computer

२००० पाक सैनिकांना १०० भारतीय सैनिकांनी कशा प्रकारे धूळ चारली ? खऱ्याखुऱ्या 'कुलदीप सिंह चांदपुरी' यांच्या नेतृत्वाची गोष्ट !!

सनी देओलने साकारलेले चांगले रोल्स कोणते असा विचार केला की  अनेक रोल आपल्या डोळ्यासमोर येतात. बॉर्डरमधला त्याने साकारलेला ‘कुलदीप सिंह चांदपुरी’ हा रोल त्या पैकीच एक.  बॉर्डरमधला सनी देओल तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, पण आज जाणून घेऊया खऱ्याखुऱ्या ‘कुलदीप सिंह चांदपुरीं’बद्दल !!

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान लोंगेवाला चौकीवर ‘कुलदीप सिंह चांदपुरी’ लढले होते. या लढाईतील त्यांच्या अतुलनीय नेतृत्वासाठी त्यांना ‘महावीर चक्र’ने गौरवण्यात आलं होतं.  चांदपुरींनी १९६२ साली त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९६२ साली ते भारतीय सेनेत भरती झाले आणि चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून पद (कमिशन) मिळवून  त्यांनी पंजाब रेजिमेंटच्या २३ व्या बटालियनमध्ये स्थान मिळवले. यानंतरही आपल्या कामगिरीच्या जोरावर ते पुढे जात राहिले. त्यांच्या कारकीर्दीचा मानबिंदू म्हणजे १९७१ चं युद्ध!!

लोंगेवाला चौकीवर झालेल्या लढाईत नक्की काय घडलं ?

आता सिनेमा बघून तुम्हांला माहितच असेल, पण तरीही आम्ही सांगतो. राजस्थानात जेसलमेरपासून साधारण १२५ किलोमीटरवर लोंगेवाला नावाचं ठिकाण आहे. लोक जेसलमेरला गेले की एकदा तिकडेही चक्कर टाकून येतात. असो, तर ही प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेली ही लोंगेवाला चौकी जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगढजवळ आहे. १९७१ च्या युद्ध झालं तेव्हा तिथे पंजाब रेजिमेंटच्या २३ व्या बटालियन मधले १०० ते १२० सैनिक तैनात होते.  ‘कुलदीप सिंह चांदपुरी’ तिथले कमांडिंग ऑफिसर होते. पाकिस्तानी हेरांनी या चौकीबद्दलची बरीच गुप्त माहिती काढून घेतली होती. चौकीवर फक्त शंभरेक  सैनिक आहेत ही बातमी त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची होती. साहजिकच  आपण ही चौकी सहज काबीज करू असा पाकिस्तानी सैन्याचा समज होता. पण त्यांचा हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार होता.

कुलदीप सिंह चांदपुरी यांनी पाकिस्तानी सैनिकांचा अदमास घेण्यासाठी लेफ्टनंट धरमवीर भान यांना सीमेनजीक टेहळणीसाठी पाठवलं होतं. त्यांनी माहिती आणली की रणगाडे आणि फौजांचा एक मोठा जत्था त्यांच्या दिशेने येत आहे. या जत्थ्यात तब्बल २००० सैनिक आणि ५० पेक्षा जास्त रणगाडे होते.  ही बातमी मिळताच चांदपुरी यांनी वरिष्ठांकडून मदत मागितली, पण जास्तीची कुमक लगेच पाठवता येणार नाही असं त्यांना सांगण्यात आलं. चांदपुरी यांच्यापुढे २ पर्याय ठेवण्यात आले. एकतर तिथून माघार घ्यायची किंवा शेवटपर्यंत लढा द्यायचा. चांदपुरी यांनी दुसरा पर्याय निवडला.

बॉर्डर चित्रपटात सनी देओलच्या तोंडी असलेलं पुढील वाक्य चांदपुरी यांच्यातील आत्मविश्वास दाखवून देण्यासाठी पुरेसं आहे.

वो कहते है सुबह का नाश्ता जैसलमेर में करेंगे,
दोपहर का खाना जोधपुर में करेंगे,
और रात का दिल्ली में.
लेकिन आज हम उनका नाश्ता करेंगे,
गुरू महाराज ने कहा है की एक खालसा सवा लाख के बराबर होता है,
आज उनकी बात सच कर दिखाने का वक्त आ गया है.

१००/१२० सैनिक आणि २ विमाने विरुद्ध २००० सैनिक आणि ५० पेक्षा जास्त रणगाडे असं ते युद्ध होतं. हे युद्ध बरोबरीचं नव्हतं, पण विजयाचं दान भारतीय सैन्याच्या पदरात पडलं. या युद्धात मुठभर भारतीय सैनिक अवाढव्य पाकिस्तानी फौजेला भारी पडले होते. या युद्धात २ सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. 

मंडळी, कुलदीप सिंह चांदपुरी यांनी ऐन युद्धाच्या प्रसंगी जो निर्णय घेतला तो कमालीचा बेदरकार होता. समोर शत्रुसैन्य आपल्या अनेकपट मोठं असूनही ते युद्धभूमीवरून हलले नाहीत. १९७१ च्या युद्धातील कुलदीप सिंह चांदपुरी यांची कामगिरी अतुलनीय आहे. अशा या भारतमातेच्या शूरवीरास बोभाटाची भावपूर्ण आदरांजली.

सबस्क्राईब करा

* indicates required