computer

स्त्री बीजांडाचा व्यापार कसा होतो? पैसे कमावण्याच्या या मार्गाला विरोध का असावा?

या आधीच्या भागात आपण सरोगसी म्हणजे 'भाडोत्री उसन्या' मातृत्वाबद्दल वाचले. २०१८ सरोगसी अ‍ॅक्टनंतर अनेक गैरप्रकारांना आळा बसलेला आहे. याचा अर्थ मानवी शरीराचा काळाबाजार बंद झाला आहे असा  नाही. या मालिकेच्या दुसर्‍या टप्प्यात स्त्री बीजांडाच्या बाजारात काय घडते आहे ते आज वाचू या.

पण पुढे जाण्यापूर्वी  ' नेव्हर लेट मी गो' या चित्रपटाबद्दल चार शब्द नक्की वाचा. हा चित्रपट काझुओ इशिगुरो या लेखकाच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. याची मध्यवर्ती संकल्पना अशा कालखंडात आहे जेव्हा मानवी आयुर्मान शंभर वर्षांवर पोहचले आहे. पण त्यासाठी मानवी अवयवांची मागणी वाढली आहे. हे अवयव सहज मिळावे म्हणून जैविक तंत्रज्ञान वापरून मुलं प्रयोगशाळेत तयार होत आहेत.

थोडक्यात, प्रयोगशाळेत मानवी 'क्लोन' तयार होत आहेत. ही जन्माला येणारी मुलं तुमच्या आमच्यासारखेच जीव आहेत, पण त्यांची निर्मिती फक्त 'अवयवदानासाठी' केली जाते आहे. एका विशिष्ट वयाला पोहचल्यानंतर त्यांचे अवयव काढून गरजूंना पुरवले जाणार आहेत. त्यांच्यात आणि आपल्यात फरक इतकाच आहेत की आपल्याला आपले आई वडील आहेत, तर ते प्रयोगशाळेत तयार झालेले जीव आहेत. जशी अंड्यांसाठी कोंबड्यांची वाढ पोल्ट्रीत होते - मटनासाठी गोट फार्ममध्ये बकर्‍या असतात, तसेच नवीन अवयव मिळवण्यासाठी या मुलांची वाढ केली जाते आहे. पुढे काय होतं यासाठी चित्रपटच बघावा लागेल. पण वाचकहो, स्त्री बीजांडाच्या काळ्या धंद्याबद्दल अधिक माहिती वाचण्यापूर्वी या चित्रपटाची पार्श्वभूमी मनात बाळगणे आवश्यक आहे. 

जैवविज्ञानाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यासोबत एकेक नवा काळा बाजार विकसित होत गेल्याचं तुमच्या लक्षात येईल. १९६५ साली मुंबईच्या के. इ. एम. इस्पितळात पहिला किडनी ट्रान्सप्लांटचा प्रयोग यशस्वी झाल्यावर किडनीचा व्यापार अस्तित्वात आला. तुम्ही वर्तमानपत्रात किडनी डोनेशन रॅकेटबद्दल नक्कीच वाचलं असेल. १९८२ साली महाराष्ट्र सरकारने “Maharashtra Kidney Transplantation Act of 1982” आणल्यानंतर या रॅकेटच्या काळ्या कृत्यांना आळा बसला. तरीपण भारतात इतर ठिकाणी नाईलाज म्हणून किडनी विकण्याचे रॅकेट फोफावतच गेले.

मानवी देहाचा आणि मानवी इंद्रियांचा काळा बाजार या विषयावर  स्कॉट कार्नी या लेखकाने लिहीलेल्या 'रेड मार्केट' या पुस्तकात दिलेली उदाहरणे वाचल्यावर अंगावर शहारा येतो. उदाहरणार्थ, २००४ साली तामिळनाडू राज्यात त्सुनामीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. वाताहात झाल्यावर अनेकांना पुन्हा एकदा आयुष्यात उभे राहण्यासाठी किडनी विकण्याखेरीज काहीच पर्याय नव्हता. एक वस्ती तर अशी आहे की तिथे बहुतेक कुटुंबांतील किमान एकाने तरी किडनी विकली आहे. या वस्तीला आजही ' किडनीवक्कम' म्हणजे किडनीवाल्यांचे गाव म्हणूनच ओळखले जाते.

गरीबीचा शाप जित्याजागत्या माणसांना हे सगळे करायला भाग पाडतो हेच यामागचे सत्य आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा विकास झाल्यावर सरोगसीसाठी तयार होणार्‍या महिलांचा उद्देश गरीबीतून बाहेर पडणे हाच होता. नव्या कायद्यानंतर सरोगसीचे मार्केट संपले, पण स्त्रीबीजांडाचा नवा व्यापार सुरु झाला. हे नक्की काय आहे समजण्यासाठी स्त्री बिजांड म्हणजे काय ते आधी समजून  घेऊ या! 

स्त्री-बीजांडे म्हणजे नक्की काय?

