computer

वेश्येला आपलं कान कापून देणारा 'व्हिन्सेंट व्हॅन गॉग' होता तरी कोण ?

आजवर होऊन गेलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रकारांमध्ये व्हिन्सेंट व्हॅन गॉग हे एक प्रमुख नाव आहे. आज ३० मार्च. व्हिन्सेंट व्हॅन गॉगचा जन्मदिन.

व्हिन्सेंट व्हॅन गॉगबद्दल तुम्ही फार ऐकून नसाल तरी ‘कान कापून देणारा चित्रकार’ म्हणून तरी त्याच्याबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असणार. त्याने हे खरोखरच केलं होतं. तो असा का होता याचं नेमकं उत्तर कोणालाच माहित नाही. असा विक्षिप्तपणा बऱ्याच प्रतिभावंत मंडळींमध्ये आढळतो.

व्हिन्सेंट व्हॅन गॉगला जर समजून घ्यायचं झालं तर त्याची चित्र एक चांगलं मध्यम आहेत. त्याने काढलेलं सूर्यफुलाचं चित्र असो वा जगप्रसिद्ध ‘दि स्टारी नाईट’. हा चित्रकार तुम्हाला एक वेगळं जग दाखवतो. त्याची चित्र बेढब आहेत असं म्हटलं जातं. ते खरं पण आहे. त्याने काढलेल्या चर्चचं चित्र लहान मुलाने चितारलेलं वाटतं, पण चर्चच्या मागचं आकाश, चर्चच्या दिशेने जाणारी बाई, वाट हे एका वेगळ्या दर्ज्याचं आहे.

मंडळी, त्याचं आज जे काम उपलब्ध आहे ते केवळ त्याच्या आयुष्याच्या १० वर्षातलं आहे यावर आपला विश्वास बसत नाही. त्याने या १० वर्षांच्या काळात तब्बल ९०० चित्र काढली. ९०० चित्र १० वर्षात बसवायची झाली तर दर ३६ तासाने त्याने एक चित्र काढलं आहे.

मंडळी, अशा या प्रतिभावान चित्रकाराबद्दल त्याच्या जन्मदिनी जाणून घेतलंच पाहिजे. आज शनिवार स्पेशल मध्ये आपण त्याच्याबद्दलच्या ५ महत्वाच्या गोष्टींमधून त्याला घेणार आहोत.

१. त्याला चित्रकार बनायचं नव्हतं.

३० मार्च १८५३ साली व्हिन्सेंटचा जन्म नेदरलँड्स येथे झाला. त्याचं सुरुवातीचं आयुष्य अस्थिर होतं. त्याने सुरुवातीला आपल्या काकांच्या ‘गौपील अँड के’ या आर्ट डीलिंग कंपनी कंपनीत नोकरी केली. त्यांनतर त्याला कंपनीच्या लंडनच्या शाखेत काम देण्यात आलं. लंडन मधल्या वास्तव्यात तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. मुलीने त्याला नकार दिला. खरं तर तिचं लग्न आधीच ठरलं होतं.

(कोळश्याच्या खाणीत काम करणाऱ्या स्त्रिया)

या घटनेनंतर त्याच्या हातून नोकरी गेली. तो पुन्हा पॅरीसला आला. असं म्हणतात की यानंतर तो एकाकी बनला. तसा तो जन्मापासूनच माणसांपासून लांब राहणारा आणि विचारी होता. मात्र या घटनेने त्याला एकाकी करण्यासोबतच धर्माकडे आकर्षित केलं. तो २ वर्षांनी पुन्हा लंडनला गेला आणि त्याने तिथे शाळेची फीज गोळा करण्याचं काम स्वीकारलं. त्याला ज्यांच्याकडून फीज गोळा करायची होती त्यांचं दारिद्र्य बघून व्हिन्सेन्टच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्याने धर्मोपदेशक बनायचं ठरवलं. त्याने तशी नोकरी पण केली. पुढे त्याने मिनिस्टर बनण्यासाठी वर्षभर तयारी केली, पण शिस्तीच्या अभ्यासात तो टिकला नाही. तो सगळं सोडून एका कोळशाच्या खाणीत काम करण्यासाठी निघून गेला.

मंडळी, अशा तशा पद्धतीने हेलकावे खात व्हिंसेंटने वयाच्या २७ व्या वर्षी चित्रकलेला वाहून घेतलं. त्याने चित्रकलेचं कोणतंही शिक्षण घेतलेलं नव्हतं. पुढील १० वर्ष तो झपाटल्यासारखा काम करत होता.

२. त्याने काढलेली सेल्फ पोट्रेट्स.

