computer

जगातल्या १५ अवाढव्य गोष्टी...यातली एक गोष्ट तर भारतीय माणसाने तयार केली आहे !!

जगात सर्वात लहान,सर्वात उंच, सर्वात वेगवान किंवा अश्या नेहमीपेक्षा हटके  गोष्टींबद्दल सगळ्यांना खूप कुतूहल असते. रोजच्या जीवनात आपण ज्या वस्तू वापरतो त्याच अगदी वेगळ्या आकारात पहिल्या तर खूप आश्चर्य वाटते. आज बोभाटा तुमच्यासाठी अशाच काही अगडबंब वस्तू घेऊन आलं आहे. या वस्तू पाहून तुम्हीही चकित व्हाल.

चला तर सुरुवात करूया.

१. पृथ्वीवरील सर्वात मोठे फूल -राफ्लेशिया अर्नोल्डी

जगातील सर्वात मोठे फूलाचे नाव राफ्लेशिया अर्नोल्डी आहे. हे  दक्षिणपूर्व आशियातील जंगलात वाढते.   इंडोनेशियामध्ये हे मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्याच्या पाकळ्या जवळजवळ अर्ध्या मीटरपर्यंत लांब असतात. त्याची जाडी ३ सेंटीमीटरपर्यंत असते. हे फुल  तब्बल  १० किलो वजनापेक्षा जास्त असते.

२. सर्वात मोठी बंदूक -

जेम्स ए. डेकेनची ३३ फूट ४ इंचाची बंदूक ही जगात सर्वात मोठी आहे. ही बंदूक फक्त मॉडेल नसून चालू स्थितीत आहे.जेम्स हे मिशिगन अमेरिका येथे राहतात. २००८ नंतर त्यांचा रेकॉर्ड अजून कोणी मोडला नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे.

३.सर्वात मोठा टेलिफोन

१९८८ मध्ये एका  विमा कंपनीने जगातील सर्वात मोठा फोन नेदरलँड्सच्या एका महोत्सवात ठेवला होता.  या फोनचे वजन तब्बल  ३.५ टन आहे. उंची २.४७ मीटर उंच आणि  रुंदी ६.०६ मीटर इतकी मोठी आहे. यावरून जर कॉल करायचा असेल तर  हँडसेट उचलण्यासाठी क्रेनच आणावी लागते.

४. सर्वात मोठा रुबिक क्यूब

२०१७ मध्ये फ्रेंच डिझायनर ग्रीगोअर फेफेनिगने याने सर्वांत मोठे मॅजिक किंवा रुबीक क्यूब बनवले होते. या रुबीक क्यूबच्या प्रत्येक बाजूत ३३ ठोकळे आहेत. हलवू शकतील असे ६१५३ ठोकळे आहेत. एकूण वजन ३.१५ किलो आहे. म्हणजे नेहमीच्या रुबिक क्युबपेक्षा याचे वजन २२ पट जास्त आहे. याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली गेली आहे.

५.सर्वात मोठे ट्रेनचे मॉडेल -  

हे जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरात आहे. २०१९ मध्ये या मॉडेल ट्रेनची एकूण लांबी १५,४०० मीटर (५०,५२५ फूट) इतकी होती. पण त्यानंतर ती अजून वाढवण्यात आली. १५,४०० मीटर पासून १५७१५ मीटर (५१ फूट) पर्यंत हे मॉडेल वाढविण्यात आले. या रेल्वे मॉडेलची एकूण लांबी १०३३.४६ फूट इतकी मोठी आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात मोठे ट्रेनचे मॉडेल म्हणून याची नोंद करण्यात आली आहे.

६. सर्वात मोठा ट्रक

अ‍ॅरिझोना येथील ब्रॅड आणि जेन कॅम्पबेल यांनी २०१६  मध्ये बिग टॉयज शर्यतीत सर्वात मोठा 'मॉन्स्टर' ट्रक आणला होता. याची उंची १२ फूट आहे आणि वजन ६८०० किलोग्रॅम आहे. यामध्ये १२ प्रवाशी बसू शकतात. या भल्यामोठ्या ट्रकच्या इंजिनमध्ये ७५० हॉर्सपॉवर एवढी उर्जा आहे आणि याचा वेग ताशी ७२.४ किमी एवढा आहे. या ट्रकलाही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळालं आहे.