शास्त्रीय भाषेत उसाइट (Oocyte) म्हणजे स्त्री बीजांड तयार होण्यासाठी लागणारी मूळ पेशी. अशा अनेक पेशी जेव्हा विकसित होतात तेव्हा 'ओव्हम' म्हणजे पूर्ण विकसित स्त्री बीजांड तयार होते. अशी अनेक बीजांडे तयार होतात पण पूर्ण विकसित असे एखादेच तयार होते. हे बीजांड दर महिन्याला २७ ते २८ दिवसांनी स्त्रियांच्या शरीरात तयार होते. या बीजांडाचा पुरुषाच्या शुक्राणूसोबत मिलाप झाला तर गर्भ तयार होतो. तसे न झाल्यास ते विघटीत होते आणि मासिक धर्म सुरु होतो. म्हणजेच वयात आलेल्या स्त्रीचे शरीर रजोनिवृत्तीपर्यंत दर महिन्याला बीजांडांची निर्मिती करत असते. अपत्यप्राप्तीसाठी तर एकाच बीजांडाची गरज असते. थोडक्यात बाकीची बिजांडे वाया जात असतात. मग हीच बीजांडे वापरून आय. व्ही. एफ. तंत्राचा वापर करून अपत्यप्राप्ती शक्य आहे हे लक्षात आल्यावर या बीजांडांचा व्यापार सुरु झाला.

पण व्यापाराच्या दोन बाजू असतात- देणारा आणि घेणारा!!

दाता कोणतीही सशक्त -निरोगी स्त्री असू शकते आणि या बीजांडाचा स्वीकार करणारी दुसरी  स्त्रीच असते. काही स्त्रिया तरुण असूनही स्वतः बीजांडे तयार करण्यास सक्षम नसतात. काही स्त्रियांमध्ये अनुवंशिक आजार असतात आणि ते त्यांच्या संततीला होऊ शकतात. अशा स्त्रिया किंवा प्रजनन क्षमतेच्या वयाच्या पलीकडे गेलेल्या स्त्रिया अपत्यप्राप्तीसाठी दुसर्‍या सशक्त स्त्रीचे बीजांड अपत्यप्राप्तीसाठी वापरतात. 

गेल्या काही वर्षांत स्त्री बीजांडाचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी आणि मिळवलेल्या पैशातून चैनीच्या वस्तू खरेदी करणार्‍या अनेक स्त्रिया या व्यवहारात भाग घेताना दिसत आहेत. भारतात हे प्रमाण आतापर्यंत कमी आहे, पण पैसे कमावण्याचा सुटसुटीत मार्ग म्हणून असा मार्ग स्विकारणार्‍या स्त्रियांची कमतरता अर्थातच नाही. सायप्रससारख्या छोट्याशा देशात अमेरिकेत नसतील इतकी आयव्हीएफ सेंटर आहेत. युरोपच्या पूर्व भागातून अनेक गरीब निर्वासित इथे आश्रयाला येतात. यापैकी बर्‍याच स्त्रिया अत्यल्प पैसे मिळवण्यासाठी बीजांडे देतात. 

या स्त्रिया कशा शोधल्या जातात?

सोशल मिडीयाचा वापर सुरु झाल्यावर हे काम फार सोपे झाले आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आधी संपर्क केला जातो. त्या संभाषणाचा नमुना पाहा-
"Hi, we're looking for ovum eggs donor for IVF programme."

यानंतर हे कसं करता येईल, किती पैसे मिळतील याबाबत माहीती दिली जाते.

यानंतर एक लांबलचक फॉर्म भरल्यानंतर पुढची कारवाई सुरु होते. हा फॉर्म इच्छुक आईवडीलांना दाखवला जातो. त्यांच्या मनाला आवडेल असे मूल म्हणजे (रंग, रुप, बुद्धीमत्ता या अपेक्षेत) मिळेल असे वाटले तर सौदा फायनल होतो. बीजांड वेळच्यावेळी बाहेर काढलं जाऊन त्याचा मोबदला पण मिळतो. आणि येथे व्यवहार संपतो. सुरुवातीला ही प्रक्रिया अत्यंत सोप्पी आहे असे भासवले जाते. प्रत्यक्षात ही प्रक्रिया गुंतागुंतीची असते.

मासिक पाळीच्या आधी आठवडाभर हार्मोन्सची इंजेक्शन्स घ्यावी लागतात. अगदी पाळी सुरु होण्याच्या ८ तासापूर्वीपर्यंत हार्मोन्सचा मारा चालूच राहतो. दीर्घकालावधीचा विचार केला, तर असे लक्षात येते की हार्मोन्स शरीराच्या इतर प्रक्रियांमध्ये पण लुडबुड करते. परिणामी हातात आलेले पैसे गोड वाटले तरी हार्मोन्समुळे होणारा त्रास असह्य असतो.

भारत आणि आशिया खंडातल्या बहुतेक देशांमध्ये स्त्री-बीजांडे विकणे हा गुन्हा आहे. तरीही हा व्यापार चालतोच आहे. 

वाचकहो, या दुसर्‍या भागाचा सुरुवात आपण चित्रपटाच्या कथेने केली होती. ती कथा मनात ठेवूनच या भागाचा शेवट एका प्रश्नाने करू या!

समजा, या व्यापारावर कायद्याने बंदी नसती तर नैतिक-अनैतिक पातळीवर तुम्ही काय केलं असतं? पाठींबा दिला असतात की विरोध केला असता?

कमेंटमध्ये या प्रश्नाचे उत्तर  जरूर जरूर द्या. कारण या पुढचा भाग तुम्ही घेतलेल्या कोणत्याही भूमिकेला आव्हान देणारा असेल तोपर्यंत कमेंट .. कमेंट.. कमेंट....

 

आणखी वाचा :

सरोगसीचा व्यापार कसा चालत असे? कायद्याची गरज निर्माण करणारे 'बेबी मंजी' प्रकरण काय होते?

सबस्क्राईब करा

* indicates required