computer

हिपॅटायटिस-बी व्हॅक्सिन, एचपीव्ही व्हॅक्सिन इन्फ्लुएंझा व्हॅक्सिन च्या निर्मितीत वापरलेले रिकॉम्बिनंट डीएनए तंत्रज्ञाचा शोध कसा लागला?

सजीवांचं शरीर अनेक पेशींनी बनतं हे आपल्याला माहीतच आहे. या पेशींच्या केंद्र्कामध्ये असलेल्या गुणसूत्रांमध्ये आनुवंशिकतेशी संबंधित सर्व माहिती साठवलेली असते. यात ५०% माहिती आईकडून आणि ५०% वडिलांकडून येते. मुलं अनेक बाबतीत आई/वडिलांसारखी असतात त्याचं हे कारण आहे.

आता विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की आपल्याला हव्या त्या गुणधर्मांचा डीएनए तयार करणंही माणसाला शक्य झालं आहे. म्हणजे अगदी कस्टमाईझ्ड म्हणतात तसं. विशिष्ट गुण, रूप, स्वभाव, स्वरूप असलेला सजीव निर्माण करण्याचं तंत्रज्ञान म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए. सोप्या भाषेत सांगायचं तर रिकॉम्बिनंट डीएनए म्हणजे विविध सजीवांमधील घटक एकत्र करून कृत्रिमरित्या तयार केलेला डीएनए. या अफलातून संशोधनाचं श्रेय जातं डॉ. पॉल बर्ग याला.

या बर्ग महाशयांनी एका पेशीतला डीएनए रेणूचा भाग कृत्रिमरित्या दुसऱ्या पेशीतल्या डीएनएबरोबर कसा जोडला जाऊ शकतो याची कल्पना केली आणि ती वास्तवातही आणली. १९७० मध्ये, डॉ. बर्गने जिवंत पेशीतल्या डीएनएला अतिरिक्त डीएनए जोडण्याची पद्धत शोधण्यासाठी संशोधन सुरू केलं. दोन वर्षांनंतर, डॉ. बर्ग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आलं की एसव्ही ४० हा विषाणू डीएनएच्या तुकड्यांसाठी वाहक किंवा व्हेक्टर म्हणून वापरला जाऊ शकतो. एसव्ही ४० हा विषाणू मानव आणि माकडांमध्ये आढळून येतो आणि त्याच्यामुळे काही प्रकारचे ट्यूमर्स निर्माण होऊ शकतात. डॉ. बर्ग यांनी विषाणूजन्य डीएनए मध्ये छिद्र कापण्यासाठी आणि जिवाणूजन्य डीएनएचा तुकडा त्यात बसवण्यासाठी काही एंझाइम्सचा वापर केला.

१९७६ मध्ये डॉ. बर्ग आणि त्याचा विद्यार्थी स्टीफन गॉफ यांनी एक नवीन प्रकारचा रिकॉम्बिनंट डीएनए तयार केला, आणि कल्चर्ड(कल्चर्ड म्हणजे प्रयोगशाळेतल्या वातावरणात राहू शकतील अशा) प्राणीपेशीच्या केंद्रकात सोडला. तिथे त्याच्या अनेक आवृत्त्या तयार झाल्या आणि विषाणूजन्य जीन म्हणून त्याचं कार्य सुरू झालं. त्यानंतरच्या प्रयोगांमध्ये त्याचा विद्यार्थी रिचर्ड मुलिगन सोबत डॉ. बर्गने कल्चर्ड प्राणीपेशींच्या गुणसूत्रांमध्ये एक नवीन जीन सोडला. येथे हा नवीन जीन पेशीतल्या गुणसूत्रांचा भाग असल्यासारखं कार्य करू लागला. यावरून कृत्रिमरित्या तयार केलेला डीएनए प्राणीपेशींच्या जैविक क्रियांमध्ये बदल घडवून आणतो हे सिद्ध झालं. या संशोधनाने औषधांमध्ये वापरले जाणारे घटक निर्माण करणारे जिवाणू 'तयार' करण्याचा मार्ग सापडला.

रिकॉम्बिनंट डीएनएचा उपयोग व्हॅक्सिनपासून नवीन ऊर्जास्त्रोतांच्या निर्मितीपर्यंत अनेक महत्त्वाच्या औद्योगिक प्रक्रियांसाठी होतो. मानवी संप्रेरकं आणि इंटरफेरॉनसारख्या वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाच्या नैसर्गिक पदार्थांचा नव्याने पुरवठा करण्यासाठी तो आधीच वापरला गेला आहे. १९८६ मध्ये हिपॅटायटिस-बी व्हॅक्सिन, २००६ मध्ये एचपीव्ही व्हॅक्सिन (हे स्त्रियांना गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देतं.) आणि २०१३ मध्ये इन्फ्लुएंझा व्हॅक्सिन च्या निर्मितीत या तंत्राचा वापर केला गेला.

या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी पॉल बर्गला १९८० चं रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं.

सबस्क्राईब करा

* indicates required