computer

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले जगातील १६ प्राणी : भाग १

आजवरच्या माहितीनुसार पृथ्वी हा सजीव सृष्टी असणारा सूर्यमालेतील एकमेव ग्रह असावा. पृथ्वीवर जैवविविधता असल्याने अनेक प्रकारचे सजीव आपल्याला पहायला मिळतात. जेव्हा पृथ्वीवर सजीव निर्माण झाले त्यावेळी त्यांचे स्वरूप वेगळे होते. डायनोसॉरस, ऱ्हायनोसॉरस, महाकाय असे आकाराने प्रचंड जीव इथे होते याचेही दाखले मिळाले आहेत.. परंतू भूस्खलन, भूकंप, ज्वालामुखींचे उद्रेक, नष्ट होत गेलेले अधिवास इत्यादी कारणांमुळे हे जीव नामशेष होत गेले. कालांतराने पुन्हा जीवसृष्टीचा उदय झाला. हे नवीन सजीव आकाराने लहान व वैविध्यपूर्ण होते. यातच माणसाचाही समावेश होता.

आपल्या इतर सजीवांच्या मानाने विकसित बुद्धी आणि मेंदूच्या जोरावर माणसाने प्रचंड प्रगती केली. आपल्यासाठी अनेक भौतीक सुखसोयी निर्माण केल्या, आपले जीवन संपन्न बनवले. ही झाली नाण्याची एक बाजू. दुसऱ्या बाजूला त्याने आपल्या सोयीसाठी जंगले तोडली, अनेक प्रकारची प्रदूषणे आणि ग्रीनहाऊस गॅसेस सारख्या हानीकारण आणि पर्यावरण विघातक गोष्टी जन्मास घातल्या. याचा परिणाम होऊन इतर सजीवांपैकी जे जास्त संवेदनशील होते असे अनेक सजीव त्यांच्या संपत गेलेल्या नैसर्गिक अधिवासामुळे एकतर नष्ट झाले किंवा दुर्मिळ झाले किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यांपैकी बरेचसे सजीव केवळ प्राणी नाहीत तर अनेक वनस्पतीही आहेत..आणि त्यातले बरेचसे आपल्या अवतीभवती, शेजारच्या देशांमध्ये, आपल्या देशाच्या समुद्रकिनाऱ्यांजवळ आढळणारे सजीव आहेत. असे अनेक प्राणी, ज्यांना आपण तरी पाहिलं असेल, पण आपल्या येणाऱ्या पिढ्या त्यांना केवळ पुस्तकांतून, चित्रांतून,अँनिमेशनमधून पाहतील. कारण, ते आपल्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कोण आहेत हे प्राणी? 

'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन' ने अशा ५१ संवेदनशील प्राण्यांची यादी केली आहे. त्यातील अनेक प्राणी आपल्या देशात, आपल्या खंडात आढळतात. कोण आहेत हे प्राणी जे जागतिक तापमानवाढीमुळे आणि संपत चाललेल्या नैसर्गिक अधिवासामुळे नष्ट होत आहेत? आजच्या पहिल्या भागात अशा ८ प्राण्यांची नावे पाहूया !!

१) Snow leopard (हिमबिबट्या ) :-

हा अल्पाइन मार्जार वर्गातील प्राणी चीन, नेपाळ, तिबेट आणि हिमालयातील अतिउंच पर्वतरांगावर आढळतो. WWF (वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड) यांनी हिमबिबट्याला दुर्मिळ संरक्षित प्रजातीचा दर्जा दिला आहे. तापमानवाढीमुळे त्याचा आहार असलेले हिमससे दुर्मिळ झाल्यामुळे ह्या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहेत. तसेच एकूण संख्येच्या १० टक्क्यांनी कमी होण्याच्या मार्गावर आहे.

२) Giant Panda (जायंट पांडा) :-

WWF चे बोधचिन्ह असलेला अस्वल प्रजातीय पांडा हा देखील आता अतिसंरक्षित प्रजातींमध्ये गणला जातो. चीनच्या पश्चिमेकडच्या भागात आढळणारा पांडा हा शाकाहारी असून बांंबूरुट्स हे त्याचे मुख्य खाद्य आहे. आपली भूक भागवण्यासाठी प्रत्येक पांडा २६ ते ८४ पाउंड बांबूचे सेवन करतो. पण तापमानवाढीमुळे बांबूंची जंगले कमी होत आहेत. परिणामी या पांडांवर स्थलांतराची व दुसरा अधिवास शोधण्याची वेळ येऊ घातली आहे, ज्याचा परिणाम त्यांच्या कमी झालेल्या संख्येत दिसतो आहे.

