व्हिडीओ ऑफ द डे : मेड इन चायना नाय, फुलटू मेड इन इंडिया म्हणणारा वरूण-अनुष्काचा 'सुई धागा' !!

Subscribe to Bobhata

अनुष्का आणि वरुणच्या सुई धागाचा अप्रतिम ट्रेलर आला आहे. दोघांच्या वाट्याला आलेला हा सिनेमा त्यांच्या करियर मधला यादगार सिनेमा राहील हे ट्रेलर पाहूनच लक्षात येतं. आजवर अनुष्का आणि वरुणने साकारलेल्या बॉलीवूडच्या पठडीबाज भूमिकांपेक्षा या सिनेमातील त्यांची भूमिका वेगळी आहे आणि त्यांच्या अभिनयाचा कस लावणारी आहे. काय आहे या नव्या सुई धाग्यात, चला जाणून घेऊ....

सुई धागा ही कहाणी आहे आपल्या पायांवर उभं राहणाऱ्या तरुणाची आणि त्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या त्याच्या बायकोची. वरुण धवन ‘मौजी’ या टेलरची भूमिका साकारत आहे तर अनुष्का त्याच्या पत्नीच्या म्हणजे ममताच्या भूमिकेत आहे.

आपला नवरा नोकरी टिकवण्यासाठी वेळ आल्यास लाचारी पत्करतोय हे ममताला सहन होत नाही आणि ती मौजीला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचं सुचवते. हे मौजीलाही पटतं. यावेळी मौजीच्या तोंडी एक वाक्य आहे “अगर गालियांही खानी है तो तालियों के आवाज में तो पड़े. बेवजह जुते खाने का क्या फायदा.” इथूनच या दोघांचा नविन प्रवास सुरु होतो.

स्रोत

मध्यप्रदेशमधल्या एका साधारण जोडप्याची ही गोष्ट आहे. वरुण आणि अनुष्का दोघांनी आपापली सुपरस्टारवाली इमेज बाजूला सारून अभिनय करण्याचा प्रयत्न केलाय. दोघांची जुगलबंदी दिसून येत आहे. ट्रेलरमधून दिसणारी आणखी एक गोष्ट म्हणजे भारतीय बनावटीचा अट्टहास. शेवटी चित्रपटाच्या नावातही ‘सुई धागा-मेड इन इंडिया’ आहे.

या चित्रपटात वरुणच्या पात्राला एकजण विचारतो की, "मेड इन चायना लिहिलं नाही तर विकत कोण घेणार"? हे एकप्रकारे आजच्या काळातलं प्रातिनिधिक वाक्य म्हणता येईल. अशा अनेक लहानसहान गोष्टी ट्रेलर मध्ये दिसून येतात.

मंडळी, वरुण धवनचं करियर बघितलं तर त्यानं प्रायोगिक आणि कमर्शियल सिनेमांचा  योग्य समतोल सांभाळला आहे. त्याचा ऑक्टोबर सिनेमा असाच काहीसा वेगळा प्रयोग होता. पण त्याहीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन त्याने सुई-धागामध्ये अभिनय केला आहे. अनुष्काच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अशा प्रकारची भूमिका तिच्या वाट्याला पहिल्यांदाच आली आहे. पण तिने या आधीच आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.

मराठीतसुद्धा गिरिश कुलकर्णी आणि अमृता सुभाषाचा 'मसाला' नावाचा खेड्यातल्या आणि संघर्ष करणाऱ्या जोडप्याचा सुंदर सिनेमा आला होता. 

सिनेमा चांगला आहे हे ट्रेलरवरून दिसतंय पण यावर शिक्कामोर्तब होईल २८ सप्टेंबर, २०१८ या तारखेला.

सबस्क्राईब करा

* indicates required