computer

इस्राईलने कोरोनावर रामबाण म्हणून आणलाय नेझल स्प्रे!! हा उपाय नक्की काय आहे?

गेले वर्षभर कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. या आजारावर आता लस उपलब्ध झाली असली तरी, अजूनही हे संकट पूर्णत: टळलेले नाही. लसी व्यतिरिक्तही यावर अजून काही औषधोपचार शोधता येतात का याचीही चाचपणी अजून काही ठिकाणी सुरू आहे. इस्राईलच्या सॅनोटाइझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्प. या बायोटेक कंपनीने अशा आजारांना कारणीभूत ठरणारे विषाणुंचा प्रसार सुरुवातीच्या टप्प्यातच रोखता येण्यासाठी एका नेझल स्प्रेचा शोध लावला आहे. गेली बरीच वर्षे असे नाकाद्वारे घेण्याच्या नेझल स्प्रेचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठी करण्याचा प्रयत्न अनेक कंपन्या करत आहेत. नाकातून श्वसनाद्वारे औषध थेट फुफ्फुसात पोहचले की त्याचा शरीराला ताबडतोब वापर करता येतो. कोव्हीड संसर्गाचा तर मार्गच नाकाद्वारे असल्याने हा 'एंट्री पॉइंट' सुरक्षित ठेवण्याचे काम या स्प्रेद्वारे करणे कंपनीला सयुक्तिक वाटते यात शंकाच नाही. त्यांच्या या स्प्रेला इस्राईल सरकारकडूनही नुकतीच परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता हा स्प्रे इस्राईलच्या औषधालयातून उपलब्ध होणार आहे.

 

डॉ. गिली रेगेव्ह यांनी या नेझल स्प्रेचे संशोधन केले आहे. त्यांच्या मते कोव्हीड-१९ची लागण रोखण्यास हा स्प्रे खूपच फायदेशीर ठरेल. त्यांच्या मते, “अनेक ठिकाणी लोकं लसीची वाट पाहत आहेत. लोकांपर्यंत जर आमचा हा स्प्रे पोहोचला तर नक्कीच कोरोनाचा प्रभाव कमी होऊ शकतो. विशेष म्हणजे हा स्प्रे अगदी किफायतशीर असून मोठ्या प्रमाणावर लोक याचा फायदा घेऊ शकतील. शिवाय, यामुळे कोरोनाचा जो झपाट्याने संसर्ग होत आहे त्यालाही आळा बसेल. फक्त कोरोनाच नाही तर श्वसनाच्या कोणत्याही आजारासाठी हा स्प्रे तितकाच प्रभावी आणि फायदेशीर ठरेल.” डॉ. गिली रेगव्ह हे सॅनोटाइझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्प. कंपनीच्या संस्थापिका आहेत.

हा नेझल स्प्रे ९९.९% विषाणू मारू शकतो असा या कंपनीचा दावा आहे. इस्राईलच्या फॅक्टरीतून आता याचे उत्पादन सुरू झाले आहे. अनेक प्रकारच्या विषाणूंवर हा स्प्रे परिणामकारक असल्याचे याच्या प्रयोगशाळेतील वापरावरून सिद्ध झाले आहे. कोरोनाचा जो नवा स्ट्रेन आला आहे त्यावरही हा स्प्रे तितकाच परिणामकारक ठरू शकतो. या विषाणूत कितीही बदल झाले तरी त्यामुळे या स्प्रेचा प्रभाव कमी होऊ शकणार नाही. या स्प्रेमधील प्रतिजैवकाचा आवाका इतका मोठा आहे की, कोणत्याही विषाणूचा टिकाव लागू शकणार नाही. ज्यामुळे सर्व प्रकारचे विषाणू या स्प्रेने संपून जातात.

सॅनिटायझरमुळे जसे हातावरील सर्व प्रकारच्या विषाणूंचा नयनाट होतो अगदी त्याच प्रकारे हा स्प्रे नाकातील विषाणूंचा नायनाट करतो. थोडक्यात काय तर हा स्प्रे म्हणजे नाकासाठीचा सॅनिटायझरच आहे. या स्प्रेमुळे नाकातून शिरकाव करण्याऱ्या विषाणूंच्या मार्गात अडथळा निर्माण होतो ज्यामुळे हे विषाणू शरीरात खोलवर प्रवेश तर करू शकत नाहीतच, पण तिथल्या तिथेच नष्ट होऊन जातात. स्प्रेमध्ये असलेल्या नायट्रिक ऑक्साईडमुळे हे विषाणू श्वसन मार्गातच मारले जातात.

