computer

अशी घ्या तुमच्या हृदयाची काळजी !! तुम्ही यातलं काय काय करता ?

आज जागतिक हृदय दिन. हृदयविकाराबद्दल जनजागृती व्हावी म्हणून २९ सप्टेंबर हा ‘जागतिक हृदय दिन’ म्हणून साजरा केला जातो.

दरवर्षी जगभरातले १ कोटी ७५ लाख लोकांच्या मृत्यूमागे हृदयविकार हे कारण असतं. हृदय विकार आणि भारत असा विचार केला तर दिसेल हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा हा खेड्यांपेक्षा शहरी भागात जास्त आहे. पण नुकत्याच आलेल्या अहवालानुसार ही तफावत सुद्धा आता भरून निघू शकते. याचं कारण २००० ते २०१५ पर्यंतचा अहवाल बघितला तर खेड्यातल्या लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण ४० टक्क्यांनी वाढलं आहे. याहूनही जास्त चिंतेची बाब अशी की भारतात सरासरी हृदय विकार होण्याची वयोमर्यादा ८ ते १० वयापर्यंत घसरली आहे. हृदय विकाराला बळी पडलेले ४० टक्के भारतीय हे ५५ पेक्षा कमी वयोगटातील आहेत. ही नक्कीच धोक्याची सूचना म्हणता येईल.

अनियमित आहार, व्यायामाचा अभाव, व्यसन आणि ताणताणाव ही हृदय विकाराची काही मुख्य करणं आहेत. रोजच्या कामाच्या धावपळीत आहार आणि व्यायामासारख्या गोष्टींकडे साफ दुर्लक्षित करतो. २४ तासांमधून थोडावेळ आपण हृदयासाठी काढला तरी हृदय ताजंतवानं राहायला मदत होते.

चला तर आज जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने पाहूयात हृदयाची काळजी घेण्याचे ७ उपाय...

१. योग्य आहार

अॅन्जेलीया विद्यापीठाच्या अभ्यासानुसार योग्य आहारामुळे अर्धांगवायूचा धोका १७ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. महिलांमध्ये हेच प्रमाण २२ टक्क्यांपर्यंत आहे. आता योग्य आहार म्हणजे काय ? तर अगदी सोप्पं आहे. फळे आणि भाज्या खा. एवढा आहार सुद्धा हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी पुरेसा असतो.

२. व्यायाम

व्यायाम हा फक्त हृदयासाठीच नाही तर संपूर्ण शरीराच्या दृष्टीने फायद्याचा असतो. हृदयाच्या बाबतीत व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रीत राहण्यास मदत होते. व्यायाम म्हणजे तुम्हाला जिम लावण्याचीच गरज आहे असं नाही बरं का. धावणे, सायकलिंग, पोहणे, दोरीवरच्या उड्या अश्या अगदी सध्या व्यायामांमुळे रक्तप्रवाह वाढून हृदय नव्या जोमाने काम करू लागते. पण प्रमाणाबाहेरच्या व्यायामामुळे हृदयाचं कार्य बिघडण्याची शक्यता सुद्धा असते.

३. पुरेशी झोप घ्या

पुरेशा झोपेमुळे हृदयाचं आरोग्य राखण्यात मोठी मदत होऊ शकते. पुरेशी झोप नसेल तर उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे एक नियम नेहमी ठेवा - रोज ८ तासांची झोप ही झालीच पाहिजे.

४. दातांची काळजी घ्या

दातांचा आणि हृदयाचा संबंध काय ? तर खूपच महत्वाचा संबंध आहे राव. दातांच्या विकारांमध्ये असलेले विशिष्ट जीवाणू रक्तात मिसळून रक्ताच्या गुठळ्या तयार करतात आणि त्यामुळे हृदयाचा झटका येण्याची शक्यता असते. दातांची काळजी घेण्यासाठी आमचे पुढील लेख वाचायला विसरू नका.

दातांची कीड, उपाय आणि उपचार : थेट दंतवैद्यांच्या शब्दात !!

टूथब्रश किती महिन्यांनी बदलावा ? बघा विज्ञान काय सांगतंय !!

५. मीठ प्रमाणात खा

रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी मीठ फार महत्वाचं असतं. पण प्रमाणाबाहेरच्या मीठामुळे उच्च रक्तदाबाचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे हृदयाचं आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी आहारात मीठाचं प्रमाण संतुलित ठेवलं पाहिजे.

६. धुम्रपान टाळा

धुम्रपानामुळे फुफ्फुसांना तर त्रास होतोच पण हृदय सुद्धा धोक्यात येते. तंबाखूत असलेला कार्बन मोनॉक्साईड रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी करतो. त्यामुळे हृदयाला शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यामध्ये अडचण येते. परिणामतः हृदयाचे ठोके वाढतात. याशिवाय धुम्रपानामुळे धमन्यांचं सुद्धा नुकसान होतं.

७. टेन्शन लेनाका नै

ताणताणावांना बळी पडू नका. स्ट्रेसमुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याचा धोका असतो. स्ट्रेसमुळे होतं असं की शरीर एड्रेनालाईन नामक संप्रेरक तयार करतं. एड्रेनालाईनमुळे श्वासोच्छवास आणि हृदयाचे ठोके वाढतात. याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या हृदयावर होत असतो राव. शिवाय ताणतणावांमुळे व्यसन लागण्याची शक्यता असते. म्हणूनच या सर्वांना कारणीभूत असलेलं ‘टेन्शन’ घ्यायचच नाय ना भाऊ.

 

तर मंडळी, जागतिक हृदय दिनाचं औचित्य साधून आजपासूनच हृदयाची काळजी घ्यायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यात बऱ्याच वर्षाची भर पडेल यात काडीमात्र शंका नाही.

 

आणखी वाचा :

'कार्डियॅक अॅरेस्ट’ आणि 'हार्ट अटॅक' मध्ये काय फरक आहे ? जाणून घ्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required