computer

फक्त पावसाळ्यात दर्शन देणारे ११ भारतीय प्राणी !!

राव, पावसाळ्यात बेडकं बाहेर निघतात हे आपल्याला माहित आहेच, पण संपूर्ण भारतीय महाद्वीपात तब्बल ११ दुर्मिळ प्रजातीचे प्राणी आहेत जे फक्त पावसाळ्यातच बाहेर निघतात. हे कदाचित आपल्याला माहित नसेल. या दुर्मिळ प्रजाती बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही की अशा वेगळ्या प्रकारच्या प्रजाती भारतात देखील आढळतात.

चला तर आज बघुयात फक्त पावसाळ्यात बाहेर पडणारे ११ दुर्मिळ जीव.

१. हिमालयन न्यूट

‘हिमालयन न्यूट’ हा एक सरडा (सॅलॅमँडर) असून त्याला ‘हिमालयन सॅलॅमँडर’ सुद्धा म्हटलं जातं. भारताच्या दार्जीलिंग, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेशच्या भागात हा उभयचर प्राणी आढळतो. तो वर्षातील अर्धाधिक काळ निष्क्रिय अवस्थेत पडून राहत असल्याने तो सहसा दिसत नाही. पावसाळा हा त्यांचा मिलनाचा काळ असल्याने या कालावधीत तो बाहेर पडतो. तलाव, नदी आणि इतर जलाशयाच्या ठिकाणी आपण त्याला पाहू शकतो.

२. मलबार पिट व्हायपर

हा साप अत्यंत विषारी साप म्हणून ओळखला जातो. पण तेवढाच तो फोटोजेनिक सुद्धा आहे. त्याचा प्रमुख रंग हिरवा असला तरी तो पिवळ्या व तपकिरी रंगातही आढळतो. मलबार पिट व्हायपर हा निशाचर प्राणी आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळचा जंगली भाग, पश्चिम घाट आणि मलबार किनाऱ्यावर हा साप प्रामुख्याने आढळतो.

३. मलबार ग्लायडिंग फ्रॉग

हा एक वेगळ्या प्रकारचा व दुर्मिळ बेडूक आहे. या बेडकाला चक्क उडता येतं. याच्या पंजांची बनावट अशी असते की हवेत उडी घेतल्यानंतर त्याला तरंगत खाली यायला मदत होते. पश्चिम घाटाच्या समृद्ध पर्यावरणात या बेडकाला आपण पाहू शकतो.

४. स्पॉट स्वॉर्डटेल

स्पॉट स्वॉर्डटेल हे एक दुर्मिळ फुलपाखरू आहे. भारताचा उत्तर पूर्व (आसाम, अरुणाचल प्रदेश, नागलँड)  भाग हा या फुलपाखराचा प्रदेश आहे. या फुलपाखराला त्याचं नाव त्याच्या तलवारी सारख्या शेपटामुळे मिळालं. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काही सारी कोसळून गेल्या की या फुलपाखरांनी वातावरण गजबजून जातं.

५. क्रिमसन मार्श ग्लाइडर

संपूर्ण भारतात हा वेगळ्या प्रकारचा ‘चतुर’ आढळतो. पावसाळ्यात जलाशयाच्या ठिकाणी आपण त्याला पाहू शकतो. तसे पावसाळ्यात इतर प्रकारचे चतुरही दिसतात पण याला ओळखणं सोप्प आहे. नर हा साधारण लाल रंगाचा असतो तर मादा पिवळ्या आणि तपकिरी रंगात असते.

कुठे आढळला तर फोटो काढायला विसरू नका राव !!

६. पंख्यासारख्या गळ्याचा सरडा

राव, हा सरडा त्याच्या गळ्याच्या विशिष्ट बनावटीसाठी प्रसिद्ध आहे. तो आपल्या गळ्याच्या खालील भाग पंख्यासारखा फुगवू शकतो. निसर्गाने दिलेल्या या स्पेशल देणगीचा वापर तो मादाला इम्प्रेस करण्यासाठी करतो. संपूर्ण भारतभर हा सरडा आढळतो.

७. लाल खेकडा

हा एक गोड्या पाण्यातला खेकडा आहे. फक्त पश्चिम घाटातच याच्या ५ प्रजाती आपण पाहू शकतो. सर्वसाधारणपणे या खेकड्याची नांगी नारिंगी रंगाची असते तर मागचा भाग हा लाल रंगाचा असतो.

८. फुट-फ्लॅगिंग फ्रॉग

हा बेडूक त्याचे पाय लांबवर ताणू शकतो. त्याच्या याच गुणामुळे त्याला ‘फुट-फ्लॅगिंग फ्रॉग’ म्हटलं जातं. पायांच्या हालचालींचा आणि आवाजाच्या मदतीने तो मादांना आकर्षित करतो. पण या वेगळेपणाचा उपयोग फक्त मादांना आकर्षित करण्यासाठीच असतो असं नाही बरं का. बचावात्मक पवित्रा म्हणून देखील त्याचा वापर होतो.

९. सिकाडा

रात्रीच्यावेळी जंगलात जो ‘किर्र’ आवाज येतो तो याच प्रजातीच्या किड्यांमुळे. संपूर्ण जगात या किड्यांच्या ३००० प्रजाती आढळून येतात. एकट्या भारतात त्याच्या १५० प्रजाती आहेत. यातील सिकडा हा प्रामुख्याने पावसाळ्यात आढळतो. हा किडा सहसा डोळ्यांनी बघणं कठीण आहे कारण झाडांच्या रंगाशी तो मिसळून गेलेला असतो.

१०. बिब्रॉन कोरल स्नेक

कर्नाटक आणि केरळच्या वन्य भागात हा साप आढळतो. त्याला त्याचं ‘बिब्रॉन कोरल स्नेक’ हे नाव बिब्रॉन या जीवशास्त्रज्ञाच्या नावावरून मिळालं. हा निशाचर जीव असून अत्यंत दुर्मिळ मानला जातो. तो फक्त भारतातच आढळतो. त्याच्या भडक लाल रंगामुळे आणि तपकिरी पट्ट्यांमुळे त्याला ओळखणं सोप्प आहे.

११. टायगर बीटल

कीटक प्रजातीतील सर्वात वेगवान आणि मोठ्या आकारातील कीटक म्हणून टायगर बीटल ओळखले जातात. लांब सडक पाय आणि मोठ्या डोळ्यांमुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात. ते सर्वात आक्रमक म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळेच कदाचित त्यांना टायगर बीटल म्हटलं जात असेल. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच त्यांना आपण पाहू शकतो. भारत आणि मलेशियाच्या भागात टायगर बीटल प्रामुख्याने आढळतात.

सबस्क्राईब करा

* indicates required