computer

या ५ भारतीय प्रोफेशनल बॉडीबिल्डर स्त्रियांचा प्रवास वाचा, स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे राहात नाहीत यावर पुन्हा एकदा विश्वास बसेल!!

जगातील अनेक सुंदर महिलांबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. मिस वर्ल्ड, युनिवर्स यांच्याबद्दल चर्चा तर नेहमीच होतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा स्त्रियांबद्दल सांगणार आहोत ज्यांची सौंदर्याची व्याख्या पूर्णपणे वेगळी आहे. या महिला त्यांच्या बलवान शरीरासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. यांचे शरीर पाहून अनेकांना घाम फुटेल
भारतातील अशा अनेक महिला शरीरसौष्ठवपटू/महिला कुस्तीपटू आहेत, ज्यांनी देश-परदेशात नाव कमावले आहे. आज आपण भारतातील अशा प्रसिद्ध महिला बॉडीबिल्डर्सबद्दल जाणून घेऊ.

१. यशमीन चौहान

 

यशमीन चौहान ही भारतातील अव्वल महिला बॉडीबिल्डर आहे. यशमीन ही मूळची गुडगांवची असून सध्या ती मुंबईत राहते. तिने बॉडी बिल्डिंगमध्येही अनेक पदके जिंकली आहेत. तिला बॉडी बिल्डर बनणे सोपे नव्हते. तिच्या शरीरयष्टीमुळे तिला अनेकदा टोमणे मारण्यात आले. पण तिने टोमण्याकडे दुर्लक्ष केले आणि फक्त तिच्या कामावर व मेहनतीवर लक्ष केंद्रित केले. ४० वर्षीय यशमीनने IFBB प्रो कार्ड जिंकले आहे. आज यशमीन ही भारतातील सर्वोत्कृष्ट महिला फिटनेस प्रशिक्षक आणि व्यावसायिक बॉडी बिल्डर्सपैकी एक आहे, ती अनेक हाय फाइल क्लायंट आणि सेलिब्रिटींना प्रशिक्षण देते.

2. सोनाली स्वामी

 

भारतातील सोनाली स्वामी ही आंतरराष्ट्रीय एक व्यावसायिक बॉडी बिल्डर आहे. फिटनेस गुरू सोनाली स्वामीने वयाच्या ३७ व्या वर्षी बॉडी बिल्डिंगची सुरुवात केली आणि अनेक पदके जिंकली. तिने आशियाई चॅम्पियनशिप २०१६, बॉडी पॉवर इंडिया, मसलमेनिया इंडिया २०१४ अशा अनेक स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. ती फिटनेस प्रशिक्षक देखील आहे. सोनालीला नृत्याचीही खूप आवड असून ती एक व्यावसायिक नृत्यांगनाही आहे. करिअर आणि कुटुंबात समतोल साधत तिने हे यश मिळवले आहे. जरी वयाच्या ३७ व्या वर्षी ती या क्षेत्रात आली तरी तिला काही फरक पडला नाही कारण खेळाला वयाचे बंधन नसते, फक्त खूप मेहनत करायची तयारी हवी असे तिचे म्हणणे आहे.

३. श्वेता मेहता

श्वेता मेहता हे नाव रोडीज सीझन १५ मुळे लोकप्रिय झाले. शोमध्ये तिने प्रसिद्ध क्रिकेटर हरभजन सिंगला आपल्या खांद्यावर उचलले. त्यानंतर ती चर्चेत आली. त्या सीझनची ती विजेती देखील आहे. श्वेता मेहता एक फिटनेस मॉडेल आणि भारतीय बॉडीबिल्डर आहे. तिने गेरल क्लासिक आणि वुमन फिटनेस मॉडेलसारख्या स्पर्धा जिंकल्या आहेत. २०१९ मध्ये एका अपघातात श्वेताच्या मानेला ७ फ्रॅक्चर झाले होते आणि तिच्या पाठीच्या कण्यातील ३ हाडे दखील तुटली होती. पण त्यातून बाहेर पडून श्वेताने हिंमतीने परत फिटनेस मिळवला .श्वेता शिक्षणाने इंजिनियर आहे. एका आयटी कंपनीत सलग ५ वर्षे काम केल्यानंतर फिटनेसच्या जगात नाव कमावण्यासाठी तिने ७० हजारांची नोकरी सोडली आणि आज ती या क्षेत्रात यशस्वी आहे.

४. अंकिता सिंग

 

अंकिता ही उत्तर प्रदेशातील सोनभद्र या छोट्या जिल्ह्याची रहिवासी आहे. बॉडीबिल्डर आणि फिटनेस मॉडेल असण्यासोबतच अंकिता एक सॉफ्टवेअर प्रोफेशनलदेखील आहे. ती बंगळुरूमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करते. अंकिता लहानपणी चुलत भावांसोबत कुस्ती खेळायची. बंगळुरूमध्ये इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात काही वादामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली. याच्याशी लढण्यासाठी तिने नियमित जिममध्ये वेळ घालवायला सुरुवात केली आणि तेव्हा तिला बॉडी बिल्डिंगची आवड निर्माण झाली. तिने आशियाई चॅम्पियनशिप २०१५, मिस इंडिया २०२१ , मिस कर्नाटक २०१८,२०१९,२०२१ यांसारख्या अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि जिंकल्याही आहे.

५. दीपिका चौधरी

 

दीपिका चौधरी हिला भारतातील पहिली महिला व्यावसायिक फिगर ॲथलीट होण्याचा मान मिळाला आहे. ती भारतातील पहिली महिला IFBB प्रो विजेती आहे. दीपिका चौधरी एक व्यावसायिक ऍथलीट, बॉडी बिल्डर आणि पॉवर लिफ्टर आहे. तीने 'बॅटल ऑफ द बीच' स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. तसेच २०१४ मध्ये लॉडरडेल कप जिंकला. याशिवाय अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धाही जिंकल्या आहेत. शरीराला टोन करण्यासाठी तिने २ वर्षे अथक मेहनत केली. या क्षेत्रात करीयर सुरू करण्याचा विचार तिने केला तेव्हा तिलाही खूप विरोध झाला, पण तिने या क्षेत्रात स्वतःचे नाव यशस्वीपणे उमटवले आहे. सध्या ती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (पुणे) येथे तांत्रिक अधिकारी आहे.

भारतात महिलांचे बॉडीबिल्डिंग करिअर वाढत आहे. हे क्षेत्रही महिलांनी आता काबीज केले आहे. भविष्यात अनेकजणी भारताचे नाव या क्षेत्रात पुढे नेतील यात शंका नाही.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required