computer

भाग २ : चीन सोडा, जाणून घ्या रशियाच्या जैविक अस्त्रं तयार करण्याच्या प्रयोगाबद्दल!! किती कारखाने आणि माणसं या कामात गुंतली होती?

भाग १ : निर्माण केलेलं जैविक अस्त्र त्या देशावरच उलटतं तेव्हा.. कसं, केव्हा आणि कुठे घडलं हे??

 

हे काय प्रकरण होते?

१९७२ साली सोव्हिएत रशियाने जैविक अस्त्रांवर बंदी घालणार्‍या करारावर सह्या केल्या. पण वर्षभरातच ५०००० माणसं भरती करून ५२ वेगवेगळ्या ठिकाणी जैविक अस्त्रांची निर्मिती सुरु केली. या उपक्रमाचे नाव होते बायोप्रीपॅरॅट!!

अँथ्रॅक्स जंतूंचे प्रसारण ज्या कारखान्यातून झाले त्याचे गुप्त नाव (कोड नेम) होते कंपाउंड 19-A. अशा अनेक वेगवेगळ्या कारखान्यांतून रशिया शेकडो टन वेगवेगळ्या जातीच्या डझनावारी जंतूंची निर्मिती करून साठवण करत होता. ज्या प्योत्र बुर्गासेव्ह(पिटर बर्गासेव्ह) चा उल्लेख आधी केला आहे, तो पण अशाच एका कारखान्यात काम करत होता. उरल समुद्राच्या आसपास असलेल्या एका शहराजवळ स्मॉल पॉक्स म्हणजे देवीचे जंतू बनवण्याची कामगिरी तो करत होता. अशाच एका प्रयोगादरम्यान हे देवीचे जंतू हवेत पसरले. दहा माणसांना लागण झाली. तीनजण मरण पावले. सांगायचा मुद्दा असा आहे की असे अपघात या उपक्रमात होत होते, पण फक्त अँथ्रॅक्स प्रकरण उघडकीस आले आणि बाकी प्रकरणे दाबली गेली.

हो, पण हा अँथ्रॅक्सचा अपघात नेमका झाला कसा?

(अँथ्रॅक्सच्या पहिल्या काही बळींमधला एक वसिली इवानोव याचं थडगं)

हे समजून घेण्यासाठी या नाटकात आणखी एका पात्राची ओळख आपण करून घेऊ या.

याचे नाव आहे केन अ‍ॅलिबेक. हा माणूसही पीटरसारखाच रशियातून पळ काढून अमेरिकेच्या आश्रयाला आला होता. त्याचे रशियन नाव होते Kanatzhan Alibekov. केनच्या निवेदनाप्रमाणे अँथ्रॅक्स तयार करण्याची रेसिपी रशियन शास्त्रज्ञांना जपानच्या कागदपत्रांतून मिळाली होती. दुसर्‍या महायुध्दात जपान जैविक अस्त्रे बनवण्यात अग्रेसर असल्याने हे होणे सहज शक्य होते. अँथ्रॅक्स ८३६ नावाचे जंतू अस्त्रे म्हणून बनवण्याची जबाबदारी डेप्युटी डायरेक्टर म्हणून या केनच्या खांद्यावर होती. ज्या दिवशी हा अपघात झाला त्या दिवशी सकाळच्या पाळीत कारखान्यातून बाहेर पडणारी हवा गाळणारा एक फिल्टर जाम झाला होता. तो फिल्टर काढून ठेवण्यात आला. पण लॉगबुकमध्ये एंट्री करण्याची राहून गेली. परिणामी दुपारच्या पाळीत आलेल्या कामगाराने फिल्टर जागेवर न लावताच काम सुरु केले आणि अँथ्रॅक्स जंतूंची धूळ जवळच्या शहरात पसरली. काही तासांनी हा घोटाळा लक्षात येऊन फिल्टर लावेपर्यंत फार उशीर झाला होता. शहरावर अँथ्रॅक्सचे ढग जमा होऊन व्हायची ती हानी झालीच होती.

पुढे काय झालं?

अशा घोटाळ्यांत पुढे काय होतं हे जगाला कधीच कळत नाही. हे कारखाने तसेच चालू राहिले की अमेरिका-रशियाचे शीतयुध्द संपल्यावर बंद पडले हे कळायला मार्ग नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की सत्तेची पिपासा या जगातल्या महाशक्तींना अमानवी कृत्ये करायला भाग पाडते. बोरीस येल्त्सीन यांनी या सर्व प्रकरणाची स्पष्ट कबुली दिली खरी, पण अशा अनेक घटना घडल्या असतील ज्या आजही जगासमोर आलेल्या नाहीत. अमेरिकेच्या माध्यमातून या अपघाताची माहिती आपल्यासमोर आली. पण स्वतः अमेरिकाही असेच अमानवी उद्योग करत असते. उडदामाजी काळे गोरे असे काहीच नसते हे खरे! 

यानंतर कधीतरी अमेरिकेच्या काही भयानक अमानवी उद्योगांची कहाणी आम्ही तुम्हाला सांगूच, पण आता आम्ही वाट बघतो आहे तुमच्या कमेंटसची!

सबस्क्राईब करा

* indicates required