११ वर्षांचा स्टॅनले सिंग मुलांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण करतोय की लेखक स्वत:च त्याला त्यांची पुस्तके पाठवत आहेत?
ऑनलाईनच्या या स्क्रीनवेड्या जमान्यात लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अनेक पालक धडपडत असतात. पण मुलांनीच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली तर? ही नुसती कल्पना नाही. तर एका अवघ्या ११ वर्षांच्या ब्रिटिश-इंडियन मुलाने ही गोष्ट साध्य करून दाखवली आहे. ११ वर्षाच्या स्टॅन्ले सिंग हा मुलगा टीकटॉक आणि युट्यूबच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके वाचून दाखवत असतो. त्याच्या या वाचनाने जगभरातील मुलांना पुस्तकाकडे आकर्षित केले आहे. त्याच्यामुळे जगभरातील मुलांना नवनव्या पुस्तकांची, लेखकांची माहिती मिळते. आपल्या पुस्तकाचा प्रसार करण्यासाठी सध्या अनेक लेखकही या ११ वर्षांच्या मुलाची मदत घेत आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी सोशल माध्यमांचा वापर करत जगाशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला. स्टॅन्लेलाही जेव्हा काही काळ आपण घरातून बाहेर पडू शकत नाही आणि मित्रांना भेटू शकत नसल्याचे कळले, तेव्हा त्यालाही आता यावर कसा मार्ग काढावा हे सुचत नव्हते. त्याची आई विक्की सिंगने यावर सोशल मिडियाच्या माध्यमातून तो त्याच्या मित्रांशी आणि त्याच्या वयाच्या जगभरातील मुलांशी कनेक्ट राहू शकतो हे शिकवले. आईच्या मार्गदर्शनाखाली स्टॅन्लेने पुस्तक वाचनाचे व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त त्याला कशात तरी गुंतवून ठेवायचे म्हणून त्याच्या आईने त्याला ही आयडिया दिली. पण स्टॅन्लेच्या वाचनाने अनेक मुलांना वाचनाची प्रेरणा दिली. त्यांना नवनव्या लेखकांची, त्यांच्या पुस्तकांची ओळख करून दिली.
सुरुवातीला बनवले जाणारे व्हिडीओ हे फक्त टाइमपास म्हणून बनवले जात होते. त्यामुळे व्हिडीओ जसा शूट केला जात असे तसाच तो अपलोड केला जात असे. त्याला संगीताची साथसंगत किंवा इतर एडिटिंग केले जात नव्हते. तरीही हे व्हिडीओ लोकांना पसंत पडत होते. अल्पावधीतच त्याच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड वाढली.
"सुरुवातीला तर आम्हाला कॅमेरा कसा पकडायचा हेही माहीत नव्हते. हातात मोबाईल धरूनच बहुतेक व्हिडीओ आम्ही शूट केले. हात थरथरत असल्याने अनेक व्हिडीओ हलत होते. स्थिर चित्रीकरण शक्य नव्हते.", असा अनुभव स्टॅन्लेची बहिण शान सिंगने सांगितला. आज ज्याप्रकारे चांगले व्हिडीओ बनवले जातात तसे काही पूर्वी नव्हते. त्यात इमेजेस किंवा संगीत किंवा शब्द अशा कशाचाच वापर केला जात नव्हता. आता मात्र आम्ही त्याच्या कंटेंटमध्ये सुधारणा केल्याचे त्याची बहिण म्हणाली.
स्टॅन्लेचे व्हिडीओ पाहून अनेक मुलांनी वाचन शिकले. ज्यांना इंग्लिश येत नव्हते अशा मुलांनी या व्हिडीओतून इंग्लिश शिकायला सुरुवात केली. मुलांना अशाप्रकारे या व्हिडीओजची चांगलीच मदत होत असल्याचे अनेक पालकांनी आवर्जून सांगितले.
स्टॅन्लेची प्रसिद्धी आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया इथे राहणाऱ्या अनेक लेखकांनी उत्स्फूर्तपणे त्याला आपली पुस्तके पाठवली आणि ही पुस्तके त्याने आपल्या चॅनेलवरून वाचून दाखवावीत म्हणून विनंतीही केली. यातून आपणही एखादे पुस्तक लिहू शकतो, असे स्टॅन्लेलाही वाटू लागले. लवकरच त्याचे स्वलिखित पुस्तकही त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. त्याच्या या कल्पनेला अनेक लेखकांनी पसंती दिली. आपले पुस्तक हे कुत्रे, फुटबॉल आणि प्रेम याविषयी असणार असल्याचे स्टॅन्ले सांगतो.
सहज म्हणून सुरू केलेल्या या उपक्रमाने कित्येक मुलांचे भविष्य बदलून टाकले. चांगला हेतू ठेवून कोणत्याही कामाला केलेली सुरुवात ही नक्कीच यशात परावर्तीत होते यात शंका नाही.
स्टॅन्लेचा हा प्रवास फक्त मुलांसाठीच नाही तर नव्या वाटा शोधण्याचा प्रत्यन करणाऱ्या प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे. तुम्हाला स्टॅन्लेच्या या प्रवासाबद्दल नक्की काय वाटते? कमेंटच्या माध्यमातून अवश्य सांगा.
बरं, पुस्तक वाचनाचाच विषय आहे तर तुम्ही या बुकलेट गाय - अमृत देशमुखबद्दलही वाचलंच असेल....
मेघश्री श्रेष्ठी
https://www.bobhata.com/lifestyle/marathi-young-man-reads-books-you-587




