हा पूल चक्क दोन हातांवर पेलला आहे ? कुठे आहे हा पूल ?

राव, एका पुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर फिरतोय. तुम्ही पाहिलात का ? दोन मोठाल्या हातांमध्ये एक पूल बांधलेला दिसतोय आणि त्यावरून माणसं सुद्धा वावरतायत. हा पूल कुठे आहे माहित आहे का ? आणि हो महत्वाचं म्हणजे हा व्हिडीओ नकली तर नाही ना ? चला खरं काय ते समजून घेऊया.

मंडळी, हा पूल व्हिएतनाम मध्ये असून तो खराखुरा दोन हातांवर पेललेला आहे. या पुलाचं नाव आहे ‘काऊ वांग’ ज्याचा अर्थ होतो ‘सोन्याचा पूल’. व्हिएतनामच्या ‘बा ना हिल्स’ परिसरात हा पूल बांधण्यात आला आहे.

आजूबाजूला जंगलाने वेढलेल्या जागी हा पूल तयार केला गेलाय. या पुलाला सांभाळण्यासाठी एक नामी शक्कल लढवण्यात आली आहे. पुलाला आधार म्हणून दोन कृत्रिम हात उभारले गेलेत. या हातांची बनावटही अगदी खऱ्या हातांसारखी आहे. हेच या पुलाचं मुख्य आकर्षण आहे. पुलाला आणखी देखणं करण्यासाठी आजूबाजूला फुलांचे ताटवे फुलवण्यात आले आहेत. या फुलांमुळे पूल आणखी आकर्षक वाटतो.

समुद्र सपाटीपासून तब्बल १४०० मीटर वर असलेली ही जागा पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. तिथला व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर जगभरात याची चर्चा सुरु झाली.

व्हिएतनाम देश तिथल्या अशाच अद्भुत पुलांसाठी ओळखला जातो. याआधी व्हिएतनामचा ‘ड्रॅगन ब्रिज’ जगभर गाजला होता. त्यानंतर आता गोल्डन ब्रिजचं नाव घेतलं जात आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required