computer

हरवलेला मोबाईल फोन परत मिळवण्याच्या ३ भन्नाट आयडिया !!

स्मार्टफोन्स आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा झाले आहेत. दहा पंधरा वर्षांपूर्वी लोक सोबत एफ एम रेडिओ घेऊन फिरायचे, गावाला जाताना सोबत कोडॅकचा कॅमेरा सोबत बाळगावा लागयाचा, टॉर्चपण कधीकधी लागायचा. पण आज हे सगळं आपल्या 'मुठ्ठी'मध्ये सामावलंय. गाणी ऐकणं, व्हिडीओ बघणं, नकाशामध्ये पत्ता शोधणं आणि अर्थातच मेसेज व कॉल करणं या सगळ्या गोष्टी मोबाईलशिवाय कशा होणार?  आपण या मोबाईलवर इतके अवलंबून आहोत की पूर्वी मित्रमंडळींनी कुठं भेटायचं ठरवलं असेल तर ते  लोक विनामोबाईल कसे भेटत असतील हा प्रश्नच पडतो नाही?  रोज मोबाईल वापरताना मात्र आपण आपली अत्यंत वैयक्तिक माहितीसुध्दा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करतो.  फॅमिली फोटो तर असतातच, पण महत्वाचे इमेल्स, फेसबुक व्हाट्सॲपवरच्या चॅट्स.. काही महान लोक तर त्यात एटीम आणि क्रेडिट कार्डाचे पिन नंबर आणि इमेल्सचे पासवर्ड्स पण सेव्ह करतात. आता बोला!! 

पण… समजा हा असा अनेक गोष्टींचा साक्षीदार असलेला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर??? 

मंडळी, पैशांच्या नुकसानीपेक्षा आपला डेटा दुसऱ्यांच्या हाती पडणे हे जास्त धोक्याचं असतं. चला तर मग पाहूया चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन कसा शोधायचा… 

असा शोधा तुमचा फोन- पद्धत १

आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये एक इन बिल्ट ॲप असतं. ते म्हणजे ‘अँड्रॉइड डिव्हाईस मॅनेजर’ (Android Device Manager). गुगलने बनवलेलं हे ऍप पूर्वी प्ले स्टोअर वरून डाउनलोड करावं लागायचं.  परंतु आता नवीन फोन्समध्ये हे आधीच इंस्टॉल केलेलें असतं.  मोबाईलच्या सेटिंगमध्ये याचा ऑप्शन तुम्हाला दिसेल. या ॲपला चालू स्थितीत ठेवल्यास मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर तो परत सापडू शकतो. हे ॲप आपल्या गुगल अकाउंटसोबत सिंक्रोनाईज केलेलं असतं. तुम्ही डेस्कटॉपवरून गुगल अकाउंटचा वापर करून अँड्रॉइड डिव्हाईस मॅनेजरमध्ये लॉग इन केलंत, आपला मोबाईल नेमक्या कुठल्या ठिकाणी आहे ते नकाशात दिसायला लागते. मग तुम्ही डेस्कटॉप वरूनच त्याला लॉक करू शकता किंवा त्यातला पूर्ण डेटा डिलीट करू शकता. इतकंच नव्हे तर फोनची रिंग सुद्धा वाजवू शकता जेणेकरून फोन जवळपास कुठेतरी असेल तर त्याची नक्की जागा शोधता येते. हे काही फक्त डेस्कटॉपवरुनच करता येतं असं नाही. सोबत कुणी मित्रमंडळी असतील, तर त्यांचा मोबाईल घ्या, त्यांच्या फोनमध्ये गेस्ट मोड नाहीतर इनकॉग्निटो मोड वापरुन लॉग इन करा आणि फोन शोधा

खरं सांगायचं तर मोबाईलवरुन फोन ट्रॅक करण्यात जास्त फायदा आहे. मोबाईल कुठं आहे हे तर कळतंच, पण दुसरा फोन वापरुन तो कुठे आहे हे शोधायला फिरता पण येतं. पण मंडळी, तुमच्या फोनवर इंटरनेट चालू असेल तरच हे सगळं करता येईल बरं.. पण तुमच्या फोनमध्ये जिओचं कार्ड असेलच की. रोजचा दीड जीबीचा कोटा दिलाय रिलायन्सने, डेटा प्लान बंदच कशाला करायचा?   हो, पण जर फोन चोरानं फोन ऑफ केला,   किंवा  नेट बंद केले किंवा फोन रिसेट केला असेल तर हे काही कामाला यायचं नाही.   म्हणून केव्हाही आपला फोन लॉक करून ठेवण्याची सवय असायला हवी. फोन लॉक स्थितीमध्ये कुणाला सापडला तर त्याच्या सेटिंग सहज वापरता येत नाहीत.  जसे अँड्रॉइड फोनमध्ये डिव्हाईस मॅनेजर आहे तसेच आयफोन मध्येही ही सुविधा ‘फाईंड माय आयफोन’ नावाने उपलब्ध आहे. 
 

