computer

१५ वर्षांचा हा मुलगा जगातला सर्वात खतरनाक हॅकर समजला जायचा. त्याचा अंत कसा झाला माहित आहे?

हॅकिंग म्हणजे काय? टेक्निकली याचा अर्थ खूप क्लिष्ट आहे, पण साध्या भाषेत सांगायचे तर सरळसरळ दुसऱ्याच्या घरात किंवा खरंतर संगणकात घुसून चोरी करणे. संगणकीय भाषेत सांगायचे झाल्यास विनापरवानगी एखादे अकाऊंटचे पासवर्ड मिळवून लॉगिन करणे किंवा अनधिकृतपणे वेबसाईटवरची माहिती मिळवून त्याचा गैरवापर करणे. हे हॅकिंग कुणीही उठून करु शकत नाही. यासाठी तांत्रिक तज्ञ असावे लागते. पण याच हॅकिंगमध्ये अमेरिकेच्या १५ वर्षाच्या एका मुलाने असा काही कारनामा केला की त्या मुलाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. त्याच्या आयुष्यात इतके चढ-उतार आले की शेवटी त्याला स्वतःचा जीव द्यावा लागला. कोण आहे हा मुलगा?त्याची संपूर्ण कहाणी शेवटपर्यंत नक्की वाचा.

हा १५ वर्षाच्या हॅकर जोनाथन जेम्स. याने केवळ गंमत म्हणून नासाची यंत्रणा हॅक केली. यामुळे नासाला अनेक दिवस आपले काम थांबवावे लागले होते. ही गोष्ट १९९९ सालची आहे. त्यावेळी अमेरिकेत संगणक आणि इंटरनेटचा ट्रेंड सुरू झाला होता. सर्व तरुणांना त्यावेळी इंटरनेटवर काम करणे खूप भारी वाटायचं. इंटरनेटचा उपयोग करून काय करता येईल यासाठी अनेकजण नवनवीन प्रयोग करायचे. जेम्स त्यावेळी फक्त १५ वर्षांचा होता. त्याला संगणकाचे जग समजून घ्यायचे होते. वडील कॉम्प्युटर प्रोग्रामर असल्यामुळे त्याला ७व्या वर्षापासून कॉम्प्युटरचे कुतूहल होते. या नवनवीन गोष्टी तो खूप चटकन शिकायचा. हळूहळू तो हॅकिंगकडेही वळला. जेम्सला हॅकिंग एक थ्रील वाटायचे. त्यासाठी त्याने कॉम्रेड हे युझरनेम घेतले होते. या नावाने जेम्सने हॅकिंगच्या जगात प्रवेश केला आणि हॅकिंगचे प्रोग्रॅम बनवायला सुरुवात केली. ज्या वयात जेम्सचे समवयस्क खेळताना उड्या मारायचे त्या वयात जेम्स कॉम्प्युटरसमोर तासनतास बसून कोडिंग करायचा.

हळुहळू हॅकिंगमध्ये जेम्सचा चांगला हात बसला. छोटे प्रोग्राम बनवून तो हॅकिंग सहज करायचा, पण त्याला काहीतरी मोठे करून खळबळ उडवून द्यायची होती. म्हणून त्याने देशातील सर्वात सुरक्षित नासाची संगणक प्रणाली हॅक करण्याचा विचार केला. जेम्सने असा प्रोग्राम बनवला ज्याद्वारे तो नासाच्या सुरक्षित यंत्रणा पाहू शकतो. त्यासाठी त्याने स्थानिक शाळा आणि स्टोअरमध्ये तो प्रोग्राम रन म्हणजे चालवून पहिला. तो यशस्वी झाल्यावर जेम्सने हा प्रोग्राम थेट नासाच्या संगणकावर पाठवला. त्यामुळे नासाची सिस्टीम हॅक झाली. जेम्स फक्त सिस्टम हॅक करण्यापर्यंत थांबला नाही. त्याने नासाच्या यंत्रणेतील एक सॉफ्टवेअरही चोरले. असे म्हटले जाते की त्या सॉफ्टवेअरची किंमत सुमारे $1.7 दशलक्ष होती. नंतर जेम्सने इंटरनेशनल स्पेस स्टेशनचा सोर्स कोड ही हॅक केला. जेम्स कळत-नकळत मोठा गुन्हा करत होता, त्याला पुढे काय होणार याची कल्पना नव्हती.

