computer

रोजच्या वापरातल्या आल्याचे हे सगळे आयुर्वेदिक औषधी गुणधर्म तुम्हाला नक्कीच माहित नसतील!!

आलं घातलेला चहा, आलेपाकाच्या वडया आणि सुंठ घातलेलं दूध यासारख्या असंख्य गोष्टींमधलं आलं आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भागच आहे. असं असलं तरी या आल्याचे काही घरगुती उपचार सोडले तर त्याच्या निरनिराळ्या रोगांमध्ये त्याच्या औषध म्हणून होणाऱ्या फायद्यापासून आपण काही प्रमाणात अनभिज्ञच असतो. आजच्या या लेखामध्ये आपण आल्याच्या काही औषधी गुणांची माहिती करून घेऊ.

परिचय - 

औषधामध्ये आल्याचा कंद वापरतात. आपण वर पाहिलेलंच आहे तरी आल्याच्या बाबतीत लक्षात घ्यायचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आलं आणि सुंठ (किंवा शुण्ठी असंही म्हणतात) हे एकच द्रव्य आहे. आल्याच्या कंदाची बाहेरची साल काढून ते वाळवलं की त्याची सुंठ बनते. आल्याची साल काढून वाळवल्यावर काही काळाने आलं दुधी रंगाचं होतं. दक्षिण भारतात काही ठिकाणी होणारं आलं पांढऱ्या रंगाचं असतं. त्यापासूनही सुंठ  बनवतात. काही वेळा आलं दुधामध्ये उकळवून वाळवूनही सुंठ बनवली जाते. यामुळेच आल्यापेक्षा सुंठ जरा धुरकट दिसते, पण मुळात ते एकच द्रव्य आहे. प्रक्रिया केलेली असल्यामुळे सुंठ आल्यापेक्षा थोडी पचायला हलकी असते. 

नाममहिमा -

आल्याला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आर्द्रक असं नाव आहे. या आर्द्रकापासूनच अपभ्रंशाने मराठीमध्ये आलं असं सुटसुटीत नाव बनलं असावं. आल्याची ग्रंथांमध्ये आलेली अशी संस्कृत नावं बघण्यासारखी आहेत – 

• कटुग्रंथि, कटुभद्र, कटूत्कट – आलं चवीला कटु म्हणजे तिखट असल्यामुळे आलेली नावं.

• विश्व, विश्वा, नागर, विश्वभेषज, विश्वौषध – अत्यंत जगप्रसिद्ध औषध असल्यामुळे आलेली नावं.

• कटूषण, उष्ण – आलं गुणाने उष्ण म्हणजे गरम असल्यामुळे आलेली नावं.

• शुण्ठी – यावरूनच मराठीतलं सुंठ हे नाव आलं.

• शृङ्गवेर – आल्याच्या कंदाच्या शिंगासारख्या विशिष्ट आकारामुळे आलेलं नाव.

• आर्द्रक, शोषण, कफारी – पाणी आणि कफ वाळवण्याच्या विशिष्ट कार्यामुळे मिळालेली नावं. 

याशिवाय आल्याला हिन्दीमध्ये सोंठ, गुजरातीमध्ये सुंठ आणि आदु, तामिळमध्ये शुक्कु किंवा इञ्जि, तेलुगुमध्ये अल्लम किंवा सोटि, बंगालीमध्ये आदा किंवा सोंठ,  अरबीमध्ये जंजबील, फारसीमध्ये शंगवीर, अदरख (आर्द्रक) आणि इंग्लिशमध्ये जिंजर या नावांनी ओळखलं जातं. आल्याचं शास्त्रीय नाव झिंजिबेर ऑफिशीनॅले (Zinzibar officinale) आहे. हे संस्कृतमधल्या शृंगबेर या शब्दापासून बनलेलं असल्याचं निश्चितपणे म्हणता येतं.

स्वरूप – 

आलं भारतभरात सगळीकडे येतं. उष्ण, दमट हवामान आल्यासाठी खूपच सोयीचं आहे. तसं हवामान असलेल्या केरळ, तामिळनाडू, कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र, आन्ध्र प्रदेश आणि बंगालमध्ये आल्याचे चांगले उत्पादन होते.

