computer

या ८ सेलिब्रिटीजनी दुर्धर आजाराशी लढा दिला आहे...

मंडळी, आजार काही कुणाला चुकला नाहीय. पण कुणाला जीवघेणा आजार झाला की वाईट हे वाटतंच. पण म्हणून काय सेलेब्रिन्टींचा आजार तो आजार आणि आमचं फक्त दुखणं ? नाही हो, हे सेलेब्रिटी सगळ्यांना माहीत असल्यानं त्यांच्याबद्दलची हळहळ जरा सगळ्यांच्याकडून येते झालं.

नुकताच इरफान खानला हा आजार झाल्याच्या बातम्या थोड्या थांबतात, तोवर काल सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाल्याची बातमी येऊन धडकलीय. या निमित्तानं पाहूयात आजवर अशा मोठ्या आजारांतून कोण कोण गेलं आहे.

१. लिसा रे

आफरीन आफरीन या गाण्याच्या तालावर वाळवंटात फिरणारी लिसा रे आपल्याला माहित आहेच.  या कॅनेडियन अभिनेत्रीला २००९मध्ये पांढऱ्या रक्तपेशींचा कॅन्सर झाला होता. हा आजार तसा बराच दुर्मिळ आहे. वर्षभरात हा तिचा रोग बरा झाला होता.

२. मनीषा कोईराला

या आपल्या नेपाळी अभिनेत्रीला २०१२मध्ये अंडाशयाचा कॅन्सर झाला होता. तिला आपल्याला हा आजार झाला आहे हे खूप उशीरा कळलं. तोपर्यंत ती बरीच अशक्त झाली होती. तिच्या रोगाचं निदान व्हायलाही वेळ लागला. तिनं उपचारादरम्यानचे केमोथेरपीचे आणि इतर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.

साधारण २०१३मध्ये तिचा रोग बरा झाला. तेव्हापासून ती रोगाच्या जगरूकतेबद्दल प्रसार करत आहे.

३. ह्रितिक रोशन

२०१३मध्ये आपल्या या लाडक्या अभिनेत्याचं डोकं प्रचंड दुखू लागलं आणि त्याला सबक्यूट सबडुरल हेमाटोमा हा मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी होण्याचा रोग झाल्याचं निष्पन्न झालं. 
एका सीनमध्ये ह्रितिकने सुमारे ३० फुटांवरून खाली पाण्यात उडी मारली होती. त्यादरम्यान त्याच्या मेंदूला मार लागला होता असं त्याच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळेच साधारण पासष्टीच्या पुढच्या लोकांना होणारा रोग ह्रितिकला इतक्या लवकर झाला असावा.

४. अमिताभ बच्चन

यांच्या तर आजारांची मोठी लिस्ट आहे भाऊ. १९८२ मध्ये कुली सिनेमाच्या वेळेस अपघात झाला आणि कदाचित त्यामुळेच त्यांना मायस्थेनिया ग्रेविझ  हा आजार झाला. या आजारात मुख्यतः थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. आजारपणात खूप साऱ्या गोळ्या-औषधं घेतल्यानं असं झालं असेल हे डॉक्टरांचं मत आहे. 

त्यानंतर बच्चनना सतत पोटदुखीचा त्रास होत असे. हे लिव्हर सिरोसिस लक्षण असल्याचं नंतर सिद्ध झालं. आता सध्या त्यांची प्रकृती ठीक असली तरी या पोटदुखीनं त्यांना बरेचदा बेजार केलंय. 
 

५. सतीश पुळेकर

एक काळ असा होता की मराठी मालिका म्हटलं की त्यात गिरीश ओक नाहीतर सतीश पुळेकर असायचेच असायचे. नंतर मात्र सतीश पुळेकर खूप वर्षं मराठी सिनेमा, मालिका आणि नाटकांपासून दूर राहिले. त्यांना झालेला व्हर्टिगोचा आजार त्याला कारणीभूत होता असं सांगण्यात येतं. 

६. इरफान खान

इरफानला  न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर हा एक गंभीर आजार झाला आहे. त्याने ट्विटरवरून या दुर्धर आजाराबद्दल माहिती दिली होती. सध्या तो लंडन मध्ये उपचार घेत आहे. इरफानच्या आजाराची बातमी अगदीच अनपेक्षित होती. 

न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर बद्दल अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा : 

इरफानला झालाय 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर'...जाणून घ्या काय आहे हा आजार !!

७. सोनाली बेंद्रे

सोनालीला ‘हाय ग्रेड मेटास्टेटिस कॅन्सर’ झाला असून ती न्युयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. ‘हाय ग्रेड मेटास्टेटिस कॅन्सर’ हा खूपच गंभीर स्वरूपाचा कॅन्सर मानला जातो.

‘मेटास्टेटिस कॅन्सर’चा अर्थ होतो कॅन्सर जिथून उत्पन्न झाला तिथून तो शरीराच्या इतर भागात पसरला आहे. हा कॅन्सर खतरनाक असला तरी बरा होण्याची शक्यता असते. सध्या सोनालीने दिलेल्या माहितीवरून तिला झालेला कॅन्सर किती गंभीर आहे याबद्दल फारच थोडी माहिती मिळाली आहे.

८. युवराज सिंग

आपल्या या धुरंदर खेळाडूला २०११ साली कॅन्सर झाल्याचं माहित झालं. त्याला डाव्या फ्फुसाचा कर्करोग झाला होता. निदान झाल्यावर तो लगेचच अमेरिकेतल्या बोस्टनला रवाना झाला. तिथे त्याने केमोथेरपीचा उपचार करून घेतला. उपचार पूर्ण झाल्यानंतर २०१२ मध्ये तो पुन्हा मायदेशी परतला आहे.

मंडळी, युवराजला कॅन्सर झाल्याचं माहित पडल्यावर त्याच्या आईने निर्मल बाबाकडे धाव घेतली. हे जर झालं नसतं तर कदाचित युवराज आणखी लवकर बरा झाला असता !!

सबस्क्राईब करा

* indicates required