इस्राईलने सर्वात आधी हा स्प्रे आपल्या नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. इस्राईलच्या आरोग्य खात्याने यासाठी परवानगी दिली आहे. १२ वर्षाच्या वरील कोणीही व्यक्ती हा स्प्रे वापरू शकते. म्हणून ज्यांना लस लागू होत नाही अशा वयोगटातील व्यक्तींसाठीही हा स्प्रे वापरता येईल. त्यामुळे हा स्प्रे म्हणजे अनेकांसाठी वरदानच आहे.

हा स्प्रे बाहेरच्या देशांना विकण्यासाठी अजून इस्राईलने परवानगी दिलेली नाही. सध्या त्यांनी फक्त न्यूझीलंडलाच हा स्प्रे देण्याचे ठरवले आहे. इतर देशही हा स्प्रे आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी इस्राईल सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहे.

नेस झीओना या कंपनीने मे पर्यंत या स्प्रेच्या दोन ते पाच लाख बॉटल्स उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली आहे. यापेक्षा जास्त बॉटल्स निर्माण करण्याची क्षमता वाढवण्यावरही भर देण्यात येणार आहे. ज्यामूळे इतर देशांतील नागरिकांनाही या स्प्रेचा वापर करता येईल.

कोरोना महामारी येण्याआधीच या स्प्रेचे संशोधन झाले होते. अनेक प्रकारच्या फ्लूमध्ये प्रभावी ठरेल असा स्प्रे निर्माण करण्याच्या उद्देशानेच याचे संशोधन करण्यात आले होते. नायट्रिक ऑक्साईडचा प्रयोग यापूर्वी फक्त दवाखान्यातून तोही मोठमोठ्या सिलिंडरमधूनच केला जात असे. हाच नायट्रिक ऑक्साईड थोडक्या प्रमाणात पॅकिंग करून त्याचा वापर केला तर तो कितपत प्रभावी ठरेल यावर आधीपासूनच संशोधन सुरू होते. १२ वर्षानंतर या प्रयोगाला आता कुठे यश मिळाले.

वर्षभरा पूर्वीच हा स्प्रे बाजारात उपलब्ध करून देणे शक्य होते, पण त्यासाठी अजून या कंपनीला सरकारने परवानगी दिली नव्हती. परवनागी मिळण्याची ही प्रक्रिया जर गेल्याच वर्षी पूर्ण झाली असती तर आतापर्यंत कोरोनाने जितका हाहाकार उडाला आहे तो थोडाफार तरी आटोक्यात आला असता. या स्प्रेमुळे संक्रमण होण्याचे प्रमाण कमी झाले असते आणि त्यामुळे होणारे मृत्यूही टाळता आले असते.

युकेच्या एनएचएस फाउंडेशननेही या स्प्रेची चाचपणी करून पहिली. त्यांनी या स्प्रेच्या वापराला हिरवा झेंडा दाखवला आहे. या फाउंडेशनने हा स्प्रे सर्वप्रकारच्या विषाणूंना रोखण्यासाठी प्रभावी असून कोरोनाची तीव्रताही यामुळे कमी होते, तसेच या स्प्रे वापरल्याने कोरोना रुग्णांमध्ये लवकर फरक पडलेला असल्याचे दिसून आल्याचे मान्य केले आहे.

एका संशोधनात कोरोना प्राण्यांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण प्राण्यांमध्ये याचे संक्रमण होत नसल्याचे आढळून आले. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी या अभ्यासातून संशोधकांना काही महत्वाची माहिती मिळाली. फक्त कोरोनाच नाही तर इथून पुढेही अशा प्रकारचे साथीचे आजार पसरवणारे विषाणू आले तरी, त्यावर प्रभावी ठरेल असे औषध शोधण्याचा संशोधक प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून डॉ. जिल रॉबर्ट्स यांनी मोलन्यूप्रिव्हर नावाची एक गोळी शोधली आहे. डॉ. जिल रॉबर्ट्स या साथरोग विशेषतज्ञ आहेत.

या औषधाचे संशोधन आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. शेवटच्या या टप्प्यावर यश मिळालेच तर हे औषधही लवकरच उपलब्ध होईल. हे औषधही अनेक प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरणार आहे. SARS आणि MERS कुळातील विषाणूंवर हे औषध प्रभावी ठरेल असे डॉ. जिल यांचे मत आहे. एफडीएकडे हे औषध आता ट्रायलसाठी पाठवण्यात आले आहे. त्याला लवकरात लवकर परवानगी मिळेल अशी अशी अपेक्षा आहे.

या औषधाचा एक मोठा फायदा म्हणजे हे औषध गोळ्यांच्या स्वरुपात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे यासाठी रुग्णालयात दाखल झाले पाहिजे असेही नाही. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली रुग्णाला घरी राहूनही या औषधाचा वापर करता येईल.

एकूणच काय तर यावर्षात कोरोना आणि तत्सम साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही आशादायी मार्ग निर्माण झाले आहेत.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required