुवे बेट असे नामकरण केले आणि तेव्हापासून हेच नाव रूढ झाले.

बुवे बेटावरील वातावरण हे मानवी वस्तीसाठी अनुकूल नसले तरी, तिथले जैविक पर्यावरण खूपच समृद्ध आहे. याठिकाणी मॅक्रोनी पेंग्विन, चीनस्ट्रॅप पेंग्विन नावाच्या पेंग्विनच्या वैशिष्ट्यपूर्ण जाती आढळून येतात ज्या इतरत्र कुठेच आढळत नाही. याशिवाय स्नो पेट्रील्स, ब्लॅक-ब्रोड अल्बट्रॉस आणि अंटार्टिक प्रीन्स अशा पक्ष्यांच्या अनेक जाती इथे आढळतात. चोहोबाजूंनी समुद्र असल्याने इथे ओर्केस व्हेल्स आणि हंपबॅक व्हेल्स या व्हेल्स्च्या दुर्मिळ प्रजातीही इथेच आढळतात. अशा समृद्ध जैव-विविधतेमुळे वन्यजीव, जलचर आणि पक्षी अभ्यासकांसाठी हे बेट म्हणजे एक दुर्मिळ खजिनाच आहे.
असे असले तरी या बेटाला भेट देणे तितके सोपे नाही. चहुबाजूंनी बर्फाच्या टोकदार कडा असल्याने इथे बोटीने जाता येत नाही. इथे जाण्यासाठी बोटीने बेटापर्यंत जाऊन नंतर बोटीवरून छोट्या हेलीकॉप्टरच्या सहाय्याने बेटावरील बर्फाळ जागेत सावकाशीने उतरावे लागते. इथले वातावरण मानवणारे नसल्याने फार कुणी इथवर जाण्याचा प्रयत्न करत नाही. १९७१ साली हे बेट आणि याच्या आजूबाजूचा समुद्री भाग हा निसर्ग संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

तीन वेगवेगळ्या देशाच्या लोकांनी वेगवेगळ्या काळात याचा शोध लावला, याला तीन वेगवेगळी नावे देण्यात आली, तसेच या बेटाबद्दल गूढ वाढवणाऱ्या दोन घटना घडल्या आहेत.

१९६४ साली या बेटावर एक बोट आढळली होती, पण ती बोट कुणाची होती, तिथे या बोटीने कोणते लोक आले होते, ही बोट तिथे कधी आणि कशी पोहोचली हे प्रश्न मात्र आजही अनुत्तरीतच आहेत.

१९७९ साली अमेरिकेच्या व्हेला उपग्रहाला या बेटावर एक प्रखर प्रकाश दिसला होता. हा प्रकाश कशाचा होता हेही अजून एक गूढच आहे. काहीजण म्हणतात की दक्षिण आफ्रिका आणि इस्राईलने याठिकाणी संयुक्तरित्या अणुचाचणी केली होती त्या स्फोटातून निर्माण झालेला हा प्रकाश असावा. पण या दोन्ही देशांनी मात्र याबाबत काहीच खुलासा केलेला नाही.

तर असे हे जगातील सर्वात दूरस्थ बेट त्रिस्दा-दा-कुन्हा या अशाच दूरस्थ असलेल्या बेटापासून १,४०४ मैल अंतरावर आहे. आजपर्यंत त्रिस्ता-दा-कुन्हा हेच एक दूरस्थ बेट असल्याचे समजले जात होते. पण आता त्याहून दीड-हजार मैल अंतरावरही एक बेट असल्याचे लोकांना आताआता माहित होत आहे. अर्थात त्रित्सा-दा-कुन्हा बेटावर फक्त २७१ लोकांची का असेना, पण मानवी वस्ती आहे. बुवे बेटावर मानवी वस्ती नाही, इतकेच.

सर्वात दूर आणि दुर्गम अशा या बेटाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required