व्हिन्सेंटकडे उदरनिर्वाह चालेल एवढा पैसाही नव्हता. चित्र काढण्यासाठी त्याला मॉडेल हवा होता पण मॉडेलला द्यायला पैसेच नाहीत. मग त्याने सेल्फ पोट्रेट्स सुरु केली. त्याने स्वतः स्वतःची काढलेली चित्र जगप्रसिद्ध आहेत. त्यातली बरीच उजव्या बाजूच्या चेहऱ्याची आहेत. डावा कान कापल्यानंतर तो भाग त्याने चितारला नाही. जखम भरून येई पर्यंत त्याने तिथे एक फडकं बांधलं होतं. त्या स्थितीतही त्याने स्वतःची चित्र काढली आहेत.

असं म्हणतात की चित्र काढायला कॅनवास नाही म्हणून अनेकदा त्याने त्याच चित्रावर दुसरं चित्र काढलं होतं. त्याने ९०० चित्र काढली म्हणतात पण एका चित्र खाली आणखी किती चित्रांचा खजिना असेल हे त्याचं त्यालाच माहिती.

३. तापट आणि विक्षिप्त.

व्हिंसेंटच्या तापट आणि आक्रस्ताळी स्वभावामुळे त्याचे त्याच्या समकालीन चित्रकारांशी संबंध तुटले. त्याच्या भणंग आयुष्याला आर्थिक मदत करण्याचं व्रत घेतलेल्या थिओ या त्याच्या भावाशी पण त्याचं भांडण झालं होतं. त्याच्या स्वभावाची ही एक बाजू तर दुसऱ्या बाजूला त्याने कोळश्याच्या खाणीच्या ठिकाणी दाखवलेली माणुसकीची उंची ही एक दुसरी बाजू होती. त्याने तिथलं दारिद्र्य बघून एका गरिबाला आपले कपडे देऊन टाकले होते. माणसं उपाशी मारतायत बघून त्याने अन्न टाकलं. त्याच्या बऱ्याचशा सेल्फ पोट्रेट्स मध्ये तो तोंडाची हाडं दिसत असलेला खंगलेला दिसतो.

त्याच्या स्वभावाचे असे विक्षिप्त रूप होते. त्यात त्याचा प्रेमभंग आणि वडिलांशी तुटलेले नाते, अस्थिरता यामुळे एका बाजूला त्याचं वेड, दुसऱ्या बाजूला तो आणि मध्ये त्याची चित्रकला असं त्याच्या आयुष्याचं स्वरूप झालं होतं.

३. दि स्टारी नाईट

चित्रकलेच्या इतिहासात ‘दि स्टारी नाईट’ हे एक अजरामर चित्र आहे. या चित्राचा जन्म  ‘सेंट रेनी’ येथील वेड्यांच्या इस्पितळात झाला. व्हिंसेंटने स्वतःच जाऊन या इस्पितळात उपचार घ्यायला सुरुवात केली होती. त्याने असं का केलं हे आपण पुढे जाणून घेणारच आहोत.

तर, चित्रात दिसणारा प्रसंग हा त्याच्या खिडकीतून दिसायचा. खाली दिसणारं गाव हे त्याच्या कल्पनेतलं आहे. त्याने चित्र पूर्ण केल्यानंतर ते त्याला काही खास आवडलं नाही. त्याला त्याचं कोणतंच चित्र फारसं आवडलं नव्हतं, पण तो चित्र काढत राहिला.

४. त्याने आपला कान स्वतः कापला.

त्याने स्वतःचं कान कापलं होलं हा प्रसंग जगप्रसिद्ध आहे, पण त्याने हे का केलं याबद्दल फारच कमी बोललं जातं. खरं तर त्याने असं का केलं याचं उत्तर कोणालाच माहित नाही. काही तज्ञ एक कथा मात्र सांगतात. व्हिंसेंट आणि त्याचा मित्र चित्रकार पौल गॉगॅन याच्यात एक जबरदस्त भांडण झालं होतं. भांडणानंतर व्हिंसेंटने रागाच्या भरात डाव्या कानाची पाळी कापली होती. संपूर्ण कान कापला होता हे नंतर प्रसिद्ध झालं. 

