computer

कंपन्या लोगो का बदलतात? या १६ कंपन्यांचा लोगोतल्या बदलांनी भरपूर फायदा झाला आहे!!

'ओल्ड वाईन इन न्यू बॉटल' अशी एक म्हण आहे. एखादी गोष्ट सादर करताना ती जर नव्या रूपात, हटके अंदाजात पेश केली तर लोकांचं लक्ष वेधून घेते. बाजारपेठेत अनेकदा कंपन्यांनाही हा प्रयोग करावा लागतो. अगदी एस्टॅब्लिश्ड असलेले भिडूही अधूनमधून ब्रँडला ग्राहकांशी जोडून घेण्यासाठी रिब्रॅंडिंगचा खेळ खेळतात. काय आहे हे रिब्रॅंडिंग?

एखादा ब्रँड आधी जोरात चालतो. त्याचा लोगो, स्लोगन, टॅगलाईन लोकांच्या मनाला भिडतात. त्या ब्रँडची एक इमेज तयार होते. जसं ऍपलची उत्पादनं म्हटली की त्यांचं स्लीक डिझाईन डोळ्यांसमोर येतं, तसंच एक घास खाल्लेलं सफरचंदही. नाइके कंपनीचा लोगो गतीचा आभास निर्माण करतो. पण हे एवढ्यातच संपत नाही.

कधीकधी काही दिवसांनी लोकांना त्यात तोचतोचपणा जाणवायला लागतो. ग्राहक तसा महाचंचल प्राणी! त्याला सतत काहीतरी नवं लागतं. त्याच्या आवडीनिवडी बदलत राहतात. दहावीस वर्षांपूर्वी जे अगदी हिट होतं, ते आज तितकं चालत नाही असंही चित्र दिसतं. त्यामुळे बाजारपेठेचा कल ओळखून त्याप्रमाणे आपल्या ब्रँडचा चेहरामोहरा बदलणं आवश्यक ठरतं. लोगोत ताजेपणा आणणं हा यामागचा मुख्य उद्देश. थोडक्यात रिब्रँडींगचा एक भाग म्हणजे लोगोत बदल करणं. हा प्रयोग अनेकदा यशस्वी होतो, कारण तो मुख्यतः नव्या पिढीला डोळ्यासमोर ठेवून केलेला असतो. नवी पिढी उत्पादनासोबत स्वतःला जोडून घेते आणि साहजिकच सेल्सचे आकडे वाढतात.

आता हा लोगो कधी बदलला जातो?

  • कंपनी एखाद्या क्षेत्रात नव्याने प्रवेश करत असल्यास,

  • कंपनीला तिच्या क्षेत्रात अनेक स्पर्धक निर्माण झाल्यास त्यांच्यापेक्षा वेगळं उठून दिसण्यासाठी,

  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करत असल्यास इतर देशांच्या संस्कृतींशी जुळवून घेण्यासाठी.
    उदाहरणार्थ विविध आकार, रंग यांचा वेगवेगळ्या देशांत, तिथल्या संस्कृतींनुसार वेगवेगळा अर्थ असतो. अशा वेळी आपला लोगो वादग्रस्त ठरू नये म्हणून कंपन्या तो बदलतात, म्हणजे रिब्रॅंडिंग करतात.

     

  • कोणत्याही कारणाने कंपनीची प्रतिमा मलिन झाल्यास,

  • आधी म्हटल्याप्रमाणे नवीन पिढीशी जोडून घेण्यासाठी, ब्रँडमध्ये ताजेपणा आणि आधुनिकता आणण्यास,

  • व्यवसायाच्या मालकीत बदल झाल्यास : म्हणजे दोन कंपन्या एकत्र (मर्ज) झाल्यास किंवा एका कंपनीने दुसरी कंपनी विकत घेतल्यास,

रिब्रॅंडिंग करून यशस्वी झालेल्या काही ब्रॅंड्सची उदाहरणं बघू.

१. स्टारबक्स :

कॉफीप्रेमींना हे नाव चांगलंच परिचयाचं आहे. त्यांनी आतापर्यंत चार वेळा लोगो बदलला आहे. २०११ मध्ये स्टारबक्सने कॉफीव्यतिरिक्त आईस्क्रीम, अल्कोहोल या इतर क्षेत्रात पदार्पण केलं. त्यामुळे त्यांनी रिब्रॅंडिंगचा आधार घेतला. सुरुवातीला यावर काहीशी संमिश्र प्रतिक्रिया उमटली. पण कालांतराने ग्राहकांनी याही लोगोला आपलंसं केलं. यानंतर कॉफीच्या बाजारपेठेत ते अव्वल राहिले आणि रिब्रॅंडिंग त्यांच्यासाठी यशस्वी ठरलं.
१९७१ पासून लोगोत झालेले बदल पाहिले तर रंगात बदल दिसतील. शिवाय सुरुवातीचं त्यांचं प्रतिकचिन्ह फक्त अक्षरांचं होतं, ते बदलून त्याची जागा हळूहळू पिक्टोरियल मार्क (केवळ इमेज) प्रकारच्या प्रतिकचिन्हाने घेतल्याचंही आढळून येईल.

