computer

भारतातील १५ विचित्र आणि रहस्यमय ठिकाणं...यातल्या कोणत्या ठिकाणाला भेट द्यायला आवडेल?

बर्मुडा ट्रँगल म्हणलं की काय आठवतं? एक गूढ रहस्य जे आजही कोणाला उलगडलेलं नाही. अनेक तर्क वितर्क असतात पण तरीही अश्या गोष्टींबद्दल खूप उत्सकता असते. भारतातही अशी अनेक गावं किंवा ठिकाणं आहेत जी गूढ किंवा रहस्यमय आहेत. ज्याविषयी वाचून तुम्हाला धक्का बसेल. आजच्या लेखातून आपण अशाच गूढ आणि रहस्यमी ठिकाणांची ओळख करून घेणार आहोत.

१. आंध्र प्रदेशातील लेपाक्षी येथील झुलता स्तंभ

लेपाक्षी मंदिर हे भारतातील एक ऐतिहासिक स्थळ आहे. हे भगवान शंकराचे मंदिर आहे. इथल्या वास्तुकलेसाठी आणि चित्रकलेसाठी मंदिर प्रसिद्ध आहे. पण इथल्या एका झुलत्या स्तंभामुळे हे मंदिर जास्त प्रसिद्ध आहे. येथील एकूण ७० खांबांपैकी एक खांब हवेमध्ये झुलताना दिसतो. फोटोत दाखवल्याप्रमाणे लोक या खांबाखाली कापड किंवा इतर वस्तू ठेवतात. असं म्हणतात की, असं केल्याने जीवनात सुबत्ता येते.

२. कर्नाटकातील तालकड येथे मिनी वाळवंट

कावेरी नदीच्या काठावर वसलेले कर्नाटक जिल्ह्यातील तालकडू हे शहर वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. असे म्हणतात की, तिथे जवळजवळ ३० मंदिर होती. त्यापैकी ५ शिवाची होती.  एका आख्यायिकेनुसार भगवान शिवच्या एका विधवा भक्ताने या भूमीला शाप दिला होता. त्यानंतर हे गाव या विचित्र वाळवंटात बदलले. 

सविस्तर वाचण्यासाठी आमचा हा लेख नक्की वाचा:

तालकडू : वाळवंटात गाडल्या गेलेल्या मंदिरांचं शहर....

३. जुळ्यांचे गाव कोडिनि, केरळ

या केरळमधील गावाला कोडीनी किंवा 'जुळ्या मुलांचे गाव' म्हणून ओळखले जाते. एकदा आपण या गावात शिरलो की पावलापावलावर त्याची प्रचिती येते. कोडिनि येथे सध्या दोनशेपेक्षा जास्त जोड्या जुळ्या किंवा तिळ्या आहेत. एवढेच नाही तर गावाबाहेर विवाह करणार्‍या कोडिनीच्या स्त्रिया देखील जुळे किंवा तिळ्या मुलांनाच जन्म देतात. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की या मागे तिथल्या पाण्यातील रसायने कारणीभूत आहेत.

४. आसाममधील जटिंगा येथे आत्महत्या करणाऱ्या पक्षांचे ठिकाण

प्रत्येक मान्सूनमध्ये आसाममधील जटिंगा येथे एक रहस्यमय घटना घडते. झाडांवर आणि इमारतींवर पक्षी मरून पडलेले आढळतात. हे पक्षी स्थलांतर करून आलेले पक्षी असतात. ही घटना मुख्यत्वे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये घडते. या घटनेमुळे या जागेला आत्महत्या करणाऱ्या पक्षांचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. खरे तर याला आत्महत्या म्हणावी की आणखी काही हे तुम्हीच ठरवा.

५. 'पवित्र' उंदरांचे करणी माता मंदिर, राजस्थान

देशनोक येथील करणी माता मंदिराभोवती फिरणारे उंदीर हे पवित्र मानले जातात. भारतातील सर्वात अनाकलनीय मंदिरांपैकी हे  एक ठिकाण आहे. मंदिरात २०,००० हून अधिक उंदीर आहेत. त्यांना इजा किंवा दुखापत करण्यास सक्त मनाई आहे. त्यांना अत्यंत शुभ मानले जाते, त्याची उपासना केली जाते. 

६. दारं नसलेली घरे - शनी शिंगणापूर

अहमदनगर मधील शनी शिंगणापूर हे शनी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. परंतु येथील रहस्यमय गोष्ट म्हणजे या गावातील कोणतेही घर, शाळा आणि इमारतींमध्ये दरवाजा किंवा दरवाजाची चौकटही नाही. इथे कधी चोरी होत नाही असे म्हणतात. ग्रामस्थांना शनिदेवावर अखंड विश्वास आहे, त्यामुळे इथे कधी चोरीचा गुन्हा नोंदवला केला गेला नाही.

७. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रहस्यमय महाल

अठराव्या शतकात बांधला गेलेला बारा इमामबाड़ा हा भारतातील सर्वात रहस्यमय ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. यात मध्यभागी उभा असलेला हॉल सुमारे ५० मीटर लांब आणि जवळजवळ ३ मजल्याइतका उंच आहे. आश्चर्य म्हणजे तो कोणत्याही आधाराशिवाय उभा आहे. या हॉलला कोणताही आधारस्तंभ किंवा खांब नाहीये. विटांच्या विशिष्ट रचनेसाठी आणि भूलभूलैय्यासाठी देखील हा महाल ओळखला जातो. 

