computer

भाग १ : निर्माण केलेलं जैविक अस्त्र त्या देशावरच उलटतं तेव्हा.. कसं, केव्हा आणि कुठे घडलं हे??

तुम्हाला लहानपणी वाचलेल्या मुलांच्या मासिकातल्या कथा आठवतात का? या कथांमध्ये बर्‍याच वेळा 'विषकन्या' असा उल्लेख असायचा. विषकन्या म्हणजे बालपणापासून विषाच्या मात्रा देऊन वाढवलेली मुलगी! ही मुलगी मोठी झाली की तिच्यासोबत संग करणारा माणूस तिच्या विषाने मरण पावायचा. आपण वाचलेल्या कथांमध्ये अशा विषकन्या कट करून राजाकडे पाठवल्या जायच्या आणि मग त्यामुळे राजाच्या जीवाला धोका उत्पन्न व्हायचा. चंद्रकांता मालिकेतपण अशा विषकन्या पाह्यल्याचं तुम्हांला आठवत असेलच.

वाचकहो, सांगायची गोष्ट अशी आहे की शत्रूला गारद करण्यासाठी असे प्रयोग करण्याचे दुष्ट विचार अगदी पुरातन काळापासून मानवी मनात खदखदत आहेत. आता नव्या काळात फक्त प्रयोगांची दिशा बदलली आहे आणि विषकन्येची जागा जंतूंनी घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रांची त्याला जोड मिळाली आहे आणि या प्रयोगाला जैविक युध्द ((Biological Warfare) असे नवे नाव मिळाले आहे. तोफ-बंदूकांच्याऐवजी शत्रूवर जंतूंच्या माध्यमातून हल्ला करून त्याला संपवणे म्हणजे जैविक युध्द!! हे एक महाभयानक अस्त्र आहे. जैविक युध्दाची तयारी करताना एखादी चूक झाली तर ते अस्त्र उलटू पण शकते. अशा उलटलेल्या करणीतून सोव्हिएत रशियाच्या निष्पाप नागरिकांना काय भोगावे लागले याची कथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय घडलं?

(स्वेर्ड्लॉव्स्क)

ऑक्टोबर १९७९ सालची गोष्ट आहे. पश्चिम जर्मनीच्या एका वृत्तपत्रात सोव्हिएत रशियात झालेल्या अपघाताची बातमी आली होती. या बातमीत असे म्हटले गेले होते की रशियातल्या  स्वेर्ड्लॉव्स्क (एकटेरीनबर्ग) शहरात एका सरकारी कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे 'अँथ्रॅक्स'या जीवघेण्या आजाराचे जंतू हवेत उत्सर्जित झाले आहेत. परिणामी हजारो लोक अँथ्रॅक्समुळे मरण पावले आहेत. थोड्याच दिवसात ही बातमी सर्वत्र पसरली आणि अमेरिकेतल्या मोठमोठ्या वृत्तपत्रांनी या बातमीचा पाठपुरावा करायला सुरुवात केली. सोव्हिएत रशियाने पण ताबडतोब या वृत्ताला दुजोरा दिला, पण त्यात असे म्हटले की जंतू उत्सर्जनाच्या अपघाताची बातमी खोटी आणि अतिरंजित आहे. काही नागरिकांचा मृत्यू 'अँथ्रॅक्स' ने झाला हे सत्य असले तरी ते जंतू दूषित मांसाहारातून आलेले आहेत. हवेतून उत्सर्जित झालेले जंतू ही बातमी देणे हा अमेरिकेचा रशियाला बदनाम करण्याचा डाव आहे. असे बदनामीचे अनेक प्रकार त्या काळात दोन्ही बाजूंनी होत असत, हे सगळ्यांना माहित असल्याने सुरुवातीला या बातमीला फारसे महत्व मिळाले नाही. पण काहीच दिवसांत मूळ बातमी खरी असल्याचे पुरावे आणि अँथ्रॅक्सने मरण पावणार्‍या लोकांची संख्या वाढल्यावर सत्य जगासमोर आलेच!

अँथ्रॅक्स म्हणजे काय ?

(अँथ्रॅक्स)

अँथ्रॅक्स हा एक बॅक्टेरियाचा प्रकार आहे. जमिनीत बिजाणूंच्या रुपातले हे जंतू सर्वत्र आढळतात. चार्‍यासाठी फिरणार्‍या शेळी-बकरी-मेंढ्यांसारख्या प्राण्यांना या अँथ्रॅक्सचा संसर्ग होऊ शकतो. माणसाला या जमिनीतल्या बिजाणूंचा संसर्ग हातावरच्या जखमांतून होऊ शकतो. अशा संसर्गात मृत्यूची शक्यता फार कमी असते. पण हेच अँथ्रॅक्सचे बिजाणू हवेत उधळलेले असतील, तर मृत्यूची शक्यता ८५ टक्के इतकी असते. हवेतून अँथ्रॅक्सचे जंतू फुफ्फुसात पोहचले की ४८ तासात त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. सुरुवातीला घसा दुखणे, अंग मोडून येणे, धाप लागणे अशी लक्षणे दिसतात. पुढच्या काही दिवसांत कफासोबत रक्त पडायला सुरुवात होते, ताप वाढतो, मेंदूला सूज येते, छाती-गळ्यावर काळे चट्टे पडतात आणि आठवड्याभरात खेळ खल्लास!!

