computer

सरोगसीचा व्यापार कसा चालत असे? कायद्याची गरज निर्माण करणारे 'बेबी मंजी' प्रकरण काय होते?

गेली पंचवीस वर्षे 'बाह्यतंत्राचा वापर करून अपत्यप्राप्ती' करून देण्याचे विज्ञान ज्याला Assisted Reproductive Technology असे म्हणतात ते प्रायोगीक तंत्र न राहता यशस्वी तंत्र झाले आहे. याच तंत्राने जगातली दुसरी आणि भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी १९७८ साली जन्माला आली होती. 

१९८६ साली मुंबईच्या केइएम इस्पितळात हर्षा चावडा या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाल्यावर या तंत्राला इतकी प्रसिध्दी मिळाली की तंत्र विकसित होण्यासोबतच जागोजागी खाजगी In-vitro fertilisation (IVF) सेंटर सुरु झाली. या तंत्राचे कौतुक करावे तितके कमीच आहे. पण यासोबतच एक काळा व्यापारही देशात फोफावत गेला तो म्हणजे स्त्री बीजांडे, पुरुष शुक्राणू आणि पैशासाठी चालणारा सरोगसीचा व्यापार!

बॉलीवूडचे 'चोरी चोरी चुपके चुपके' आणि 'विक्की डोनर' सारखे अनेक चित्रपट मनोरंजन म्हणून यशस्वी झाले असतील, पण प्रत्यक्ष परिस्थिती यापेक्षा फारच गंभीर आहे. एकेकाळी स्थानिक पातळीवर असलेला हा व्यवहार आंतराष्ट्रीय पातळीवर गेला आहे. 

सुरुवातीला बघू या सरोगसीच्या व्यापाराबद्दल!

In-vitro fertilisation (IVF) चे तंत्रज्ञान विकसित झाल्यावर अनेक शहरांमध्ये आयव्हीएफ सेंटर उभी राहीली. पुढे वाचण्यापूर्वी आयव्हीएफ तंत्र समजून घेऊया.

पतीचे शूक्राणू आणि पत्नीचे बीजांड घेऊन शरीराबाहेर गर्भनिर्मिती करायची, असा तयार झालेला गर्भ पत्नीच्या गर्भाशयात स्थापित करायचा. या तंत्राला आयव्हीएफ किंवा सर्वसामान्य भाषेत टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. पण काही वैद्यकीय कारणाने पत्नीच्या गर्भाशयात गर्भ स्थापीत करण्यास अडचण असेल तर दुसर्‍या स्त्रीचे गर्भाशय भाड्याने घेऊन त्यात बाळाची वाढ करून घ्यायची, अशा बाळाचा जन्म झाल्यावर तो त्याच्या आईवडिलांकडे सोपवायचा. याला म्हणतात सरोगसी! बोभाटाचा हा लेख नक्की वाचा.

सरोगसी म्हणजे नक्की काय, कसं असतं या सरोगेट मातांच जग ?

सुरुवातीला तंत्रज्ञान नवीन असल्याने संबंधीत कायदे अस्तित्वातच नव्हते. जेव्हा कायदे आले तेव्हा त्यातल्या अपुर्‍या तरतुदीमुळे त्यात चोरवाटा शिल्लक राहिल्या. Surrogacy Bill, 2018 हा कायदा येण्यापूर्वी बर्‍याच राज्यात 'गर्भाशय' भाड्याने देण्याचा धंदा जोरात होता. अनेक परदेशी जोडपी भारतात येऊन भारतीय महिलांच्या पोटी गर्भ स्थापित करायचे. मूल जन्माला आल्यावर आपले अपत्य म्हणून घेऊन जायचे.