काही दिवसांनी नासाला या हॅकिंगची माहिती मिळाली. सोर्स कोडमध्ये छेडछाड केल्याची माहिती नासाला कळताच त्यांना त्यांची सर्व यंत्रणा बंद करावी लागली. त्यामुळे त्यांचे सुमारे ४१,००० डॉलर्सचे नुकसान झाले. सगळ्यांना वाटले की हे कुठल्यातरी मोठ्या हॅकिंग ग्रुपचं काम आहे. हॅकर शोधणे सोपे नव्हते. बऱ्याच दिवसानंतर जेम्सचे नाव समोर आले.

जेम्सचे ठिकाण समजल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. जेम्सला इतके काही होईल याची कल्पना आली नव्हती. काही समजण्यापूर्वीच त्याला तुरुंगात टाकण्यात आले. दुसऱ्या दिवशी जेम्सला न्यायालयात हजर करण्यात आले. हॅकिंगसाठी जेम्सला सहा महिन्यांची शिक्षाही झाली होती. जेम्स त्यावेळी अल्पवयीन असल्याने आणि त्याने कुठलाही वाईट उद्देश ठेवून हॅकिंग केल्याचे आढळले नाही.त्याची शिक्षा खूपच कमी होती. नाहीतर दहा वर्ष कारावास करावा लागतो. हॅकिंगसाठी दोषी ठरलेला जेम्स हा पहिला सर्वात अल्पवयीन अमेरिकन ठरला.

जेम्सने हॅक केलेल्या सर्व विभागांची माफी मागितली. शिक्षेचे सहा महिने जेम्ससाठी खूप अवघड होते. त्याला डिप्रेशन आले. त्याला गुन्हेगार मानले जात होते. बाहेर आल्यावरही गुप्तचर यंत्रणांची नजर जेम्सवर कायम होती. जेम्सने पुन्हा हॅकिंग केली नाही असे म्हणतात. काही वर्षांनी अमेरिकेत पुन्हा मोठ्या प्रमाणावर हॅकिंग करण्यात आली. ही हॅकिंग पद्धत जेम्सने वापरलेल्या पद्धतीसारखीच होती. तपासात ही बाब समोर येताच सुरक्षा यंत्रणांचा पहिला संशय जेम्सवर गेला.त्यांनी थेट जेम्सच्या घरावर धाड टाकली. जेम्सला धक्का बसला पण त्याच्या घरातून कोणताही पुरावा सापडला नाही.

सतत संशय घेतला गेल्यामुळे जेम्स खूप डिप्रेशन मध्ये गेला. त्याला सतत तुरुंगात टाकतील अशी भीती वाटू लागली. त्याला पुन्हा तुरुंगात जायचे नव्हते. छापा टाकून दोन आठवडेही झाले नव्हते की एके दिवशी अचानक १० मे २००८ ला बातमी आली की जेम्सने आत्महत्या केली आहे. त्याने बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली . एवढेच नाही तर त्याने पाच पानी सुसाईड नोटही लिहिली होती. त्यात लिहिले होते की कायदा आणि सुव्यवस्थेवर त्याचा अजिबात विश्वास नाही. त्याच्यावर न केलेल्या गैरकृत्यांचा ठपका ठेवला जात आहे. म्हणूनच तो स्वतःला संपवत आहे. जेणेकरून त्याच्या जाण्यानंतर लोकांना त्याची समस्या समजेल. अमेरिकेतील सर्वात मोठ्या हॅकर्सपैकी एक हॅकर आज संपला आहे.

त्यावेळी तो फक्त २४ वर्षाचा होता. वयाच्या १५ व्या वर्षी जेम्सने नासाची यंत्रणा हॅक करून जगात दहशत निर्माण केली होती. मात्र हाच तहलका अखेर त्याच्या अंताचे कारण ठरला. त्याने केलेली गंमत त्याच्याच जीवावर आली.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required