सरकारी शाळेतील मुलांनी टाकाऊ प्लास्टिकपासून युरिनल तयार केले...कौतुक तर केलंच पाहिजे राव !!

तामिळनाडू येथील तिरुचिल्लापल्लीच्या सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांनी एक भन्नाट शोध लावला आहे राव!! लहान मुलं सुद्धा जर कामाला लागली तर अफलातून शोध लावू शकतात याचेच उदाहरण त्या मुलांनी दिले आहे.
त्या मुलांनी शाळेच्या आवारात लघवीसाठी टाकाऊ प्लास्टिकचा वापर करून युरिनल तयार केले आहे. मंडळी, त्यांच्या शाळेत मुतारीची सोय नव्हती. मग या मुलांना उघड्यावर लघवी करावी लागायची. त्यातच बाहेर लघवीला गेल्यावर त्यांच्या पायावर लघवीचे थेंब पडायचे. या सगळ्या प्रकारात मग युरिनल इंफेक्शनसारखे प्रश्न निर्माण होऊन मुलं आजारी पडत होती. शाळेच्या आवरातीलच भिंती कंपाउंड किंवा ग्राउंडवर त्यांना लघवी करावी लागत असल्याने घानेरडया वासाला त्यांना सामोरे जावे लागत होते. यावर काहीतरी केले पाहिजे या विचाराने या लहानग्यांना झपाटले आणि त्यांनी थेट प्लास्टिकचा वापर करून स्वतंत्र मुतारी तयार करून टाकली.
या कामासाठी त्यांनी त्यांचे शिक्षक केशवन डी. यांची मदत घेतली. २० लिटरच्या प्लास्टिकच्या बॉटल्सचा उपयोग करून त्यांनी हे युरिनल तयार केले आहे. या कामासाठी त्यांना फक्त ६००रुपये खर्च आला आहे. या शोधासाठी त्या मुलांना 'आय कॅन अवॉर्डस' बोलडेस्ट आयडिया हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराची रक्कम ५० हजार आहे.
हा शोध लावणरी मुलं आहेत सुपीकपांडियन, संतोष, दियानिधी, रागुल आणि प्रभारन. हे यूरिनल पूर्णपणे टाकाऊ प्लास्टिकचा उपयोग करून तयार केले आहे. युरिनलमध्ये लघवी फ्लश करण्यासाठी ठिबक सिंचनच्या पाइपचा वापर करण्यात आला आहे. हा पाइप थेट सेंट्रल नळाला जोडला आहे. मंडळी, हा शोध त्या मुलांची समस्या सोडविण्यासाठी तर उपयोगी ठरलाच आहे, पण प्लास्टिकचा उपयोग करून किती भन्नाट शोध लावता येतील याचेही एक उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे.
आता हे यूरिनल्स नेहमीच्या टॉयलेट्समध्ये बसवता येतील का यावर ही मुलं काम करत आहेत. तसेच जिथे टॉयलेट्सची सोय नाही अशा शाळांमध्ये जाऊन या प्रयोगाचे महत्व समजावून देत आहेत. या मुलांची अफाट कल्पनाशक्ती आणि काम करण्याच्या वृत्तीला बोभाटाचा सलाम!
लेखक : वैभव पाटील.