असा शोधा तुमचा फोन- पद्धत २

आणखी एका ट्रिकचा वापर करून तुम्ही फोनची जागा शोधू शकता. ते म्हणजे ‘गुगल मॅप लोकेशन हिस्टरी’.  तुमच्या फोनमध्ये लोकेशन रिपोर्टिंग आणि लोकेशन हिस्टरी हे ऑप्शन ऑन असतील तर ही सुविधा निश्चितच कामाची आहे. फोन हरवला तर डेस्कटॉप वरून गुगल मॅप लोकेशन हिस्टरी तपासलंत, की तुमच्या फोनचे सध्याचं लोकेशन दिसतं. समजा फोन बंद केला गेला असेल किंवा नेट ऑफ असेल तर त्याचं शेवटचं ठिकाण कोणतं होतं याचा अंदाज येऊ शकतो. या लोकेशन हिस्टरीमार्फत फोन कुठल्या क्षेत्रात फिरत आहे याचा शोध घेतल्यास चोराचा शोध लागणे सहज शक्य होतं. ही गुगल मॅप लोकेशन हिस्टरी ऑन असेल, तर तुम्ही गेल्या काही वर्षांत कुठं कुठं गेला होतात हे ही तारीख आणि वेळवार समजू शकेल...
 

असा शोधा तुमचा फोन- पद्धत ३

मंडळी, ते निठारी मधलं हत्याकांड आठवतंय? हो, तेच ते.. लहान मुलांना आणि मुलींना मारुन त्यांचं मांस खाणारे मधले लोक आणि घराभोवती हाडं सापडली होती ते. तर त्याची उकल झाली होती एका चोरीला गेलेल्या फोनचा IMEI नंबर पोलिसांकडे असल्यामुळं. IMEI म्हणजे International Mobile Equipment Identity.  प्रत्येक मोबाईलचा IMEI क्रमांक हा वेगळा असतो.  ज्या-ज्या वेळी मोबाईलवरून कॉल किंवा मेसेज केला जातो, त्या-त्या वेळी हा IMEI क्रमांक आपोआप सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनीकडून ट्रॅक केला जात असतो.  आता प्रश्न पडला असेल की हा IMEI नंबर शोधायचा कसा? सोप्पं आहे.. तुमच्या फोनच्या डायल पॅड वर *#06# टाईप करुन कॉल बटन दाबायचं. लग्गेच केल्यास तुमच्या फोनचा १६ अंकी IMEI क्रमांक तुम्हाला मिळेल. तसा हा नंबर सेटिंगमध्ये किंवा मोबाईलच्या बॅटरीवर किंवा बॉक्सवरसुद्धा असतोच. फोन चोरीला गेल्यास तुम्ही सरळ हा क्रमांक पोलिसांना किंवा सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनीला द्यायचा. यामुळं फोन लवकर सापडायला मदत होईल. आणि हो,  प्ले स्टोअरवर IMEI द्वारे फोन ट्रॅक करणारे  अनेक ऍप्ससुद्धा उपलब्ध आहेत. तुम्ही त्या ऍप्सचाही वापर करू शकता. 

सॅमसंग कंपनीनं त्यांच्या फोनमध्ये फाईंड माय मोबाईल ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जर तुमचा फोन सॅमसंग कंपनीचा असेल तर जास्त कष्ट न घेता हरवलेला फोन परत मिळतो. 

ही माहिती कशी वाटली मंडळी? त्यामुळं आता फोन चोरीला गेला तर बिनधास्त राहा… वरील टिप्सचा वापर करून फोन शोधा अथवा आपला डेटा दुसऱ्यांच्या हाती पडण्यापासून वाचवा. पण त्याआधी वरती सांगितलेले सगळे ऑप्शन ऑन करून ठेवायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required