७. सर्वात मोठा हायकिंग बूट

या सर्वात मोठ्या बुटाची लांबी ७.१४ मीटर (२३ फूट ५ इंच) आहे. रुंदी २.५० मीटर (८फूट २ इंच) तर उंची ४.२० मीटर (१३ फूट ९ इंच) इतकी आहे. हे भलेमोठे बूट तयार करण्यासाठी सुमारे ९० चौरस मीटर चामडे म्हणजे लेदर लागले. हे बूट शिवण्यासाठी तब्बल एकूण १.३ किलोमीटर धागा वापरण्यात आला. याची फक्त लेसच ३५ मीटर लांब आहेत. २००८ मध्ये याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

८. सर्वात मोठे मार्कर पेन

भारताच्या मुहम्मद दिलीफने हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. या मार्कर पेनचे आकारमान ८ फूट ११.८७ इंच x १ फूट ०.२० इंच इतके मोठे आहे. हा मार्कर पेन वापरून एका पेपरवर भारत हे शब्दही लिहिले गेले आहेत. 

९. सर्वात लांब सायकल

नोव्हेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियामधील पेनेसविले येथे बर्नी रेयान यांनी ही सर्वात लांब सायकल बनवली आहे. याची लांबी तब्बल ४७.५ मीटर  म्हणजे १५५ फूट ८ इंच इतकी आहे.

१०. स्ट्रॅटोलाँच - जगातील सर्वात मोठे विमान -

हे विमान २ विमाने जोडल्यासारखे दिसते. हे ट्वीन बॉडी मशीन आहे. या विमानाचा पात्यांचा आकार ११७ मीटर आहे, तर उंची १५ मीटर आहे. याखेरीज विमानात ६ गीअर्स आहेत. विमान तब्बल २२६ टन इतकं वजन पेलू शकतं. यामध्ये दोन एअरफ्रेम्स आहेत.  क्रू उजव्या बाजूला आहे, तर फ्लाइट डेटा सिस्टम डाव्या बाजूला आहे. या विमानात बोइंग ७४७ इंजिन हे ताकदीचे इंजिन वापरल्याने ते हवेत सहज तरंगू शकते. या विमानाला २८ चाके बसवली आहेत जेणेकरून लँडिंग अगदी अलगद होईल. 

११. वाईनची सर्वात मोठी बाटली -

स्वित्झर्लंडच्या लिसाच येथे आंद्रे व्होगेल यांनी वाईनची सर्वात मोठी बाटली बनवली आहे. याची उंची १३ फूट ८.१७ इंच आहे. बाटलीमध्ये ३०९४ लिटर वाईन बसू शकते. गिनीज बुकमध्ये याची नोंदही झाली आहे.

१२. सॅन अल्फोन्सो डेल मार - जगातील सर्वात मोठा जलतरण तलाव-

डिसेंबर २००६ मध्ये या स्विमिंगपूलचे म्हणजे जलतरण तलावाचेउद्घाटन झाले. या तलावाजवळ एक किलोमीटर लांबीचा समुद्र आहे. हा जलतरण तलाव तब्बल ८० ऑलिम्पिक जलतरण तलाव एकत्र केल्यावर जितके मोठे होतील तितका मोठा आहे. त्यात असल्यावर जवळजवळ समुद्रात असल्यासारखाच भास होतो. यात पोहणे खूप रोमांचक आहे. याचीही नोंद गिनीज बुकमध्ये केली गेली आहे.

१३. सिंफनी ऑफ द सीज - जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज -

हे जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज आहे. या जहाजाचा आकार टायटॅनिकच्या आकारापेक्षा ५ पट मोठे आहे.  याचे फक्त वजनच २,३०,००० टनांपेक्षा जास्त आहे. यात एकावेळी ८००० लोक प्रवास करू शकतात. ६००० पेक्षा जास्त प्रवासी आणि २००० क्रूमेंबर यात बसू शकतात.

१४. सर्वात लांब मोटरसायकल

जगातील सर्वात लांब मोटरसायकल भारतातील भारतसिंह परमार यांनी डिझाइन केले आहे. याची लांबी २६.२९ मी. इतकी आहे, याआधीचा रेकॉर्ड २२ मीटरचा होता. या बाईकवर १००मीटर प्रवास झाला आहे. २०१६ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद केली गेली.
 

१५. जनरल शर्मन ट्री - जगातील सर्वात मोठे झाड -

जनरल शर्मनचे झाड हे पृथ्वीवरील सर्वात मोठे आणि सर्वात वजनदार वृक्ष आहे.  हे झाड कॅलिफोर्नियाच्या सेक्वाया नॅशनल पार्कमध्ये आहे. याची उंची ८३.८मीटर आहे. याचे खोडच २५ फूट व्यासाचे आहे. या झाडाचे वय २३००-२७०० वर्षे इतके आहे. या अवाढव्य झाडाची दरवर्षी छाटणी केली जाते तेव्हा ज्या फांद्या कापल्या जातात त्यापासून ५ पेक्षा जास्त  घरं बांधली जातील एवढं लाकूड मिळतं.

 
तुम्हाला यातली कुठल्या क्रमांकाची गोष्ट जास्त आवडली? कमेंट करून कळवा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required