computer

जागतिक स्तरावर भारतातली तीन खेडी सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून नामांकित केली गेली आहेत. ही गावं कोणती आणि त्यांची खासियत तर जाणून घ्या..

गावं किंवा खेडे म्हणले की बऱ्याचदा वेगळे चित्र डोळ्यासमोर येते. आजकाल शहरी लोकांनाही त्याचं अप्रूप वाटतं आणि मग "मामाचा गाव" वगैरे नावाची पर्यटनस्थळं चालू होतात. खरंतर भारतीय संस्कृती जवळून पहायची असेल तर ग्रामीण भागाची ओळख असणे गरजेचे आहे. आता अनेक गावं किंवा खेडी आपली स्वतंत्र ओळख बनवत आहेत. भारतातल्या अशा तीन गावांना युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ (बेस्ट टुरिझम व्हिलेजच्या) पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. संपूर्ण भारतासाठी ही अभिमानाची बातमी आहे.
 

मेघालयातील कोंगथोंग, मध्य प्रदेशातील लधपूर खास आणि तेलंगणातील पोचमपल्ली या तीन गावांची नावे या यादीत आली आहेत. पर्यटन स्थळाच्या दृष्टीने ही गावे पर्यटकांना खूप आवडतात. जगभरातील सर्वोतकृष्ट पर्यटन स्थळांच्या यादीत ही भारतातील गावं आल्याने सर्व स्तरांतून याचे कौतुक होत आहे.

कोंगथोंग गाव हे गाव शिलाँगपासून सुमारे ६५ किमी अंतरावर आहे. मेघालयातील हे गाव "व्हिसलिंग व्हिलेज' म्हणून प्रसिद्ध आहे. या गावातील प्रत्येकाला एका विशिष्ट आवाजाची देणगी आहे. अगदी जन्मापासून हा आवाज त्यांना मिळाला आहे. याबद्दलचा बोभाटावरचा "'नाम मे क्या रखा है ?' - भारतातल्या या गावात लोकांना नावंच नाहीत...!!!" हा लेख तुम्ही वाचायलाच हवा. ('नाम मे क्या रखा है ?' - भारतातल्या या गावात लोकांना नावंच नाहीत!!!) मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनीही 'बेस्ट टुरिझम व्हिलेज'मध्ये कोंगथोंग गावाचे नाव आल्याने ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे.

लाधपुरा खास हे गाव मध्य प्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यातील ओरछा तालुक्यात आहे. मध्य प्रदेशच्या 'ग्रामीण पर्यटन प्रकल्प' अंतर्गत पुढील पाच वर्षांत १०० गावे विकसित केली जाणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. "मध्य प्रदेशातील लाधपुरा खास गावाचा' बेस्ट टुरिझम व्हिलेज 'मध्ये प्रवेश करणे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे." असे म्हणत आनंद व्यक्त केला आहे.
 

आंध्र प्रदेशातील नलगोंडा जिल्ह्यात असलेले पोचमपल्ली हे भारतातील खास रेशीम साठी ओळखले जाणारे एक लोकप्रिय स्थळ आहे. देशाच्या उच्च दर्जाच्या रेशीम साड्या येथे बनतात. पोचमपल्ली केवळ साड्यांसाठी प्रसिद्ध नाही तर येथील संस्कृती, परंपरा, वारसा, इतिहास आणि येथील सौंदर्य देखील येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते. विनोबा भावेंच्या भूदान चळवळीची १९५१मध्ये सुरुवात याच पोचमपल्ली गावापासून झाली असल्याने या गावाला भूदान पोचमपल्ली असंही म्हटलं जातं. त्यादृष्टीने या गावाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे!!

भारत हा खेड्यांचा देश आहे. गावं सुधारली तरच देशाचा विकास होईल हे जाणून काही वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी " खेड्याकडे चला" अशी हाक दिली होती. ही बातमी वाचून नक्कीच भारतातील प्रत्येक गावाला विकासासाठी एक नवीन प्रोत्साहन मिळेल.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required