सरोगसी म्हणजे नक्की काय, कसं असतं या सरोगेट मातांच जग ?

काही दिवसांपूर्वी करण जोहरने सरोगसीचा वापर करत यश आणि रुही या दोन मुलांना जन्म दिला होता. त्याआधी तुषार कपूर आणि शाहरुख खान यांनाही सरोगसीमुळे बाप होता आले होते.

 

जे पती पत्नी काही वैद्यकीय किंवा अन्य कारणांमुळे मुलाला जन्म देऊ शकत नाही त्यांच्यासाठी सरोगसीचा पर्याय सुचवला जातो. पण हे सरोगासी म्हणजे नेमकं काय असतं ? चला जाणून घेऊया.

 

सरोगसी म्हणजे स्त्रीचा गर्भाशय भाड्याने घेणे. जर पत्नीला गर्भाशयाचा आजार असेल, पती पत्नींपैकी एखाद्या व्यक्तीमध्ये काही कमतरता असतील किंवा ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाने देखील मूल होऊ शकत नसेल तर अश्यावेळी त्या स्त्रीचे ‘स्त्री बीज’ आणि ‘पुरुषाचे शुक्राणू’ यांचे प्रयोगशाळेत किंवा आर्टिफिशयल इंसेमनेशनद्वारे फलन केले जाते आणि सरोगेट मातेच्या गर्भाशयात ठेवले जाते. त्यानंतर तो गर्भ नऊ महिने वाढू दिला जातो. नऊ महिन्यानंतर ते नवजात मुल पती पत्नीकडे सोपवले जातो. मुल सोपवल्यानंतर सरोगेट मातेचा त्या बळावर कायदेशीर रित्या काही हक्क राहत नाही.

 

पहिल्यांदा सरोगेट मदर होणाऱ्या स्त्रीचं वय २१ वर्षापेक्षा कमी किंवा ३५ वर्षापेक्षा जास्त नाहीना हे पाहिलं जातं. ती स्त्री गर्भधारणेसाठी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी तिची एआरटी चाचणी तसेच वैद्यकीय चाचणी घेऊन तिचा रक्तदाब, मधुमेहाची चाचणी, थायरॉइडची चाचणी केली जाते. सरोगेट आईचं लग्न आणि तिला त्यातून मुलं झाली आहेत का हे ही पाहिलं जातं. म्हणजे ती सुदृढ मुलांना जन्म देऊ शकते हे सिद्ध झालेलं असतं.

याचे कायदे अजून पूर्णपणे बनले आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. बरेचदा ती आई गरीब कुटुंबातली आणि कमी शिकलेली असते आणि हे करार इंग्रजीत लिहिलेले असतात. सर्व्हे असं सांगतात की  त्या सरोगेट आई आणि तिच्या नवऱ्याला पूर्ण वैद्यकीय प्रोसेस किंवा कराराची सगळी कलमं नीट माहिती असतातच असं नाही.

अश्या सरोगेट मदरची संख्या भारतात सर्वात जास्त आहे. अमेरिका, इंग्लंड, इस्राईल किंवा अन्य कोणत्याही देशातील पती पत्नींना भारतात येऊन सरोगेट पद्धतीने मुलाला जन्म देणे केव्हाही फायदेशीर ठरते. याचे एक कारण म्हणजे अमेरिकेत सरोगसीसाठी १,२०,००० डॉलर मोजावे लागतात तर भारतात फक्त १० ते २५ लाखात काम होऊन जाते. दुसरी बाब म्हणजे भारतातील कायदा सरोगसीसाठी पूरक असाच आहे.

 

काहीही असले तरी सरोगसीच्या माध्यमातून अनेकांना माता पिता होण्याचा आनंद मिळाला आहे हेच खरे.

सबस्क्राईब करा

* indicates required