computer

बॉब हेअरकट आणि सनग्लासेस या ट्रेडमार्कसह प्रसिद्ध असलेली जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर - ॲना विंटूर!!

काही-काही लोकांचा जन्मच काहीतरी विशिष्ट बनण्यासाठी झालेला असतो; जणू काही ते दुसरं काही बनूच शकले नसते. अर्थात कधी असंही होतं, की एखादी सुंदर दिसणारी स्त्री सिनेमात नव्हे, तर एखाद्या बॅंकेत कारकुनी करत असते. किंवा एखादा खूपच कमी बोलणारा आणि भिडस्त स्वभावाचा माणूस मार्केटिंग करत असतो.

ॲना विंटूर मात्र जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर होणार हे नियतीने ठरवलं असावं.

काही लोकांच्या कुटुंबातच राजेशाही रक्त वहात असतं. आतां हेच बघा ना, तिच्या आजीकडून विंटूर ही १८ व्या शतकाच्या उत्तरार्धातील कादंबरीकार आणि डचेस ऑफ डेव्हनशायर लेडी एलिझाबेथ फॉस्टर आणि तिचे पती आयरिश राजकारणी जॉन थॉमस फॉस्टर यांची पणती आहे. तिचे खापर खापर पणजोबा फ्रेडरिक हर्वे, ब्रिस्टलचे चौथे अर्ल होते, त्यांनी डेरी परगण्याचे अँग्लिकन बिशप म्हणून काम केले होते. सर ऑगस्टस व्हेरे फॉस्टर, चौथा बॅरोनेट, त्या नावाचा शेवटचा बॅरोनेट, विंटूरचा खापरकाका होता. ॲना विंटूरला असा बराच राजेशाही वारसा लाभला होता.

अशा या ॲना विंटूरचा जन्म ३ नोव्हेंबर १९४९ ला झाला. ती एक ब्रिटिश आणि अमेरिकन पत्रकार आहे आणि १९८८ पासून "व्होग" ह्या जगप्रसिद्ध फॅशन मॅगझिनची मुख्य संपादक आहे. २०२० पासून "काॅंडे नास्ट" या मीडिया कंपनीसाठी ती जागतिक मुख्य सामग्री अधिकारी म्हणून काम करत आहे. ती काॅंडे नास्ट आणि व्होग मॅगझिनची एडिटोरियल डायरेक्टर तसेच कलात्मक संचालक देखील आहे. आपला ट्रेडमार्क बॉब हेअरकट आणि गडद सनग्लासेससह विंटूर ही फॅशन जगतातील एक महत्त्वाची व्यक्ती बनली आहे. तिला उदयोन्मुख फॅशन ट्रेंडचे प्रतीक मानले जाते. तिच्या कथितपणे अलिप्त व्यक्तिमत्वामुळे तिला "न्यूक्लियर विंटूर" हे टोपणनाव मिळाले आहे.

तिचे वडील चार्ल्स विंटूर "लंडन इव्हिनिंग स्टँडर्ड" या वृत्तपत्राचे संपादक होते आणि ते स्वत: अनुभवी असून देखील त्यांच्या वृत्तपत्राला त्या काळातील तरुणांसाठी कसे सुसंगत बनवावे याबद्दल त्यांनी तिचा सल्ला घेतला होता. किशोरवयातच तिला फॅशनची आवड निर्माण झाली. फॅशन पत्रकारितेतील तिची कारकीर्द दोन ब्रिटिश मासिकांमधून सुरू झाली. नंतर ती न्यूयॉर्कमध्ये आणि "हाऊस अँड गार्डन" मासिकात काम केल्यावर अमेरिकेला गेली. फॅशन इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी तिने मासिकाचा केलेला वापर हा वादाचा विषय ठरला. प्राणी अधिकार कार्यकर्त्यांनी फरच्या किंवा प्राण्यांच्या कातडीचा फॅशनसाठी वापर करण्याचा तीव्र निषेध केला, तर समीक्षकांनी तिच्यावर स्त्रीत्व आणि सौंदर्याच्या अभिजात विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी मासिकाचा वापर केल्याचा आरोप केला.