२. गुगल :

गुगलने २०१५ मध्ये लोगो बदलला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या फॉन्टची स्टाईल बदलली, जेणेकरून ही अक्षरं सर्व डिव्हाइसेसवर सहज दिसतील. त्यामुळे गुगल जास्त मोबाईलस्नेही झालं आहे आणि युझर्सच्या पसंतीस उतरलं आहे.

३. मॅक्डोनल्ड्स :

मॅक्डोनल्ड्सनेही त्यांच्या लोगोत अनेकदा बदल केला. अमेरिकेतील सगळ्यात मोठं फास्ट फूड रेस्टॉरंट म्हणून ओळख असलेल्या मॅकडीला अनेकदा टीकेला सामोरं जावं लागलं. ते देत असलेले खाद्यपदार्थ पोषणरहित आहेत, त्यामुळे लठ्ठपणा वाढतो हा या टीकाकारांचा नेहमीचा आरोप होता. त्यातून कंपनीच्या इमेजला धोका निर्माण झाला होता. आताच्या लोगोने मात्र बराच फायदा करून दिला आहे.
मॅकडीच्या लोगोतील वैशिष्ट्यपूर्ण एम आणि त्याचा सोनेरी बाक तुम्ही नीट पाहिला आहे का? त्याचा पिवळा रंग कोणत्याही पार्श्वभूमीवर उठून दिसतो. हा आकार काहीसा स्त्रियांच्या स्तनांच्या आकारासारखा आहे, ज्यातून कंपनीला त्यांचं उत्पादन आईच्या दुधासारखं पोषक आहे हे ग्राहकांच्या मनावर बिंबवायचं होतं. यात हा लोगो चांगलाच यशस्वी ठरला आहे.

४. हिरो होंडा :

भारतीय हिरो आणि मूळची जापनीज कंपनी होंडा एकमेकांपासून अलग होऊन हीरो मोटोकॉर्प अस्तित्वात आली. यामुळे त्यांचा लोगोही बदलला. हा बदललेला लोगो चांगलाच यशस्वी ठरला. यामुळे हिरोला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरण्याची आणि त्यांच्या बाईक्स इतर देशांना निर्यात करण्याची संधी मिळाली.
नवा लोगो हा अत्युच्च ऊर्जा आणि 'आम्हीही हे करू शकतो' असा विचार यांचं प्रतीक आहे. यात लाल आणि काळा रंग वापरले आहेत. लाल रंग हा आत्मविश्वास, बदल आणि सातत्य यांचं प्रतीक आहे. या लोगोत एच हे अक्षर दडलेलं आहे पण त्याची स्टाईल काहीशी अँग्युलर फॉरमॅटमध्ये आहे. यातून आता हा ब्रँड परदेशी कंपनीवर अवलंबून नसून स्वतःच्या क्षमतेवर पुढे येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

५. इंस्टाग्राम :

इंस्टाग्रामने २०१६ मध्ये लोगो बदलला. पूर्वीचा पोलरॉईड कॅमेरा असलेला जुना लोगो बदलून त्याऐवजी त्यांनी सध्याचा साधा - सुटसुटीत, आणि तरीही आधुनिक वाटेल असा लोगो स्वीकारला आहे.

६. द हफिंग्टन पोस्ट

अमेरिकेतील हे टॉपचं ऑनलाईन न्यूज चॅनेल. त्यांचा सुरुवातीचा लोगो- मुख्यतः त्याचा फॉन्ट- प्रिंटेड न्यूजपेपरसारखा होता. पुढे त्याच्या संस्थापकाने ही कंपनी सोडली तेव्हा तिचं रिब्रॅंडिंग केलं गेलं. त्यावेळी कंपनीचं नाव बदलून हफपोस्ट असं झालं आणि लोगोही बदलला गेला. आताचा लोगो त्याच्या बोल्ड फॉन्टमुळे त्वरित नजरेत भरतो.

७. Airbnb :

ही अमेरिकन कंपनी मुख्यतः पर्यटनाशी संबंधित सेवा देते. या कंपनीला अनेक कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला होता आणि त्यानंतर मोठा फटका बसला होता. त्यांनी आपला आधीचा लोगो बदलून नवीन सुटसुटीत लोगो आणला. या लोगोमध्ये चार प्रतीकं आहेत. A म्हणजे Airbnb, मध्यभागी असलेलं लोकेशनचं चिह्न म्हणजे ठिकाण, वर्तुळ म्हणजे डोकं (ग्राहक), आणि सिम्बॉल उलट केल्यास तयार होणारा हार्ट शेप म्हणजे प्रेम.
नवीन लोगोनंतर कंपनीकडे पाहण्याचा ग्राहकांचा दृष्टीकोन बदलला आणि याचा कंपनीला बराच फायदा झाला.

