computer

भारत आता कॅन्सरची राजधानी होणार का ?? कोणत्या प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत होत आहे वाढ ?

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने जमा केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत गेल्या सहा वर्षात १५.७ टक्के वाढ झाली आहे. हीच टक्केवारी संख्यात्मक सांगायची झाली तर २०१८ या वर्षात ११ लाख ५७ हजार दोनशे चौर्‍याण्णव  नव्या कॅन्सर रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सगळ्यात धक्कादायक हिस्सा ओरल कॅन्सरचा म्हणजे तोंडाच्या कॅन्सरचा आहे, ज्याचे मूळ तंबाखूच्या वाढत्या वापरात आहे. घसा, गालफडे, जीभ, वरची टाळू, हिरड्या, नाकाच्या आसपास असणार्‍या रिकाम्या पोकळ्या (सायनस) यामध्ये पेशींची अमर्याद वाढ होणे म्हणजे ओरल-तोंडाचा-कॅन्सर. या कॅन्सरची सुरुवात बर्‍या न होणार्‍या व्रणापासून होते. तंबाखूच्या सतत वाढत्या वापरामुळे भारतात तोंड-नाक-घसा यांच्या कॅन्सरचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की  जगातल्या एकूण हेड अँड नेक सर्जरींपैकी ५७.५% शस्त्रक्रिया भारतात होतात. 

२०१२ साली भारतात तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या ५६००० होती, तर २०१८ मध्ये, म्हणजे गेल्या ६ वर्षांत, तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या १,१९,९९२ पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच सहा वर्षात दुप्प्टीपेक्षा जास्त!! ओरल कॅन्सरनंतर नंबर लागतो स्तनाच्या कॅन्सरचा. या प्रकारच्या कॅन्सरमध्ये १०टक्के वाढ झालेली आहे. २०१२ साली १,४५,००० महिला स्तनाच्या कॅन्सरने ग्रस्त होत्या. पण २०१८ साली ही संख्या १,६२,४०८ झालेली आहे. त्या पाठोपाठ गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि फुफ्फुसाच्या कॅन्सर रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.

भारतासारख्या विकसनशील देशात ही आकडेवारी आर्थिक दृष्टीनेसुध्दा महत्वाची आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १८ टक्के लोक भारतात राहतात. जर रुग्णांची संख्या वाढत गेली तर एकाच रोगामुळे सरकारी तिजोरीवर पडणारा ताण वाढत जातो. साहजिकच आहे की याचा परिणाम इतर रोगांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या उपचारावर पडतो. शास्त्रीय परिभाषेत याला ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज असे म्हणतात. या अभ्यासात संसर्ग होणारे रोग आणि संसर्ग विरहीत रोग यांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. जर कॅन्सरग्रस्तांची संख्या या प्रमाणात वाढत गेली तर खर्चाचा ताण अधिकच वाढत जाईल, कारण या रोगाचे उपचार अत्यंत महागडे आहेत. सध्या तरी भारतात हृदयविकारांनी होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. दुसर्‍या क्रमांकावर कॅन्सरचा नंबर लागतो. त्यातही स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे ही चिंतेची बाब आहे. 

​​​​​​​या रोगाची आर्थिक बाजू कशी सांभाळायची?

काही उपाय सर्व सामाजिक स्वरुपाचे आहेत, तर काही वैयक्तिक स्वरुपाचे आहेत.  कॅन्सरसारख्या आजाराबद्दल अधिकाधिक जनजागृती करून रोगाच्या प्राथमिक अवस्थेत असतानाच उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या वाढवणे हा एक सहज करता येण्यासारखा उपाय आहे. आजार गंभीर अवस्थेत गेल्यावर खर्च अधिक होतो. उदाहरणार्थ, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर 'पॅप स्मिअर' सारख्या सोप्या पध्दतीने चेक करून घेणं हे नंरतच्या उपचारांपेक्षा स्वस्त आणि सोपं आहे.  तसंच स्तनात उद्भवलेल्या गाठींकडे दुर्लक्ष न करता मॅमोग्रामसारख्या टेस्ट वेळीच करून घेणे, तंबाखू -दारु यामुळे होणार्‍या कॅन्सरबद्दल जागृती करून लोकांना निर्व्यसनी बनवणे हेही करायलाच हवं. तसंच आयुष्मान भारतसारख्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे, इतर आरोग्य विमा घेणे,  जेथे सामूहिक विमा मिळण्याची शक्यता आहे तेथे कमी खर्चात आरोग्य विमा  घेणे,  भारतीय आयुर्विमा मंडळ किंवा इतर कंपन्यांचा कॅन्सर इन्शुरन्स घेणे हे सगळं करायला हवं.  या उपायांनी कुटुंबावर अचानक पडणारा ताण कमी होण्यास मदत होते. 

काही कॅन्सर टाळता येण्यासारखे आहेत ही जाणिव लोक जनमानसात होणे अत्यावश्यक आहे. जे आधीच कॅन्सरग्रस्त आहेत त्यांच्यासाठी काही  आशेचे किरण नव्या औषधांतून दिसतो आहे. ज्या लोकांनी या औषधांचा वापर केमो आणि रेडीओ थेरपीसोबत केला, त्यांच्यामध्ये तर रोग वाढण्याची शक्यता २६ टक्क्यानी कमी होताना दिसली आहे आणि या रुग्णांचे इतर रोग्यांच्या तुलनेत आयुष्यमान वाढलेले दिसत आहे.  सगळेच कॅन्सर जरी पहिल्या टप्प्यात ओळखता येत नसले तरी किमान काही कॅन्सरसाठी वेगवेगळ्या टेस्ट्स किमान दर सहा महिन्यांनी करुन वेळीच रोग ओळखणं हे आता प्रत्येकानेच करायला हवंय. राहता राहिली ओरल कॅन्सरची गोष्ट, तर त्यासाठी सध्यातरी समुपदेशन करून तंबाखूच्या व्यसनातून मुक्ती मिळेल असे पाहणे हाच एक आशेचा किरण दिसत आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून सरकार हे आधीच करत आहे.  तरीपण कॅन्सरला थांबवण्यासाठी तंबाखूचे व्यसन सामाजिक संदेशातून कमी करणे हेच सगळ्यात मोठे औषध आहे.

 

 

आणखी वाचा :

पुरुषांनाही स्तनांचा कर्करोग होतो का ? जाणून घ्या पुरुषांच्या ‘ब्रेस्ट कॅन्सर' बद्दल !!

जाणून घेऊया एलआयसी च्या कॅन्सर कव्हर पॉलिसी बद्दल !!

या ८ सेलिब्रिटीजनी दुर्धर आजाराशी लढा दिला आहे...

सबस्क्राईब करा

* indicates required