दुसरं महायुद्ध आणि आता कोरोना विषाणू...१०४ वर्षांच्या आजोबांचा पराक्रम वाचलात का?
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले आणि मृत्यू झालेले रुग्ण वाढत असताना काही चांगल्या बातम्याही येत आहेत. १०४ वर्षांच्या अमेरिकन आजोबांनी दुसरं महायुद्ध आणि COVID-19 आजाराशी यशस्वी लढा दिला आहे.
या आजोबांचं नाव आहे विल्यम "बिल" लॅप्सीज. विल्यम आजोबा दुसरं महायुद्ध, जागतिक महामंदी आणि जीवघेण्या स्पॅनिश फ्ल्यू मधून सुखरूप वाचले आहेत. आयुष्याच्या शेवटी सुद्धा त्यांना कोरोना सारख्या विषाणूशी लढावं लागलं.
५ मार्च रोजी विल्यम यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचं सिद्ध झालं होतं. ओरेगॉन येथील त्यांच्या घरात राहणाऱ्या १५ जणांनाही संसर्ग झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं की विल्यम काही यातून वाचू शकत नाहीत, पण आजोबा एकदम ठणठणीत बरे झाले. योगायोग म्हणजे ३१ मार्च पर्यंत त्यांनी आजारावर मात केली आणि १ एप्रिल रोजी आपला वाढदिवस साजरा केला.
इटलीच्या आजोबांची पण अशीच काहीशी गोष्ट आहे. इटलीत रोज ५०० हून अधिक माणसांचा जीव जात असताना १०१ वर्षांचे आजोबा मात्र सुखरूप घरी गेले आहेत. या आजोबांचं नाव आहे मिस्टर पी. त्यांचा जन्म पहिल्या महायुद्धाच्यावेळी झाला. १९१८ साली आलेल्या स्पॅनिश फ्लू मधून ते सुखरूप वाचले. पुढे दुसऱ्या महायुद्धातूनही ते वाचले. सध्याच्या कोरोना विषाणूलाही त्यांनी हरवलं आहे.
१०० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आजोबांना जर कोरोनावर मात करता येऊ शकतं तर आपल्यालाही ते जमू शकतं. म्हणूनच घरात राहा आणि सुखरूप राहा.