आल्याचं रोप साधारण मोठ्या झुडूपासारखं असतं. उंचीला सामान्यपणे एक ते दीड मीटर असतं आणि २ मीटर परीघापर्यंत पसरू शकतं. पानं लांब, टोकाशी निमुळती होत जाणारी आणि लांबीला सुमारे ३० ते ३२ सेंमी पर्यंत असतात.रोपाच्या मधल्या भागातून फुलाचा दांडा फुटतो. फुलाचा दांडा साधारणपणे १० सेंमीइतका उंच असतो. त्यावरील पुंकेसर गडद जांभळ्या रंगाचे असतात. 

गुण – 

आलं चवीला तिखट असतं आणि ते गुणाने उष्ण असतं. याचा स्पर्श झाल्यास आणि याचे सेवन केल्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते. आलं वात आणि कफाच्या रोगांवर चांगले काम करतं. आता आल्याचे औषधी उपयोग पाहू.

बाह्य उपयोग –

आल्याचे चूर्ण किंवा आल्याचा रस त्वचेवर लावल्यास त्या जागी लगेच चुरचुरायला लागतं आणि तिथे गरम स्पर्श जाणवतो. आलं गुणाने उष्ण आहे, आलं गरम आहे, असं जे म्हणतात ते यामुळे. आल्याच्या याच गुणाचा उपयोग अनेक अवस्थांमध्ये करून घेतला जातो. 

•    सर्दीच्या त्रासामध्ये, सर्दीमुळे डोकं दुखत असल्यास, सायनसच्या त्रासामध्ये कपाळ, नाक आणि गालांवर शुण्ठीचा पाण्यातून किंवा दुधातून लेप करतात. यामुळे अडकलेला कफ पातळ होऊन बाहेर पडतो आणि सर्दी आणि डोकेदुखीमध्ये आराम पडतो.

•    थंडी वाजून ताप येत असेल, हुडहुडी भरली असेल तर अशा वेळी अंगावर आल्याच्या चूर्णाचा किंवा आल्याच्या रसाचा लेप घातला जातो. यामुळे थंडीचा कडाका जाणवणं कमी होतं. त्याचप्रमाणे शरीर थंड पडत असेल तरी अंगावर आल्याचे म्हणजे शुण्ठीचे कोरडे चूर्ण चोळण्याचा उपाय करण्यास सांगतात.

• काही कारणामुळे शरीराच्या एखाद्या अंगाला किंवा अवयवाला बधीरता आलेली असेल तर त्या जागी आल्याच्या चूर्णाचा किंवा आल्याच्या रसाचा लेप करतात. अतिप्रमाणामध्ये घाम सुटत असेल तर अंगावर शुण्ठीचे चूर्ण घासतात.

• आल्याचा लेप हा सूज कमी करणारा, वेदना दूर करणारा असल्यामुळे सांधेदुखी, सांध्यांवर सूज येणे, सांधे जड वाटणे या अवस्थांमध्ये चूर्णाचा लेप घालतात किंवा त्या जागी आल्याचा रस चोळतात. शुण्ठीचे चूर्ण तेलामध्ये मिसळून सांध्यांवर चोळल्याने वेदनांमध्ये आराम पडतो.

पोटात घेतल्याने होणारे उपयोग – 

आलं किंवा शुण्ठीचं चूर्ण निरनिराळ्या रोगावस्थांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांबरोबर पोटात घेतल्यास चांगला फायदा होत असल्याचं आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. आता त्याबद्दल माहिती करून घेऊ.