८. फेडरल एक्स्प्रेस :

चार बिल्डिंग्जच्या पलीकडूनही स्पष्ट दिसेल अशा प्रकारचा लोगो बनवण्याचं चॅलेंज कंपनीच्या सीईओने दिल्यावर सध्याचा फेडरल एक्स्प्रेसचा लोगो अस्तित्वात आला. यानंतर त्यांचा सेल २०% ने वाढला आहे.

९. मायक्रोसॉफ्ट :


मायक्रोसॉफ्टचा जुना लोगो बघा. १९७५ मधील हा लोगो खूप वेगळा आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी रिब्रॅंडिंगची गरज आहे हे पटल्याने कंपनीने लोगोत वेळोवेळी बदल केले. सध्याचा लोगो साधा, फ्रेम नसलेला आहे. अर्थात त्यात कंपनीच्या नावाबरोबर असलेला विंडोजचा सिम्बॉल लक्ष वेधून घेतो.

१०. फॉक्सवॅगन :


फॉक्सवॅगन या जर्मन शब्दाचा अर्थ आहे लोकांची गाडी. फॉक्सवॅगनचा ब्लॅक अँड व्हाईट लोगो सुरुवातीला गिअरच्या आकारात होता. कंपनीने वाटचालीदरम्यान यात अनेकदा बदल केले. सध्याचा लोगो निळा आणि चंदेरी रंगाचा आहे. या लोगोत कंपनीच्या नावातील V आणि W ही अक्षरं एकमेकांवर ओव्हरलॅप होतील अशा प्रकारे बसवली आहेत. निळा रंग उत्कृष्ट दर्जा, क्लास, आणि विश्वासार्हता यांचं, तर चंदेरी रंग शुद्धता आणि सौंदर्य यांचं प्रतीक आहे.

११. नाइके :

नाइके म्हणजे स्पोर्ट्स वेअर आणि स्पोर्ट्स वेअर म्हणजे नाइके. 'जितकं कमी तितकं चांगलं' याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाइकेचा लोगो (स्वूश). यात काय आहे? एक साधंसं टिकमार्कसारखं दिसणारं चिन्ह. पण यातून जो एक वेगाचा आभास निर्माण होतो तोच ब्रँडबद्दल सारं काही सांगतो.

१२. पेप्सी :

पेप्सीने लोगोत अनेकदा बदल करून रिब्रॅंडिंग केलं. सध्याच्या लोगोत लाल, निळा आणि पांढरा हे रंग आहेत.

१३. रेनॉ (Renault) :


रेनॉचा सध्याचा लोगो त्याच्या आधीच्या लोगोंपेक्षा खूप वेगळा आहे. अनेकांच्या मते पूर्वीचे लोगो गोंधळात टाकणारे होते. आजचा लोगो सुटसुटीत डायमंड आकारात आहे.

१४. ऍपल :


ऍपलच्या लोगोच्याही अनेक आवृत्त्या येऊन गेल्या आहेत. सुरुवातीला न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लावला हे सांगणारं ग्राफिक लोगो म्हणून वापरलं गेलं. पुढे इंद्रधनुषी रंगात एक घास खाल्लेलं सफरचंद लोगो म्हणून अस्तित्वात आलं. या रंगात बदल होत गेले. सध्याचा लोगो एकाच रंगात आहे.

१५. कॅनन :


कॅननचा आधीचा लोगो अतिशय क्लिष्ट आणि कालबाह्य होता. कंपनीने त्यात बदल करून सध्याचा लाल रंगात canon ही अक्षरं कोरलेला लोगो वापरात आणला. त्यानंतर कंपनीचा नफ्याचा आकडा वाढला आहे.

१६. कोका कोला


कोका कोलाचा अगदी सुरुवातीचा लोगो अजिबात नजरेत भरणारा नव्हता. त्याचं डिझाईन वेळोवेळी बदललं गेलं आणि त्यातून सध्याचा स्टायलिश लोगो साकार झाला.

मॉरल ऑफ द स्टोरी : रिब्रॅंडिंग केल्याने- लोगोत बदल केल्याने- अनेक ब्रँड्सचं नशीब फळफळलं आहे.

या सगळ्याला अजून एक पैलू आहे. कधीकधी एखादा लोगो आक्षेपार्ह वाटल्याने बदलावा लागतो. नुकताच मिंत्रा या ब्रँडच्या बाबतीत असा प्रसंग घडल्याचं तुम्हाला माहीत असेलच. पण वादग्रस्त असल्याने लोगो बदलावा लागला अशा घटना फारच कमी आहेत.

लोगो डिझाईन हे अत्यंत आव्हानात्मक आणि खर्चिक काम आहे. तरी कंपन्या त्यात वारंवार बदल करताना दिसतात. कशासाठी? तर बाजारपेठेत स्वतःचं स्थान निर्माण करणं, ग्राहकाशी कनेक्ट होणं त्यांच्या अस्तित्वासाठी गरजेचं असतं. एक प्रकारे बिझनेस वाढवण्यासाठी केलेली ती गुंतवणूक असते.

रिब्रॅंडिंगचे अजून काही किस्से तुम्हाला माहिती आहेत का? असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required