computer

मिस्टर मॅन ऑफ द होल : गेली २२ वर्षे लॉकडाऊनमध्ये जगणारा आदिवासी माणूस !!

दोन आठवडे घरात बसून कंटाळलेल्या लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत तब्बल बावीस वर्षं एकांतवासात एकटाच राहणार्‍या एका माणसाची गोष्ट! 

तर या माणसाचं नाव काय? तर त्याला नावच नाही. ब्राझिलमधल्या अ‍ॅमेझॉन नदीच्या जंगलात राहणारा एका आदिवासी जमातीचा तो शेवटचा माणूस आहे इतकंच काय ते जगाला माहीती आहे. त्याचं नाव माहिती नसल्याने आपल्या जगातल्या माणसांनी  त्याला नाव दिलंय 'मॅन ऑफ द होल'!!

हे नाव देण्यामागे एक विचित्र कारण आहे. हा माणूस अनेक वेगवेगळ्या ठिकाणी घर बांधून राहतो. काही दिवसांनी ते घर सोडून दुसरीकडे जातो. त्याच्या सोडून दिलेल्या घराचा तपास केला तर प्रत्येक घराच्या जमिनीत एक खड्डा खोदलेला आढळतो. सहसा शिकार करण्यासाठी असे खड्डे खणले जातात. पण हा खड्डा या माणसाच्या घरात असतो आणि तो अरुंद पण जवळजवळ सहा फूट खोल खणलेला असतो. थोडक्यात, हा खड्डा म्हणजे एक न सुटलेलं कोडं आहे.

ब्राझिल सरकारने मात्र त्या एकटा राहणार्‍या माणसाच्या सुरक्षेसाठी काही चौरस मैलांचा परिसर मोकळा ठेवून  त्याच्या मर्जीनुसार राहण्याचे स्वातंत्र्य देण्याचे ठरवले आहे. त्याच्या परिसरात इतरांनी घुसखोरी करू नये म्हणून 'फुनाई' नावाची सरकारी संस्था काळजी घेत असते. अधूनमधून त्याच्या अंगणात सरकार खाण्यापिण्याच्या सामानाची पार्सलं टाकत असते.  पण १९९६ नंतर तो माणूस कोणाच्याही नजरेस आलेला नाही. तो आहे हे नक्की, पण तो कोण याचा उलगडा आजही झालेला नाही. 

२००९ साली एका घुसखोराने त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. पण त्या हल्ल्यातून तो निसटला.

दक्षिण अमेरिकेच्या जंगलात अशा प्रकारे अनेक आदिवासी राहतात. पण त्यांच्यासोबत जमातीची माणसं असतात. ब्राझिल, पेराग्वे, बोलिव्हीया, कोलंबिया, इक्वॅडोर, पेरू, व्हेनेझ्युएला या देशात बर्‍याच आदिवासी जमाती नागरी जीवनात न मिसळता राहतात. पण गेली २२ वर्षं एकटा राहणारा हा मिस्टर मॅन ऑफ द होल एकटाच आहे.

या 'मॅन ऑफ द होल'च्या शोधात फिरणार्‍या एका टीमने चित्रित केलेला एक व्हिडिओ २०१८ साली प्रकाशित केला होता, तो आठवणीने बघा.

आज आपल्याला लॉकडाऊनमध्ये राहाणं अवघड जात आहे, गरजेपुरत्या वस्तू आणून त्यात निभावणं कठीण जातंय. पण हा मॅन ऑफ द होल एकटाच इतक्या मोठ्या जंगलात कसा राहात असेल??

जाताजाता एका दुसऱ्या बाजूचा विचार करू. तुम्ही "द गॉडस मस्ट बी क्रेझी" नावाचा सिनेमा पाह्यलाय का? नसेल तर सध्या रिकामेच आहात, पाहून घ्या. हा सिनेमा साऊथ आफ्रिकेतला सगळ्यात जास्त पैसे कमावणारा सिनेमा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यात एक असाच आधुनिक जगाची ओळख नसलेला आदिवासी आपल्या जगात आल्यावर काय गंमत होते हे दाखवलं आहे. सिनेमा "पाहाल तर खूप हसाल आणि न पाहाल तर फसाल" छापाचा आहे. गंमत म्हणजे या सिनेमातला आदिवासी हा खरोखरी आदिवासी होता आणि त्याला पैसे काय असतात आणि त्यांचं काय करायचं हे ही माहित नव्हतं. त्याची पूर्ण गोष्ट पुन्हा कधीतरी. पण हा 'मॅन ऑफ द होल' खरंच आपल्या जगात आला तर??

सबस्क्राईब करा

* indicates required