"मला वाटते की माझ्या वडिलांनी अगोदरच ठरवले होते की मी फॅशनच्या क्षेत्रात काम करावे", तिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते. तिच्या वडिलांनी तिच्या पहिल्या नोकरीची व्यवस्था केली ती देखील प्रसिद्ध आणि प्रथितयश बिबा बुटीकमध्ये. तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती. पुढच्या वर्षी तिने नॉर्थ लंडन कॉलेज सोडले आणि हॅरॉड्स या प्रसिद्ध डिपार्टमेंट स्टोअरमध्ये प्रशिक्षणासाठी ती दाखल झाली.

प्रथम ॲनाने हार्पर ॲंड क्वीन ह्या मासिकात संपादकीय सहाय्यक पदावर काम केले आणि नंतर ती १९७५ मध्ये न्यूयॉर्कमधील हार्पर्स बाजार येथे कनिष्ठ फॅशन एडिटर बनली. विंटूरच्या नाविन्यपूर्ण शूट्समुळे संपादक टोनी मॅझोला याने तिला नऊ महिन्यांनंतर काढून टाकले होते. नंतर ती "विव्हा" मासिकात प्रमुख फॅशन एडिटर झाली आणि तिथेच तिला सर्वात पहिल्यांदा पर्सनल सहाय्यक मिळाला. इथपासूनच तिची प्रतिमा 'सतत चांगल्या गोष्टींची अपेक्षा करणारी कठीण बाॅस' अशी झाली. काही काळ कामापासून लांब राहिल्यानंतर १९८० मध्ये तिने "सॅव्ही" ह्या नवीन महिला मासिकासाठी फॅशन एडिटर म्हणून काम केले. इथे तिने करिअर-सजग व्यावसायिक महिलांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

जगातील कित्येक उगवत्या माॅडेल्सना मासिकाच्या मुखपृष्ठावर आणून सुपर माॅडेल बनवण्याचं श्रेय ॲना विंटूर हिला जातं. मासिकाच्या मुखपृष्ठावर सेलिब्रिटी असेल तर मासिकाचा खप वाढतो हे सर्वात आधी तिने ओळखले. यशाची शिखरे पादाक्रांत करत ॲना विंटूर व्होग मासिकाच्या यूके एडिशनची प्रमुख एडिटर बनली. सॅव्ही मासिकात तिने ज्या प्रकारे करिअर-सजग व्यावसायिक महिलांना लक्ष्य केले होते, तसेच तिने इथे देखील केले आणि मासिकाचा खप वाढवला. पुढे "हाऊस ॲंड गार्डन" ह्या मासिकाला देखील 'फॅशनेबल' बनवल्यामुळे तिच्यावर टीका झाली आणि लोकांनी त्याचं चेष्टेने 'हाऊस ॲंड गारमेंट' असं नामकरण केलं. पण बधेल तर ती ॲना विंटूर कसली? तिने फॅशनला वाचकांच्या केंद्रस्थानी आणण्याचं काम सुरूच ठेवलं.

ती व्होग मासिकाच्या यूके एडिशनची प्रमुख एडिटर बनेपर्यंत मासिकाच्या मुखपृष्ठावरील माॅडेल्स भरपूर मेकअप केलेल्या आणि कचकड्याच्या बाहुलीसारख्या दिसत; हे चित्र तिने बदललं. ॲना विंटूरच्याच शब्दात सांगायचं तर "स्त्रियांना सुंदर दिसायला आवडतं, मेकअप करायला आवडतं, पण आपल्या साधेपणात देखील सौंदर्य आहे ह्याची जाणीव आधुनिक युगातील स्त्रियांना झालेली आहे, आणि व्होग मासिक अशा स्त्रियांना समर्पित आहे".

तिची माजी वैयक्तिक सहाय्यक लॉरेन वेसबर्गर हिने २००३ मधील सर्वाधिक विक्री झालेली "द डेव्हिल वेअर्स प्राडा" ही कादंबरी लिहिली, ही कादंबरी ॲना विंटूर हिच्या आयुष्यावर आधारित आहे. २००६ मध्ये त्या चित्रपटात मिरांडा प्रिस्टली या फॅशन एडिटरची भूमिका मेरील स्ट्रीप या प्रसिद्ध नटीने केली होती.

फॅशनच्या दुनियेचा झगमगाट सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात आणण्याचं श्रेय ॲना विंटूर हिला जातं, कारण जे सेलिब्रिटी फक्त दूरूनच पाहणे शक्य होते, त्यांना मासिकांच्या माध्यमातून थेट वाचकांच्या दारात नेऊन उभं केलं ते ह्या फॅशनिस्टानेच.

सबस्क्राईब करा

* indicates required