computer

वंचित मुलांसाठी शाळा चालू करणारा पोलिस.. शाळा, पुस्तके, बेघरांना मदत.. ते आणखी काय काय करतात हे ही जाणून घ्या..

पोलिसांचे काम हे आपल्या आयुष्यात येणाऱ्या विविध संकटांत आपल्याला मदत करण्याचे असते. पोलीस विविध आघाड्यांवर करत असलेल्या प्रामाणिक कामांमुळे आपण आपली रात्रीची झोप निवांत घेऊ शकतो. समाजात असेही काही पोलीस आहेत, जे त्यांच्या कर्तव्याचा भाग नसलेल्या गोष्टींमध्ये देखील मदतीला धावून येत असतात. माणुसकीचा झरा आपण जो म्हणतो तो अनेक कर्मचाऱ्यांच्या वागण्यातून मोठ्या प्रमाणावर दिसून येतो, याबद्दलच्या गोष्टी आपण अधूनमधून वाचतही असतो.

उत्तर प्रदेशात एका पोलिसाचे सुरू असलेले काम बघितले तर आपलाही या गोष्टीवरील विश्वास भक्कम होईल. अयोध्या येथील रणजित यादव हे पीएसआय म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या नेहमीच्या कामांमधून लोकांची मदत करत, त्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत करत. हे काम करताकरता त्यांना एक गोष्ट दिसून आली. परिसरात अनेक लोक असे होते की त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती, काही तर भीक मागून दिवस काढत होते.

जिथे दोन वेळचे जेवण कठीण असते, तिथे मुलाबाळांच्या शिक्षणाचा विषयही येत नाही. या लोकांची लहान मुले बघून यादव यांना त्यांच्या भविष्याची चिंता भेडसावत असे. यादव फक्त हळहळ करून मोकळे झाले नाहीत, त्यांनी यावर सक्रिय काम सुरू केले आणि चक्क ते स्वतःच अशा गरीब घरांतील मुलांना शिकवू लागले.

यादव एका झाडाखाली या सर्व मुलांना एकत्र करून शिक्षणाचे बीज रोवत आहेत. पण हे काम सोपे नव्हते. शिक्षणाबद्दल काही माहिती नसलेल्या पालकांची समजूत पटवून त्यांची मुले एकत्र करून त्यांना सर्व शिकवणी देत ते भविष्यातील स्पर्धेत टिकण्यासाठी तयार करत आहेत. शिकवणी देत असताना यादव या मुलांना आवश्यक असलेली पुस्तके, वही यासारखे सर्व साहित्य स्वखर्चाने पुरवतात हेही विशेषच.

यादव यांनी एकेक करत जवळपास ५० मुलांना एकत्र करून शिकवणी घेण्यास सुरुवात केली. या मुलांना घेऊन त्यांनी स्वतःची शाळा सुरू केली आहे. या शाळेचे नामकरण अपना स्कूल असेही त्यांनी केले आहे. या मुलांचे आता शिक्षणाबद्दल विचार ऐकले तरी यादव यांनी किती मोठी मजल मारली आहे याचा अंदाज येऊ शकतो.

ही मुले आता हळूहळू शिक्षणात रस घेऊ लागली आहेत, आता त्यांना यशाचे शिखर खुणावू लागले आहे. त्यांचे शिक्षणाबद्दल वाढत असलेल्या प्रेमाचे श्रेय निर्विवादपणे रणजित यादव यांनाच जाते. या मुलांनाच नव्हे, तर सातत्याने त्यांच्या पालकांना देखील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता अशा गोष्टींबद्दल ते मार्गदर्शन करत असतात.

रणजित यादव हे याआधी देखील चर्चेत आले होते. पावसाळ्यात झोपण्यासाठी बेघरांसाठी झोपण्याची सोय करून देणे असो किंवा हिवाळ्यात गरजूंना गरम कपड्यांचे वाटप असो ते सतत लोकांच्या सेवेत असलेले दिसून येतात.

यादव त्यांच्या हे सततच्या समाजकार्यामागील कारण हे त्यांच्या लहानपणात दडले असल्याचे सांगतात. आपल्या लहानपणी शिक्षण घेण्यासारखी परिस्थिती नव्हती, म्हणून मित्रांकडून पुस्तके मागून अभ्यास करत आपण यश प्राप्त केले असे ते सांगतात. शिक्षण आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो म्हणून आपण या मुलांना शिक्षण देऊन तयार करत आहोत असेही ते सांगतात.

दिवसेंदिवस महाग होणारे शिक्षण आणि गरिबांकडे साधनांची असलेली कमी पाहता, यादव यांचे हे कार्य निश्चितच महत्वाचे म्हणावे असे आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required