computer

नासाने औरंगाबादच्या मुलीची निवड थेट पॅनेलिस्ट म्हणून केली आहे...कोण आहे ती आणि तिने काय काम केलंय??

गेले वर्षभर मुलांच्या शिक्षणात जो खंड पडला आहे त्यामुळे खूप चिंता व्यक्त होत आहे. शाळा बंद, खेळणे बंद मुलं करणार काय हा प्रश्न अनेकांना भेडसावत होता. ऑनलाईन शाळेमुळे थोडाफार हा प्रश्न सुटला. तरीही शाळेसारखे शिकणे ऑनलाईन शाळेत नक्कीच होत नाही. भरपूर वेळ असल्यामुळे मुलं बराच वेळ इंटरनेटवर बसून काहीतरी बघत राहतात. याच वेळेचा खूप चांगला उपयोग औरंगाबादच्या एका मुलीने केला आहे. दीक्षा शिंदे असे तिचे नाव आहे आणि तिची नासाच्या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनेलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड झाली आहे. इतक्या लहान वयात तिची कामगिरी पाहून दीक्षाचे कौतुक होत आहे.

दीक्षा शिंदे ही औरंगाबादमध्ये १०व्या इयत्तेत आहे. ती चौदा वर्षांची आहे. तिचा शोधनिबंध 'We live in Black Hole?' इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक अँड इंजिनीअरिंग रिसर्चने या वर्षी मे मध्ये स्वीकारला होता. जूनमध्ये तिची नासाच्या २०२१ एमएसआय फेलोशिप व्हर्च्युअल पॅनेलसाठी पॅनेलिस्ट म्हणून निवड झाली.

या विषयावर लिहिण्याआधी तिने दोनदा प्रयत्न केले होते. सप्टेंबर २०२० मध्ये 'देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह' हा शोधनिबंध सादर केला होता पण तो नाकारण्यात आला. मग तिने ऑक्टोबर २० मध्ये काही बदलांसह निबंध पुन्हा सादर केला. पण तो दुसऱ्यांदा नाकारण्यात आला. पण तिने हार न मानता अभ्यास सुरू ठेवला.

डिसेंबर २०२० मध्ये तिने 'ब्लॅक होल' वर एक संशोधन लेख पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने बराच अभ्यास केला. अनेक पुस्तकं वाचली. We live in Black Hole? म्हणजे कृष्णविवर या विषयावर लेखनिबंध लिहिला.

तिच्या शास्त्रीय दृष्टिकोनातील लेखन आता नासाने स्वीकारले आणि तिची निवड करण्यात आली. लवकरच तिच्या लेखनाला संकेतस्थळावर प्रसिद्धी मिळणार आहे. तिचे वडील कृष्णा शिंदे हे औरंगाबादच्या एका शाळेत मुख्याध्यापक आहेत आणि आई रंजना शिंदे खासगी शिकवणी वर्ग घेतात. लहानपणापासून दीक्षा ही अभ्यासात खूप हुशार आहे , शाळेतल्या अभ्यासाबरोबरच तिने इतर स्पर्धेतही अव्वल स्थान मिळवले आहे.

दीक्षा आता लहान आहे, त्यामुळे १८ वर्षांची झाल्यावर तिला नासामध्ये प्रशिक्षण मिळेल. पॅनेलिस्टचे काम ती ऑनलाईन करेल व त्यासाठी तिला पैसे दिले जातील. ठरवलेल्या दिवशी पहाटे १ ते ४ दरम्यान ती काम करेल. तिच्या कामात संशोधकांनी सादर केलेल्या प्रस्तावांचे अभ्यास करणे, त्याच्या दृष्टीकोनाचे वर्णन करणे, तसेच विद्यार्थांना या संशोधनाचा काय फायदा होईल हे याचा समावेश आहे. तिला अजून कोणकोणती जबाबदारी मिळणार आहे याची माहिती लवकरच मिळेल. दीक्षा आणि तिचे कुटुंब सध्या खूप खुश आहेत. ऑक्टोबरमध्ये एका परिषदेत तिला सहभागी व्हावे लागेल. यासाठी नासा तिचा सर्व खर्च उचलणार आहे.

लहान वयातच दीक्षाने तिच्या हुशारीने नाव कमावले आहे. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required