मोठ्या कंपन्यांच्या घसरगुंडीला कारणीभूत झालेले त्यांचे ७ सीईओ - यांच्या चुकांमधून काय धडा घ्याल?
कोणत्याही संघटनेचं, कंपनीचं, संस्थेचं यशापयश तिच्या सीईओ म्हणजेच chief executive officerवर अवलंबून असतं. कंपनीच्या वतीने मान सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर जाणारा सीईओ असतो, तसंच तिला उतरती कळा लागल्यास त्यालाही सीईओच जबाबदार असतो. चला बघूया असेच काही अपयशाचे धनी असणारे सीईओ, यांच्यामुळे पुढच्या अनेकांना काय करावं आणि काय करू नये याचे धडे मिळाले.
१. के. व्हिटमोअर (कोडॅक)
चुका घडलेल्या सीईओंच्या मांदियाळीतले पहिले बिनीचे शिलेदार आहेत कोडॅक कंपनीचे के. व्हिटमोअर. व्यावसायिकाकडे दूरदृष्टी नसेल तर त्याचा व्यवसायावर कसा परिणाम होतो याची ही कथा आहे. १९९० मध्ये कोडॅकच्या सीईओपदी नेमले गेल्यावर पहिल्याच वर्षी बिल गेट्स बरोबरच्या मिटिंगदरम्यान हा मनुष्य चक्क झोपला! ही त्यांची डुलकी चांगलीच गाजली. याच मिटिंगमध्ये कंपनीची उत्पादनं आणि विंडोज याविषयी चर्चा झाली होती. खरंतर काळाची पावलं ओळखून १९७५ मध्येच कंपनीने डिजिटल कॅमेरा तयार केला होता, पण व्हिटमोअर यांनी हे नवीन तंत्रज्ञान गांभीर्याने घेतलंच नाही. त्यामुळे त्यात पैशाची, वेळेची, किंवा श्रमांची गुंतवणूक झाली नाही. ज्यावेळी डिजिटल तंत्रज्ञानाने हातपाय पसरायला सुरुवात केली, त्यावेळी कोडॅकला उतरती कळा लागली. यानंतर सुमारे तीन वर्षांनी कंपनीच्या खर्चात कपात करण्यात अपयश आल्याच्या कारणावरून व्हिटमोअरची उचलबांगडी करण्यात आली.
यातून मिळालेला धडा म्हणजे भविष्यात निर्माण होणार्या संधींकडे बघण्यात अपयश आलं की व्यवसायाची उतरण सुरू झाली म्हणून समजा.
२. कॅर्ली फिओरीना (एचपी)
कॅर्ली फिओरीना १९९५ मध्ये एचपी(Hewlett-Packard)ची सीईओ झाली. त्यावेळी तिने स्वतःला 'क्रांतिदूत' (change agent) असं संबोधलं होतं आणि त्यानुसारच तिने कंपनीत काही बदल केले. उणीपुरी सहा वर्षं ती कंपनीच्या सीईओपदी राहिली. त्या काळात कंपनीची किंमत जवळपास निम्म्याने कमी झाली आणि हजारोंच्या संख्येने कर्मचारी बेरोजगार झाले. फिओरिना स्वतः मात्र भरपूर वेतन घेत होती. तिच्या कार्यकाळात तिने काही चुकीचे निर्णय घेतले. प्राईस वॉटरहाऊस कूपर्स ही प्रतिष्ठित संस्था १४०० कोटी डॉलर्सना खरेदी करण्याचा प्रयत्न करणं हा तिचा असाच एक अतिशय चुकीचा निर्णय. तिला यापासून परावृत्त केल्यावर ४०० कोटी डॉलरपेक्षाही कमी किंमतीत ती कंपनी आयबीएमकडे गेली. कॉम्पॅकबरोबर विलीनीकरण करण्याचा तिचा निर्णयही वादळी ठरला. ज्या दिवशी फिओरिनाची हकालपट्टी झाली त्याच दिवशी एचपीचं बाजारपेठेतलं मूल्य वाढून ३०० कोटी डॉलरपर्यंत गेलं.
यातून इतरांनी कोणता धडा घ्यावा? तर प्रत्येक वेळी स्वतःचंच म्हणणं बरोबर असल्याचा अट्टाहास नको. एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायच्या आधी निदान इतरांचं मत विचारात घेणं आणि सर्व शक्यता पडताळून पाहणं कधीही चांगलं.
३. वॉरन अँडरसन (युनियन कार्बाइड)
या महाशयांचं नाव घेतलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ती भोपाळ वायू दुर्घटना. या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या 'युनियन कार्बाइड' नामक अमेरिकन कंपनीचा हा सीईओ होता. डिसेंबर १९८४ मध्ये भोपाळ परिसरात झालेल्या विषारी वायूच्या गळतीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांना गंभीर अपंगत्व आलं. दुर्घटनेनंतर दोन-तीन दिवसांनी अँडरसनने या भागाला भेट दिली. काही दिवसांनी त्याला अटक करण्यात आली आणि जामीनही मिळाला. जामीन मिळाल्यानंतर तो जो परागंदा झाला तो कायमचाच. या दुर्घटनेबाबत युनियन कार्बाईड कंपनी आणि भारत सरकार दोघांनी एकमेकांवर परस्परविरोधी आरोप केले. स्वतः अँडरसननेही हे मान्य केलं, की त्यावेळेला भारतातल्या प्लांटमध्ये आवश्यक सुरक्षा यंत्रणा नव्हती, जी अमेरिकेत होती.
