हिंदी बोलणारा कोरियन युट्यूबर ली जुन्हाक. तुमचं हिंदी चांगलं आहे की त्याचं, जरा पडताळून पाहा!!

Subscribe to Bobhata

आपणा सगळ्यांना हिंदी येते यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे हिंदी सिनेमे आणि सिरीयल्स आहेत. आताचं तर जाऊ दे, पण रामायण-महाभारताच्या काळात आयुष्यात शाळेचं तोंडही न पाह्यलेल्या आजी-पणजींनी या मालिका पाह्यल्या आणि त्यांना त्या समजल्याही. भारतातील लोकांचे ठीक आहे कारण हिंदीतले काही शब्द आपल्या भाषेतही थोड्याफार फरकाने सारखे असू शकतात. पण परदेशात भारतीय सिनेमे आणि सीरियल या इंग्लिशमध्ये डब होऊन सादर केले जातात. त्यामुळे परदेशातल्या लोकांनी हिंदी शिकण्याचा फारसा संबंध येत नाही. एका गड्याने मात्र कोरियन असूनही भन्नाट हिंदी शिकून घेतली आहे.

ली जुन्हाक असे या कोरियन युट्यूबरचे नाव आहे. या भावाचं हिंदी ऐकलं तर आपलं तोडकंमोडकं हिंदी कुठे आणि याची स्पष्ट हिंदी कुठे असे आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. लीने कुठून इतकी चांगली हिंदी शिकली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर त्याने स्वतःच दिले आहे. तो म्हणतो की आपण सीआयडी आणि क्राईम पेट्रोल बघून हिंदी शिकलो आहे. म्हणजे या सिरियल्सचे चाहते परदेशातही आहेत हे स्पष्ट होते.

एकीकडे जगावर कोरियन पद्धतीचा पगडा वाढत आहे. कोरियन भाषेतील नाटके, गाणी तसेच इतरही अनेक गोष्टींना जगात लोकप्रियता मिळत आहे. कोरियन असलेला बीटीएस हा बँड तर कहर लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशा सर्व वातावरणात एक कोरियन भाऊ आपल्या देशातील भाषा शिकून घेऊन त्या भाषेत व्हिडिओ बनवतो हे भारीच आहे.

कोरिया का लाला असे त्यांच्या यु ट्यूब आणि इन्स्टाग्रामचे नाव आहे. कोरियातील सेऊल येथील रहिवासी असलेला ली भारतातील बहुतांश राज्यांना भेट देऊन आला आहे. तसेच या भेटींचे व्हिडिओ तो आपल्या इन्स्टाग्रामवर अपलोड करत असतो. त्याच्या देशातील अनेक लोकांना हा पठ्ठ्या हिंदी शिकून घेण्यास मदत करत आहे.

ली च्या माध्यमातून हिंदी सारखी भारतीय भाषा विदेशात लोकप्रिय होऊ लागली तर आपल्यासाठी देखील ही आनंदाची गोष्ट असेल.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required