चिरतारुण्याचे नवे रहस्य - 'बोटॉक्स' !!

काही वर्षांपूर्वी ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन , फेशिअल, ब्लीच, आयब्रो आणि काय काय करून सुंदर दिसण्याचा खटाटोप बायका करायच्या. अजूनही करतातच. पण त्याकाळी पुरुष मात्र न्हाव्याकडे जाऊन दाढी-केस इतकाच कार्यक्रम उरकायचे. आता गेली काही वर्षं स्त्रियांच्या स्पर्धेत पुरुषही उतरलेत. आणि का उतरु नये? थोडे पैसे खर्च केल्यावर चेहेर्‍यावरचे वय काही वर्षांनी  कमी दिसत असेल  तर पुरुषांनीही पार्लरमध्ये जायला काय हरकत आहे ? 

पुराणात ययातीने चिरतारुण्यासाठी मुलाचे आयुष्यपण मागून घेतले नाही का? राहू द्या पुराणाची वानगी पुराणातच. सध्या चलतीआहे बोटॉक्स ट्रीटमेंटची.  अगदी दहा मिनिटांत  चेहेर्‍यावरच्या वय दाखवणार्‍या सुरकुत्या नाहीशा करणार्‍या बोटॉक्स नावाच्या एका रसायनाची! असे जादूचे रसायन आहे तरी काय? चला तर मग, बोभाटावर बोटॉक्स म्हणजे नक्की आहे तरी काय ते आज जाणून समजून घेऊ या !!

स्रोत

बोटॉक्स चे खरे नाव आहे बोट्युलिनम, एका Clostridium botulinum नावाच्या बुरशीपासून तयार केलेले एक  रसायन जे एक न्यूरोटोक्जीन आहे. न्यूरोटोक्जीन म्हणजे काय तर मज्जातंतूवर अंमल करणारे विष! हे विष किती परिणामकारक आहे? तर, केवळ एक मिलीग्रॅम बोटॉक्स दहा लाख लोकांचा जीव घेईल, पृथ्वीवरच्या सगळ्या माणसांना मारायला दोन किलोग्रॅम बोटॉक्स पुरेल !! थोडक्यात बोटॉक्स म्हणजे जहाल  विष आहे. अगदी हलाहल म्हणावं असं विष आहे. असं असेल तर या विषाच्या वाटेला जा कशाला असा प्रश्न साहजिकच मनात उभा राहील. बोटॉक्स विष आहे खरं, पण खूप मोठ्या प्रमाणात  सौम्य करून त्याचा वापर चेहेर्‍यावरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी केला जातो.

स्रोत

क्रोज फीट : वय वाढायला लागल्यावर ८४ टक्के स्त्री पुरुषांच्या डोळ्यांच्या कडांना बारीक सुरकुत्या पडायला लागतात. या कावळ्याच्या पायासारख्या दिसतात म्हणून त्यांना 'क्रोज फीट'असं म्हटलं जातं. यानंतरच्या वर्षांमध्ये डोळ्यांच्या खाली, गालावर, हनुवटीच्या आसपास वय वाढल्याच्या खूणा दिसायला लागतात. चित्रपट-सिरीअलमध्ये काम करणार्‍यांना ही मोठी अडचण असते. त्यांच्यासाठी बोटॉक्स हा अक्सीर इलाज आहे. जुना प्लास्टीक सर्जरीचा उपाय महागडा तर असतोच शिवाय ते काही झालं तरी ऑपरेशन असतं आणि सोबत इतर धोके उदभवू शकतात. या उलट बोटॉक्स ट्रीटमेंट स्वस्त आणि 'नॉन सर्जीकल ' असते .आता उपलब्ध माहितीनुसार दरवर्षी ६० लाख लोक बोटॉक्सचा वापर करतात. 

चला, आणखी काही माहिती वाचू या बोटॉक्स ट्रीटमेंंट बद्दल -

स्रोत

१. बोटॉक्स अगदी छोट्या डोसेसमध्ये, इंजेक्शनच्या माध्यमातून चेहेर्‍यावर टोचले जाते. एकूण जेमतेम दहा मिनिटांत हे काम फत्ते होतं.
२. इंजेक्शन दिल्याच्या जागेवर थोडी सूज येते पण ती तासा दिड तासात मावळते.
३. दोन ते तीन दिवसात सुरकुत्या नाहीशा होतात. आठवड्याभरात चेहरा तरुण दिसायला लागतो. 
४. चेहेर्‍यावरचे हे बदल अगदी सहज नजरेस येतील इतके चांगले असतात. रोज भेटणार्‍या मित्र मैत्रीणींच्या पण ते लक्षात येतील इअतके परीणामकारक असतात.
५. हा प्रभाव पाच ते सहा महिने टिकतो. त्यानंतर पुन्हा ट्रीटमेंट घ्यावी लागते.
६. काही जणांना ट्रीटमेंट नंतर तासभर थोडा डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. 
७. वारंवार बोटोक्सचा वापर केल्याने काही साइड इफेक्टस असल्याचे निदर्शनास आलेले नाही.

पण पण...लक्षात घ्या बोटॉक्स हे सौम्य केलेले विष आहे, म्हणूनच आधी एक टेस्ट डोसचा आग्रह करा आणि छातीत धडधड , श्वास घेण्यास त्रास असे काही होत असेल तर बोटॉक्स घेऊ नका.

सध्या बोटॉक्सची चर्चा ब्यूटी ट्रीटमेंट म्हणून होत असली तरी बोटॉक्सचे औषध म्हणून बरेच उपयोग आहेत.

स्रोत

१.  पापण्यांची जलद वेगाने होणारी अनैच्छिक हालचाल (Blepharospasm) थांवण्यासाठी ,
२. मान आणि खांद्यात वारंवार होणार्‍या झटक्यासहीत वेदनांना काबूत आणण्यासाठी ( dystonia)
३. तिरळेपणा कमी करण्यासाठी ,
४. पॅरालीसीस नंतर काबूत न राहणार्‍या हातापायाच्या हालचालीसाठी (कंपासाठी) , 
५. अर्धशिशि कमी करण्यासाठी.

थोडक्यात काय तर समजून वापरलं तर बोटॉक्स सारखं विष संजीवनीसारखं काम करू शकतं नाही का? आता बघा आरशात बघा आणि ठरवा तुम्हाला बोटॉक्स ट्रीटमेंटची गरज आहे का?