या घटनेमुळे वॉरन अँडरसनचं करिअर उद्ध्वस्त झालं, पण एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे, काहीही झालं तरी शेवटी त्याची जबाबदारी टॉप बॉसलाच घ्यावी लागते.
४. जॉन स्कली (ॲपल)
जॉन स्कलीची ॲपलमध्ये नेमणूक झाली ती त्याच्या अंगी असलेलं विक्री कौशल्य आणि अनुभव यांच्या जोरावर. पण याच माणसाने त्याला ॲपलमध्ये आणणाऱ्या आणि ॲपल कंपनीमागचा खरा मेंदू असणाऱ्या स्टीव्ह जॉब्जची हकालपट्टी केली. स्टीव्हचं स्वतःचं विक्री कौशल्य उत्कृष्ट आणि वादातीत होतं, आणि त्यामुळेच स्कुली त्याला प्रतिस्पर्धी मानू लागला होता, असं म्हटलं जातं.
शिवाय स्कलीकडे तांत्रिक ज्ञान नव्हतं. त्यामुळे उत्पादनांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना त्याने चुका केल्या. सरतेशेवटी दशकभराने समस्यांनी उग्र रूप धारण केलं, तेव्हा स्टीव्ह जॉब परत आला आणि स्कलीला नोकरीवरून कमी करण्यात आलं. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय किती नुकसान करू शकतात हे ॲपल आणि स्कली यांच्या उदाहरणावरून दिसून येतं.
५. केन ले (एन्रॉन)
केन ले याच्या नेतृत्वाखाली एन्रॉन ही वीजनिर्मिती क्षेत्रातली दादा कंपनी १० हजार कोटीपर्यंत वाढली आणि नंतर २००१ मध्ये एकूण मूल्याच्या ९९.७% ने खाली घसरली. कंपनीचा कारभार हाती घेतल्यावर कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये लक्ष घालण्यात त्याला अजिबात रस नव्हता. लोकांसमोर त्याची प्रतिमा अप्रामाणिक आणि अकार्यक्षम अधिकारी अशी होती आणि प्रत्यक्षातही तो तसाच होता. त्याच्या कार्यकाळात फारशी कार्यक्षमता नसलेल्या पण त्याच्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना मन मानेल तसं वागायची मोकळीक होती. भरीत भर म्हणजे कंपनीचं आर्थिक नुकसान करण्यास कारण ठरलेल्या एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यातही त्याचा हात होता.
जुलै २००६ मध्ये हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू ओढवला. याच्या काही दिवस आधीच त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षा होणार हे निश्चित झालं होतं. शिक्षा झाली असती तर किमान तीस वर्षं तरी त्याला तुरुंगात जायला लागलं असतं.
धडा : 'काहीही करा पण पैसा आणा' अशी एन्रॉनची कॉर्पोरेट संस्कृती होती. पण म्हणून कोणीही नैतिकतेला तिलांजली देत पैसा कमावू नये.
६. जेराल्ड रॅटनर (रॅटनर ग्रुप)
या सीईओने इतकी मोठी चूक केली, की ती पुढे जाऊन 'रॅटनर इफेक्ट' म्हणून ओळखली जाऊ लागली. एका मासिकाच्या मुलाखतीत, ज्वेलरी कंपनीच्या जेराल्ड रॅटनरने, त्याच्या दुकानात विकल्या गेलेल्या कट-ग्लास शेरी डिकॅंटर सेटचं वर्णन करताना “निव्वळ बकवास!” असा शेरा तर मारलाच, पण इतर उत्पादनांवरही टीकाटिप्पणी केली. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ग्राहक पळून गेले. लाखो पौंड मूल्य असणारा व्यवसाय शून्यात गेला. रॅटनरने एक नवीन चेअरमन तर नेमला, पण त्यानेच त्याला काढून टाकलं.
यावरून घ्यायचा बोध एकच : ग्राहकांना सन्मानाने वागवा.
७. चेन जीउलीन (चायना एव्हिएशन ऑइल)
हा चायना एव्हिएशन ऑइल या कंपनीचा सीइओ आणि डायरेक्टर होता. त्याने अनेक वर्षं उत्तम पद्धतीने कंपनीचा कारभार सांभाळला. त्याच्या कार्यकाळात कंपनीची मालमत्ता ८५,२०० टक्क्यांनी वाढून १५० दशलक्ष डॉलरपर्यंत गेली. पण याच काळात तेलाच्या व्यापारात सट्टेबाजी होऊन कंपनीला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागलं. या वेळी चेनने सत्य लपविण्याचा प्रयत्न केला. २००६ मध्ये, व्यापारात झालेला ५५० दशलक्ष डॉलर तोटा उघड करण्यात अयशस्वी झाल्यामुळे त्याला चार वर्षं आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
यातून मिळालेला धडा असा, की कधीही कंपनीच्या मालमत्तेशी जुगार खेळू नये. याचा शेवट नेहमी वाईटच होतो.
आपल्या लहानपणी आपण पंचतंत्रातल्या गोष्टी वाचल्या, ऐकल्या असतील आणि त्यातून जमेल तितका बोध घेतला असेल.. काहीशा त्याच वाटेने जाणाऱ्या या उद्योगविषयक बोधकथा. बघा त्यातून काय काय घेणं जमतंय.
स्मिता जोगळेकर