(पौल गॉगॅन)

पौल गॉगॅन हा व्हिंसेंटचा समकालीन चित्रकार. व्हिंसेंटने त्याच्या आयुष्याच्या एका टप्प्यात पॅरीसच्या दक्षिणेला एकांतात जायचं ठरवलं होतं. तो आर्ल्स गावी आला. त्या गावी त्याला नवनवीन कल्पना सुचू लागल्या आणि तो जोमात काम करू लागला. मग त्याला कुठूनशी कल्पना आली की आणखी कलावंतांना इथे बोलावून घ्यावं. त्याने भावाला सांगून पौल गोगँ ला बोलावून घेतलं. पौल गॉगॅनला गाव आवडलं नाही. व्हिंसेंटशी त्याची मैत्री पण फार काळ टिकली नाही. व्हिंसेंट आणि गॉगॅन मध्ये फाटलं. एवढं की एकदा व्हिंसेंट चाकू नाचवत गॉगॅन जवळ गेला. घाबरून गोगँने तिथून पळ काढला. असं म्हणतात व्हिंसेंटने तो सगळा राग काढण्यासाठी कानाची पाळी कापली. काही तज्ञ असंही म्हणतात की हे काम गोगँने केलं होतं. खरं खोटं कधीच कळू शकलं नाही.  

व्हिंसेंटने पुढे जे केलं ते जास्त प्रसिद्ध झालं. त्याने कापलेली कानाची पाळी एका वेश्येला नजर केली. त्यादिवशी त्याला मानसिक झटका आला होता. त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची वेळ आली. तो जेव्हा बरा झाला तेव्हा त्याला मागच्या गोष्टींचा काहीच अर्थ लागत नव्हता.

५. त्याची आत्महत्या

पौल गोगँ बरोबरच्या प्रसंगानंतर व्हिंसेंटने मानसिक आजाराबद्दल मान्य केलं. तो स्वतःच जाऊन सेंट रेनीच्या इस्पितळात दाखल झाला. व्हिंसेंटच्या सर्वोत्कृष्ट कालाकृत्यांचा जन्म याच इस्पितळात झाला. स्टारी नाईट हा त्याचा मानबिंदू.

थिओला आपल्या भावाची काळजी होती. त्याने व्हिंसेंटला वेड्यांच्या इस्पितळातून काढून ओव्हेर या गावी नेलं. तिथे व्हिंसेंट रमला. त्याने तिथल्या शेतांची चित्र रंगवली. गावातल्या डॉक्टर गाश यांच्याशी त्याची मैत्री झाली. हे डॉक्टर स्वतः मेंदूच्या विकारांचे तज्ञ होते. व्हिंसेंटने डॉक्टरांना समोर बसवून त्याचं चित्र काढलं होतं. त्यांच्या घरातल्या वस्तू, मुलांचं पण त्याने चित्र काढलं. त्याच्या कलेला पुन्हा एकदा बहर आला होता.

असाच एकदा तो गावाजवळच्या टेकडावर कॅनव्हास घेऊन गेला होता. टेकडावरून दिसणारी मक्याची शेती त्याला आवडायची. तो सकाळी निघाला ते रात्री उशिरा घरी परतला. त्यानंतर ३० तासांनी तो मरण पावला. त्याचा मृत्यू गोळी लागल्याने झाला होता. ही गोळी त्याने स्वतःच छातीवर झाडली होती की तो एक खून होता हे शेवटपर्यंत कळू शकलं नाही. त्याने आत्महत्या केली असं नंतर सगळ्यांनी मान्य केलं. भाऊ थिओ शेजारी बसला असताना त्याने शेवटचा श्वास घेतला. तारीख होती २५ जुलै, १८९०.

व्हिन्सेंटचा मृत्यू थिओच्या जिव्हारी लागला. पुढच्या ६ महिन्यात तोही मरण पावला. दोघांची समाधी ओव्हेर गावी आहे.

मंडळी, काही कलाकारांची दखल मरणोत्तर घेतली जाते. व्हिन्सेंट व्हॅन गॉग हा त्याच कलाकारांपैकी एक. त्याच्या हयातीत त्याचं एक चित्र ४०० फ्रँकला विकलं गेलं होतं. आज त्याच्या चित्रांना कोटीच्या घरात किंमत आहे.

व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या आयुष्यावर बेतलेला "लव्हिंग व्हिंसेंट" सिनेमा गेल्याच वर्षी प्रदर्शित झाला होता. त्याच्या चित्रांप्रमाणे या चित्रपटाची मांडणी करण्यात आली होती. ६५,००० फ्रेम्स म्हणजे त्याच्या शौलीत काढलेल्या ६५,००० चित्रांमधून हा सिनेमा साकारला होता. चित्रपट पूर्ण व्हायला ६ वर्ष लागली.

व्हिन्सेंट व्हॅन गॉगला याहून मोठी श्रद्धांजली ती कोणती !!!

 

 

आणखी वाचा : 

तब्बल १२५ कलाकारांनी साकार केलेला जगातील पहिला चित्रमय सिनेमा !!

सबस्क्राईब करा

* indicates required