३) Green Sea Turtle ( हिरवे समुद्री कासव ) :-

उष्णकटिबंधीय व समशितोष्ण कटिबंधीय समुद्रांमध्ये आढळणारी ही कासवे अतिसंवेदनशील असतात. समुद्राच्या पाण्याच्या तापमानावर त्यांचे जीवन अवलंबून असते. किनाऱ्यावरील ज्या वाळूत ती अंडी घालतात त्या वाळूच्या तपमानावर त्यांच्या नर किंवा मादी यांच्या जननदराचे प्रमाण ठरते. वाढत्या समुद्री तापमानामुळे मादी कासवांची संख्या वाढत असून या प्रजातीमधील नर कासवे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबरोबरच वितळत चाललेल्या ध्रुवीय बर्फामुळे समुद्राची पातळी वाढत असल्याने यांच्या अंडी घालण्याच्या पारंपारीक जागा नष्ट होत आहेत. कमी होत चाललेल्या नर कासवांच्या जनन दरामुळे ह्या कासवांना दुर्मिळ प्रजातीमधे समाविष्ट करण्यात आले आहे.

४) Cheetah ( चित्ता ) :-

आफ्रिकेतील सहारा हे जरी चित्त्याचे घर असले तरी अल्जेरीया आणि नायजर या भागांतही तो आढळतो. अतिशय वेगवान असा हा देखणा प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तो तापमानवाढीमुळे. वाढत्या तापमानाचा नर चित्त्याच्या शुक्राणूंवर परिणाम होतो आहे. ज्यामुळे नर चित्त्यांमधली प्रजननशक्ती कमी होत आहे. त्याचबरोबर त्यांचे आवडते खाद्य असलेले हरीण देखील नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने उपजिवीकेसाठी चित्त्याला इतर शाकाहारी प्राण्यांकडे वळावे लागले. या पर्यायी अन्नात चित्त्यासाठी आवश्यक असलेले प्रोटीनचे प्रमाण कमी आहे. परिणामी अन्नाअभावी व प्रजननक्षमतेतील बदलांमुळे चित्ता दुर्मिळ होत आहे व धोक्यात आलेल्या प्रजातींमध्ये समाविष्ट झाला आहे.

५) Tiger (वाघ) :-

रशिया, भारत, बांग्लादेश आणि नेपाळ अशा उष्णकटिबंधीय आणि झुडपांचा प्रदेश असलेल्या आशियायी देशांमध्ये वाघ आढळतो. जरी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असला तरी, त्याच्या होत असलेल्या बेसुमार शिकारीमुळे खुद्द भारतातच तो दुर्मिळ झाला आहे. वातावरणातील बदलत गेलेल्या अनेक घटकांमुळे वाघांची संख्या कमी होत चालली आहे. वाढत्या समुद्रपातळीमुळे बंगाली वाघांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. त्यांच्या नैसर्गिक अधिवासांवरील मानवी अतिक्रमण, भक्ष्याची कमतरता, जंगलातील वणवे, वनांवरील मानवी अतिक्रमण या सर्व कारणांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

६) Dolphin (डॉल्फिन) :-

ग्लोबल वॉर्मिंग आणि बदलते समुद्री प्रवाह ह्या कारणांंमुळे डॉल्फिन्स ची संख्या घटत आहे. या बदललेल्या समुद्री प्रवाहांमुळे त्यांचे खाद्य असलेले मासे आणि त्यांच्या स्थलांतराच्या जागाही बदलत आहेत. डॉल्फिन्सच्या अनेक प्रकारच्या प्रजाती (१६ प्रकार) ज्यात नदीतील डॉल्फिन, न्युझीलंड माऊ डॉल्फिन यांचा समावेश आहे. हे डॉल्फिन विलुप्त प्रजातींच्या यादीत समाविष्ट झालेले आहेत.

७) Red Panda (रेड पांडा ) :-

शाकाहारी असलेला हा प्राणी 'लेसर पांडा' किंवा 'रेड बिअर कॅट' म्हणूनही ओळखला जातो. हा प्राणी मुख्यतः हिमालयाच्या पूर्व भागात आढळतो. कमी होत चाललेली बांबूंची वने त्यामुळे संपूष्टात आलेला नैसर्गिक अधिवास, हे या देखण्या प्राण्याच्या ऱ्हासाचे कारण बनले आहे. जायंट पांडा प्रमाणेच यांचाही विलूप्त होत चाललेल्या प्राण्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

८) Greater one-horned rhino (भारतीय एकशिंगी गेंडा) :-

भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील गवताळ व पाणथळ जागांवर हा गेंडा आढळतो. दोन दशकांपूर्वी आश्चर्यकारकरीत्या झालेल्या पुनर्वसनानंतरही हा प्राणी अजूनही दुर्मिळ संरक्षित प्रजाती म्हणून गणला जातो. 'माईल अ मिनिट विड' या एक प्रकारच्या गवतामुळे त्याचे मुळ खाद्य असलेले गवत नष्ट होत आहे. त्याचबरोबर वाढत्या तापमानामुळे कमी होत चाललेल्या पाणथळ थंड जागा (ज्या गेंड्याच्या नैसर्गिक अधिवास आहेत) यामुळेही त्यांची संख्या घटत चालली आहे.

 

लेखिका: मानसी चिटणीस

सबस्क्राईब करा

* indicates required