computer

घाट आणि कोकणाला जोडणारे अमृतांजन प्रवेशद्वार इतिहासजमा!! त्याबद्दल या गोष्टी तुम्हांला माहित आहेत का?

जनमानसातली एखादी व्यक्ती कालवश झाली की त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रात एक लेख लिहिला जातो ज्याला ऑबीट (ऑबिचुअरी) म्हटलं जातं. आजचा आमचा लेख ऑबीटच आहे, पण तो एखाद्या व्यक्तीसाठी नव्हे तर खंडाळ्याच्या घाटातल्या अमृतांजन पूलासाठी आहे.   बोर घाटातला अमृतांजन ब्रिज काल महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशनने(MSRDC) स्फोटकांच्या मदतीने पाडला. सोबतच आपल्या मनातला तो अमृतांजन ब्रिजपण जमीनदोस्त झाला. लहानपणच्या बर्‍याच आठवणी ज्या खंडाळ्याच्या घाटाशी जोडलेल्या आहेत, त्याचा अमृतांजन ब्रिज हा एक भाग होता. नव्या एक्सप्रेस हायवेच्या वाटेत येणारा हा पूल इतका धोकादायक झाला आहे की तो कधीही कोसळेल हे कारण कितीही सज्जड असले तरी त्या वळणावर अमृतांजन ब्रिजची आठवण आणखी काही वर्षे येतच राहिल. 

हा अमृतांजन ब्रिज एका मोठ्या इतिहासाचा भाग होता. १८५३ साली पहिली रेल्वेगाडी ठाण्याला पोहचली. पुढच्या दहा वर्षांतच बोरघाटातून रेल्वेमार्ग बांधला गेला आणि पुणे -मुंबईतला दुरावा संपला. एका बाजूस कोकण आणि दुसर्‍या बाजूस घाट यांना जोडणारा हा पूल नव्हता, तर ते प्रवेशद्वार होतं. त्या पुलाच्या खालच्या संगमरवरी शिलालेखावर हा 'दरवाजू -गेटवे ' असल्याचा उल्लेख आहे. कालांतराने इथे अमृतांजन पेन बामचा मोठ्ठा बोर्ड लागला आणि आपण त्याला अमृतांजन ब्रिज म्हणून ओळखायला लागलो.

आज या निमित्ताने हा घाटाचा रस्ता किती अवघड परिस्थितीत तयार झाला हे पण आठवावे लागेल. 

जवळजवळ १८ मैलाचा हा घाटातला रस्ता बांधताना किती नियोजन करावे लागले असेल याची आज कल्पना येणार नाही. तो काळ जेसीबी आणि पोक्लेनचा नव्हता. सारी मदार मनुष्यबळावर होती. हजारो मजूर डोक्यावरून माती घेऊन दूरवर नेऊन टाकायचे. आकड्यात सांगायचे झाले तर साडेसहालाख क्यूबिक यार्ड इतकी माती इकडून तिकडे टाकण्यात आली. अनेक मजूर, इंजिनिअर यांना या कामात मृत्यूपण आला. मराठी लेखिका शुभदा गोगटे यांनी ’१०,००० प्राणांच्या आहुतीमधून साकारलेल्या खंडाळ्याच्या घाटासाठी’ या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे, त्याचा उल्लेख इथे नक्कीच करायला हवा. दर मैलामागे सहा लाख आणि एकूण खर्च एक कोटीच्यावर असे खर्चाचे एकूण अंदाजपत्रक होते. या कामावर कारकुनाला १० रुपये तर अधिकार्‍याला २५ रुपये पगार होता. 

त्या काळात या पुलावर रिव्हर्सींग स्टेशन होते असाही उल्लेख वाचायला मिळतो. घाटाची चढण इतकी होती की एका रेल्वे इंजिनची ताकद रेल्वेसाठी अपुरी पडायची.  अशावेळी आणखी एक इंजिन जोडून घाट पार केला जायचा. १९३० नंतर जादा ताकदीची इंजिन्स आल्यावर या स्टेशनची गरजच संपली, पण या प्रवेशद्वाराचे नाव ब्रिज असेच राहिले.

आणि आजच्या काळात हा एक ब्रिज पाडण्याचा खर्च किती आला असेल  हे वाचले तर आपण काळाच्या ओघात कुठे पोहचलो आहोत ते कळेल. २०१९ साली हा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हाच्या टेंडरमध्ये या कंत्राटाची ८१ लाख ५७ हज्जार २५३ ही अंदाजे रक्कम वाचायला मिळते. वाचकांच्या सोयीसाठी टेंडरचे चित्र सोबत जोडत आहोत.

सध्या तुरळक रहदारी असताना हे काम संपवण्यात आले हे योग्यच झाले. कारण इतरवेळी हे काम करताना खर्चात कमीतकमी चार कोटींची भर पडली असती. 

आता पाहू या काही कालची क्षणचित्रे.

हा पूल मुंबई-पुणेकरांच्या मनात बऱ्याच आठवणींसह साठवला गेलाय. तो पाडला गेल्यावर बोभाटाचा सुहृद आणि हितचिंतक ऋषिकेश दाभोळकरांनी व्यक्त केलेलं मनोगत इथे दिल्यावाचून राहावत नाही.

इतिहासाला जोडणारे असे जुने काही तुमच्याही गावात असेल तर त्याचा उल्लेख नक्की कमेंटमध्ये करा!!

 

सबस्क्राईब करा

* indicates required