• पचनसंस्था – 

आलं आणि शुण्ठी उत्तम पाचक, रुची देणारी, अंगाचे जडत्व दूर करणारी औषधी आहे. गरम पाण्याबरोबर आल्याची पेस्ट किंवा शुण्ठीचं चूर्ण घेतल्यास पोटात झालेले गॅसेस् खालून गुदमार्गाने बाहेर पडून जातात आणि पोट हलकं होतं. पोटफुगीमध्ये, पोट जड झाल्यास, अपचनामध्ये शुण्ठीचं चूर्ण किंवा आल्याची पेस्ट ताकात टाकून घेतात. भूक लागत नसल्यासही हाच उपाय उपयुक्त होतो. अपचनामध्ये शुण्ठीचे चूर्ण गुळाबरोबरही (आलेपाकाच्या वडया) देतात. आल्याचा रस आणि लिंबाचा रस निम्मा निम्मा घेऊन त्यात सैंधव घालून जेवणापूर्वी घेतल्यास थोड्याच वेळात कडकडून भूक लागते. त्याचप्रमाणे अजीर्णामुळे जुलाब होत असतील तर हाच आलं-लिंबाचा रस योजल्याने चांगला परिणाम साधतो. वाडगाभर दही आणि त्यामध्ये ८ ते १० चमचे आलं-लिंबाचा रस टाकून खाल्ल्यास जुलाब थांबतात. पोटात मळमळणे, तोंडात चूळ सुटणे, उलटी होणे यामध्येही शुण्ठीचं चूर्ण उपयोगी पडतं. ग्रहणी, मूळव्याधीमध्ये शुण्ठीचं चूर्ण लोण्यातून खाल्ल्यास चांगला फायदा होतो. पोटामध्ये गुब्बारा धरल्यास किंवा पोट व्यवस्थित साफ होत नसल्यास शुण्ठीचं चूर्ण आणि चमचाभर तूप किंवा एरण्डेल टाकलेलं गरम दूध पिण्यास सांगतात.

• श्वसनसंस्था – 
तिखट चव आणि उष्ण गुणधर्म यामुळे आलं आणि शुण्ठी वाढलेला कफ कमी करतात. सर्दी, खोकला, दम लागणे या रोगांमध्ये शुण्ठीचं चूर्ण किंवा आल्याचा रस मधातून घेतात. या अवस्थांमध्ये घशात फार घट्ट कफ झाला असेल, त्यामुळे सारखी खोकल्याची ढास लागत असेल तर शुण्ठीचा तुकडा तोंडात चघळल्यास कफ सुटून बाहेर पडण्यास सुरूवात होते आणि खोकल्याला उतार पडतो. या अवस्थेमध्ये गरम दुधामध्ये शुण्ठीचं चूर्ण टाकून पिण्याचा प्रघात आहे. 

• रक्तवहनसंस्था – 

आलं किंवा शुण्ठीचा उपयोग रक्तशुद्धीमध्ये होतो. यांच्या वापरामुळे सूज कमी होते, रक्तामधील कफाचं प्रमाण कमी होण्यात मदत होते. आलं किंवा शुण्ठीमुळे हृदयाला उत्तेजना मिळून हृदयाची अशक्तता दूर होते, रक्ताभिसरण सुधारते. सन्धीवात, आमवातामध्ये शुण्ठीचं चूर्ण, गूळ आणि एरण्डेलाबरोबर खाण्यास सांगतात. यामुळे सूज दूर होऊन वेदनाही कमी होतात. स्त्रियांच्या मासिकपाळीच्या त्रासामध्ये आणि नुकत्याच बाळंत झालेल्यांसाठी एरण्ड-शुण्ठी योग (सौभाग्य-शुण्ठी पाक) वापरतात. थंडी वाजून येणा-या तापामध्ये आल्याचा रस वापरतात. अनेक रोगांमध्ये आल्याच्या रसातून औषध दिलं जातं.

वापर-निषेध - 

उष्णतेच्या त्रासामध्ये, शरीरामध्ये जखम असताना किंवा रक्तस्त्राव होत असताना, उन्हाळ्यात आणि शरद ऋतूमध्ये आलं आणि शुण्ठीचा वापर टाळतात कारण त्यांच्या उष्ण गुणामुळे या लक्षणांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते.

एकूण काय, तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असणारं आणि आपल्याला आवडणाऱ्या निरनिराळ्या पदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या आल्याचे औषधी गुणही खूपच महत्त्वाचे आहेत. ते समजून घेऊन त्यांचा योग्य तो उपयोग करून घेऊन आपण आपल्या आरोग्यात चांगली सुधारणा घडवून आणू शकतो, यात कसलाही संशय वाटत नाही.

 

लेखक : डॉ. प्रसाद अकोलकर

सबस्क्राईब करा

* indicates required