झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा !!!

Subscribe to Bobhata

काल सकाळी मन्मथ म्हैसकर या तरुण मुलाच्या आत्महत्येने मुंबईचा नेपीअन सी रोडचा परीसर हादरला.  जेमतेम १९ वर्षांच्या या  मुलाने 'दर्या महल' इमारतीच्या २० व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. पोलीसांनी अपघाती मृत्यु अशी केस दाखल केली असली तरी मिडीया मध्ये या आत्महत्येची उलटसुलट चर्चा चालू आहे . मन्मथ म्हैसकर हा म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनिषा म्हैसकर - शहर विकास खात्याच्या मुख्य सचिव यांचा मुलगा आहे. या आत्महत्येचे वरवर बघता काहीही कारण अजून उघडकीस आलेले नाही. पण तरुण मुलांच्या आत्महत्येची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आहे ही चिंतेची बाब आहे. 
७ एप्रील रोजी बोभाटाने या विषयावर एक लेख प्रकाशित केला होता तो आज आम्ही पुन्हा एकदा प्रकाशित करत आहोत.

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा
फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा

पुष्पास वाटते का भय ऊनपावसाचे
आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे
हसुनी करी परि ते वर्षाव सौरभाचा

का कालचा उद्याला देसी उगा हवाला
द्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला
अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा

मनाचा हिरमोड होणं, एखादी गोष्ट मनासारखी न घडणं, आयुष्यातील एखाद्या घटनेमुळे नैराश्य येणं हे मानवी आयुष्यात रोजच होत असतं. आलेलं नैराश्य विसरून पुन्हा नव्या जोमानं आपल्या कामाला लागणं हे पण रोजचच आहे. परंतु सध्याच्या वेगवान आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीत मनाचा तोल ढळणे आणि आत्महत्येला प्रवृत्त होणे या घटना आपण मोठ्या प्रमाणात घडताना बघतो. भारतामध्ये २० ते ३५ या वयोगटात सगळ्यात जास्त आत्महत्येचे प्रमाण आहे. आत्महत्या हे नैराश्याचे अंतिम टोक आहे जिथून परत येण्याची वाट संपून जाते. म्हणून आज आपल्या बोभाटाच्या वाचकांसाठी एक खास गाणे सादर करत आहोत. मधुचंद्र या चित्रपटातील हे गीत ग. दि. माडगूळकरांच आहे. या गाण्याची धून एन. दत्ता यांची असून महेंद्र कपूर यांच्या सदाबहार आवाजात हे गाणे ऐकले तर मनावर आलेले मळभ निश्चितच दूर होईल.

सबस्क्राईब करा

* indicates required