२०१८ च्या नव्या कायद्यानुसार सरोगसी आता फक्त 'परोपकारी' (Altruist) भावनेतून करता येते. मुलीच्या अपत्यासाठी आईने 'सरोगेट मदर' म्हणून काम करण्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतीलच. दोन वर्षापूर्वी मनीषा आणि मिलिंद म्हैसकर या मुंबईतील एका आयएएस दांपत्याच्या तरण्याताठ्या मुलाने आत्महत्या केली. या दु:खाने व्यथित झालेल्या त्या दांपत्याला दुसरे अपत्य नव्हते. आयुष्याच्या अशा वळणावर ही दु:खद घटना घडली की दुसरे अपत्य होणेही शक्य नव्हते. त्यांनी परोपकारी सरोगसीचा वापर केला. ते आज एका दोन मुलींचे आईवडील आहेत. सरोगसी अशाप्रकारे अत्यंत उदात्त कारणासाठी वापरली जाऊ शकते.

(म्हैसकर कुटुंब)

नव्या कायद्यानुसार व्यापारी हेतूने म्हणजे अर्थार्जनासाठी गर्भाशय भाड्याने देणे, शूक्राणू, बीजांडे विकणे यावर आता पूर्णपणे कायदेशीर निर्बंध आहेत. पण या अगोदर जे काही घडत होते त्याची झलक थोडक्यात वाचा.

भारतात अनेक शहरात 'सरोगसी सेंटर' उभी राहिली होती. गरजू महिलांना सरोगेट मदर म्हणून रिक्रूट केले जायचे. त्यांच्या पोटात गर्भ वाढीस लागल्यावर त्यांना योग्य आहार आणि आरोग्य सेवा देण्यात यायची. मूल जन्माला आले की ते आईबाबांच्या हवाली करण्यात आल्यावर 'नऊ महिन्यांचा मेहनताना' आईला दिला जायचा. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात यामुळे दरवर्षी दोन अब्ज डॉलरची भर पडत असल्याचा दावा अनेकांनी केला. अमेरिकेत सरोगसीचा खर्च १५०००० डॉलर असल्याने आणि मर्यादित राज्यांमध्येच सरोगसीची परवानगी मिळत असल्याने अनेक अमेरिकन जोडपी भारतात 'अपत्यप्राप्ती'साठी येत असत.

गुजरातच्या आणंद येथील ५००० कुटुंबाचे हे रोजगाराचे साधन झाले होते. एका सरोगसी साठी महिलेला ४००००० रुपये देण्यात येत असत. एखाद्या उद्योगधंद्यासारख्या चालणार्‍या आकांक्षा इनफर्टीलीटी सेंटरचा इतका बोलबाला झाला की अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमात Oprah Winfrey शो मध्ये डॉ. नयना पटेल यांची खास मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या आकांक्षा इनफर्टीलीटी क्लिनिकने २०१५ सालपर्यंत १००० मुलांना सरोगसीच्या माध्यमातून जन्म दिला होता.

(नैना पटेल आणि सरोगेट माता, आणंद)

या सर्व व्यापारी व्यवहाराला एक जोरदार धक्का बसला तो 'बेबी मंजी' प्रकरणानंतर! आयव्हीएफ तंत्राने 'सरोगेट'  आईचा वापर करून अपत्यप्राप्ती करण्यासाठी २००८ साली एक जपानी जोडपे भारतात 'सरोगसी'साठी आले. एका सेंटरने ही व्यवस्था करून दिली. वेळेवर मूल(मुलगी)जन्माला आली. पण या नऊ महिन्यांत त्या जोडप्याचा घटस्फोट झाला होता. आता यक्षप्रश्न असा होता की मुलगी कोणाची? भाड्याने घेतलेल्या आईची की जोडप्याची? मुलगी भारतीय की जपानी? बिचारा जीव कोणत्याही कारणाशिवाय अनाथ झाला होता. शेवटी हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचले. शेवटी तडजोडीनुसार जपान सरकारने विशेष व्हिसा दिल्यावर मुलगी जपानला गेली. 

(बेबी मंजी)

अशा अनेक वेगवेगळ्या अनुभवानंतर हे सरोगसीचे व्यवहार थांबले, पण तोपर्यंत स्त्री बीजांडाचा व्यापार सुरु झाला होता. हे नेमके काय ते आपण पुढच्या भागात वाचू या!!

सबस्क्राईब करा

* indicates required