सोव्हिएत रशिया हे प्रयोग का करत होती?

(स्वेर्ड्लॉव्स्क )

खरं सांगायचं झालं तर अमेरिकेसह सगळेच देश हे प्रयोग करत होते आणि करत असतात. दुसर्‍या महायुध्दानंतर या प्रयोगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. या प्रयोगातले धोके सगळ्याच देशांना माहिती होते. पण स्पर्धेत माघार घेण्याचा विचार कोणीही करत नव्हता हे ऐतिहासिक सत्य आहे. १९६९ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी या प्रयोगांवर बंदी घातली. १९७२ साली जगातल्या सर्वच देशांनी एकत्र येऊन जैविक आयुधांवर आणि जैविक युध्दांवर कायमची बंदी आणण्याच्या करारावर सह्या केल्या. हा करार झाला, पण संशोधनावर त्यात बंदी आणली नव्हती. त्यामुळे संशोधनाच्या बुरख्याआड सगळ्या देशांचे उपदव्याप चालूच राहिले. या उपद्व्यापाचा परिणाम म्हणजे १९७९ साली रशियात घडलेला अपघात!!

पण अँथ्रॅक्सच का? 

कारणं अनेक आहेत. जैविक अस्त्रे बनवायला खर्च कमी येतो हे त्यांपैकी एक! अँथ्रॅक्सचे बिजाणू वर्षांनुवर्षं पावडरीच्या स्वरुपात साठवून ठेवता येतात हे दुसरे महत्वाचे कारण. अँथ्रॅक्सच्या संसर्गाने आठवडाभरात मृत्यु येतो आणि मरण्याची शक्यता ८५ % असते ही पण यामागची महत्वाची कारणे आहेत. रशियाला दूषणं देणार्‍या अमेरिकेने पण अशाच प्रकारचे सहा बिजाणू १९४९ सालीच विकसित केले होते. शत्रूपक्षावर हवाई हल्ल्यातून हे जैविक अस्त्र वापरले जाणार होते. थोडक्यात सांगायचे तर, हे दोन्ही देश "एकाच लेंडाचे कुडके -एक परिमाळता, एक घाणता" या व्याख्येत बसणारे होते!!

पुढे काय झालं? 

अमेरिकन सरकारचा अर्थातच 'दूषित मांसाहार' या कारणावर विश्वास बसला नव्हता. पुढच्या काही महिन्यांत मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत गेली. हा संसर्ग दूषित मांसाहारामुळे झाला असता तर विक्रीवर नियंत्रण आणून संसर्ग थांबवता आला असता.  पण तशी लक्षणे दिसत नव्हती. रशिया अमेरिकन मिडियाला दोष देत राहिली. हवेतला जंतू उत्सर्ग ही केवळ एक कल्पना आहे या मताला अनेक अमेरिकन शास्त्रज्ञ दुजोरा द्यायला लागले होते. आणि सत्य अखेरीस उघडकीस आलेच!

(अँथ्रॅक्स बाधित क्षेत्र)

१९८८ साली प्योत्र बुर्गासोव्ह नावाचा एक शास्त्रज्ञ रशियातून पळून अमेरिकेच्या राजाश्रयाला आला. तो येताना अँथ्रॅक्स प्रकरणाची कागदपत्रे, फोटो आणि मृत्यूमुखी पडलेल्यांचे पोस्टमार्टेम रिपोर्ट घेऊन आला. या पोस्टमार्टेम अहवालात काही तृटी होत्या. मृत्युमुखी गेलेले सर्वजण तरुण वयाचे होते. यावरून अशाही अफवा पसरल्या की फौजेत जाऊ शकतील अशा वयाच्या पुरुषांच्या मृत्यूसाठी हे प्रयोग रशियाने घडवून आणले होते. अशा अनेक चर्चा होत राहिल्या. पण १९९२ साली रशियाचे अध्यक्ष जेव्हा अमेरिकेच्या भेटीस अमेरिकेत आले तेव्हा त्यांनी अमेरीकन राष्ट्राध्यक्ष बुश यांना कबुली दिली की १९७९ साली झालेला जंतूसंसर्ग जैविक अस्त्रे बनवणार्‍या कारखान्यातील अपघातानेच झाला होता. तेव्हा ते त्या प्रांताचे पक्षाध्यक्ष होते आणि त्यामुळे या प्रकरणाची त्यांना पूर्ण कल्पना होती. या कबुलीनंतर उघडकीस आले एक भयानक नवे प्रकरण-बायोप्रीपरॅट!!

सबस्क्राईब करा

* indicates required