८. लेहची मॅग्नेटिक हिल, लडाख

हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ११,००० फूट उंचीवर आहे. ही टेकडी केवळ मनमोहक नाही तर यात एक वेगळं रहस्यही आहे. असं म्हणतात इथे गाडी चालवताना गाडीचं इग्निशन बंद जरी केलं तरी आपोआप वर चढली जाते. टेकडीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा भ्रम निर्माण होत असल्याचं विज्ञान सांगतं.

९. लडाख येथे E. T. इनहेबिटेड कोंगका ला पास

१६,९७० फूट उंचीवर कोंगका ला पास हा भारत आणि चीनमधील वादग्रस्त प्रदेश आहे. इथे कोणीही जाऊ शकत नाही. इथे कोणीही मानव राहत नाही. पण हे रहस्यमय बनले आहे ते वेगळ्याच कारणासाठी. इथे अनेक 
UFOs तसेच गूढ मानवी आकृती दिसून आल्या आल्या आहेत. . इथे आसपास राहणारे रहिवासी स्थानिकांचा असा विश्वास आहे की इथे aliens राहतात.

१०. उत्तराखंडच्या चमोली येथील सापळ्यांचा सरोवर

१६,६०० फूट उंचीवर रूपकुंड तलाव हा हिमालयात सर्वात जुना तलाव आहे.  ही जागा खूप धोकादायक मानली जाते. इथे माणसं जायला घाबरतात. कारण दरवर्षी  या ठिकाणी बर्फ वितळल्यावर रूपकुंड तलावाच्या पृष्ठभागाखाली सुमारे ३०० ते ४०० मानवी सांगाडे दिसतात. रेडिओकार्बन चाचण्यानुसार हे सांगाडे १५व्या शतकातील आहेत. स्थानिकांच्या मते हे सर्व मृतदेह कनौजचा तत्कालीन राजा, राणी आणि त्यांच्या सैन्याचे आहेत. ते सर्व एका तीर्थयात्रेला जात होते परंतु गारपिटीमुळे तलावामध्ये पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

११. केरळमधील इडुक्की येथील लाल पाऊस

केरळमधील इडुक्की येथे पडलेला लाल रंगाचा पाऊस हे येथील गूढ आहे. २५ जुलै २००१ रोजी सर्वप्रथम हा पाऊस पडला. रक्तासारख्या थेंबही पडून त्याचे लाल डाग रस्त्यांवर,कपड्यावर, तसेच इमारती वर पडले. हे लाल थेंब गोळा केल्यावर मात्र ते स्वच्छ पाण्यात बदलले. शास्त्रज्ञांच्या  विश्लेषणानंतर त्यांचे म्हणणे आहे की लाल कण हे त्या प्रदेशात स्थानिक पातळीवर वाढणाऱ्या  एल्गाचे  लक्षण आहे. पण हा गूढ पाऊस बरंच घाबरवून गेला.

१२. राजस्थानातील बांदई येथील बुलेट बाबा

राजस्थानमध्ये हे एक प्रसिद्ध मंदिर आहे, पण इथे देवी-देवतांच्या मूर्तींची पूजा न होता एका मोटरसायकलची पूजा होते. असं म्हणतात एका व्यक्तीचा त्याच्या बुलेटवरून जाताना अपघाती मृत्यू झाला होता. पोलिसांनी ती बुलेट नेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला पण ती बुलेट परत त्याच ठिकाणी येत असे. हे विचित्र प्रकार का होतोय हे कळतंच नव्हते. शेवटी स्थानिक लोकांनी या दुचाकीभोवती एक मंदिर बांधले.

१३. कांग्रा येथील अखंड तेवणारी ज्योत - 'ज्वालाजी मंदिर'

हिमालयात कांग्रा येथे हे मंदिर आहे. या मंदिरात असलेली रहस्यमय गोष्ट म्हणजे तिथल्या दिव्याची ज्योत गेल्या १०० वर्षांपासून अखंडपणे तेवत आहे. या मंदिराच्या आत एक पोकळ दगड आहे त्याच्या खड्ड्यात ही ज्योत तेवत आहे.

१४. राजस्थानमधील रिकामं गाव 'कुलधारा'

कुलधारामध्ये पालीवाल ब्राह्मणांनी अनेक वर्षे वास्तव्य केले. परंतु आता या गावात फक्त रिकामी घरे, तुटलेल्या इमारती आणि जुने मंदिर एवढ्याच गोष्टी राहिल्या आहेत. सुमारे २ शतकापूर्वी, १५०० हून अधिक पालीवाल ब्राह्मणांनी एका रात्रीत गावातून पलायन केले. असं म्हणतात, गाव खाली करण्यापूर्वी रहिवाश्यांनी त्यांच्यानंतर तेथे कोणीही राहू नये म्हणून गावाला शाप दिला होता. तेव्हापासून येथे कोणीही राहू शकलेले नाही. कुलधाराला भेट देणारे पर्यटक अस्वस्थ होतात अशी एक समजून आहे.

१५. पश्चिम बंगालच्या घोस्ट लाइट्स

पश्चिम बंगालमध्ये दलदलीच्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांचे चमकणारे दिवे दिसतात. त्यांना 'अलेया लाइट्स ' म्हणून ओळखले जाते. मच्छीमार तिथे गेल्यावर गोंधळतात आणि त्यांचा मार्ग गमावतात. आजपर्यंत बर्‍याच घटनांमध्ये या घोस्ट लाइट्समुळे मच्छिमारांनी आपला जीवही गमावला आहे. 

 

तुम्हालाही अजून कुठली ठिकाणं माहीत असल्यास कमेंटमधून नक्की कळवा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required