पत्त्यांच्या संचात इस्पीकचा एक्का नक्षिदार असण्यामागची गोष्ट
तुम्हाला बैठे खेळ खेळायला आवडत असेल तर पत्त्यांचा डाव तुम्ही एकदा तरी खेळलाच असेल. फक्त पैसे कमावण्यासाठी नाही, तर काही लोक टाईमपास म्हणूनही पत्त्यांचा खेळ आवडीनं खेळतात. आजकाल पत्ते खेळण्यासाठी जो सट वापरला जातो त्याला अँग्लो-अमेरिकन पॅक म्हटले जाते. या पॅकचं एक वैशिष्ट्य म्हणजे यातील सजावट केलेला इस्पिक एक्का. बदाम, चौकट किंवा किलवरपेक्षा इस्पिक एक्का इतका का सजवलेला असतो हे तुम्हाला माहिती आहे का?
पूर्वीच्या काळी म्हणजे १८ व्या शतकात हा खेळ युरोपात खूपच प्रसिद्ध होता. या खेळाच्या प्रसिद्धीमुळे यावर कर लावण्यात आला होता. विशेष म्हणजे त्याकाळी राज्याच्या महसुलात हा खेळामुळे चांगलीच भर पडत होती. १५८८ साली क्वीन ॲनने याप्रकारचा कर पहिल्यांदा लागू केला. त्यानंतर १६२८, १७११ आणि १९६० साली अशी तीनवेळा या करामध्ये सुधारणा करण्यात आली. १९६० सालानंतर तर हा कर कायमचा रद्दच करण्यात आला. कारण या करापासून गोळा होणाऱ्या रकमेपेक्षा कर गोळा करण्याची पद्धत फारच जिकिरीची होऊन बसली होती.
१८२८ पर्यंत एका पॅक किंवा डेकवरील कर चुकता केल्याचे समजण्यासाठी त्यातील एका पानावर स्टँप चिकटवला जाई आणि हा डेक पॅक करताना हे पान सर्वात वरच्या बाजूला ठेवले जाई. पत्त्याच्या पानाचा नवा सेट फोडताना तुम्ही पहिलेच असेल की या नव्या कोऱ्या सेटमध्ये नेहमीच पहिले पान हे इस्पिक एक्क्याचे असते. सेट पॅक करताना नेहमीच यापद्धतीनेच केला जाई की, इस्पिक एक्का वर आला पाहिजे. आजही हा नियम पाळला जातो. १८२८ नंतर कराचा स्टँप हाताने न चिकटवता तो सरळ इस्पिक एक्क्याच्या पानावरच छापला जाई. स्टँप आयुक्तांच्या वतीने पर्किन्स बेकन कंपनी या प्रकारचे कार्ड्स छापत असे. जेव्हा असे विशिष्ट छपाई केलेल्या इस्पिक कार्ड्सचा डेकमध्ये समावेश केला जाई तेव्हा त्याचा अर्थ असा होई की डेक बनवणाऱ्या कंपनीने त्यासाठीचा कर चुकता केलेला आहे. अशा विशिष्ट प्रकारची छपाई केलेल्या कार्ड्सन ‘ओल्ड फ्रिझल’ म्हटले जाई. याची डिझाईन चलनी नोटांप्रमाणेच असे.
कार्डावरती छापलेले हँड स्टँप्स असे दिसायचे:
१८६२ पर्यंत असे विशिष्ट छपाई केलेले एक्के म्हणजे कर भरलेला असल्याची पावती होती. १८६२ नंतर हा कर पत्त्याच्या पानावर छापण्याऐवजी तो वरच्या कव्हरवर छापण्याची पद्धत सुरु झाली. तेव्हा इस्पिक एक्के विशिष्ट डिझाईनमध्ये छापले नसले तरी चालत होते. वेगवेगळ्या कंपन्यांनी डिझाईन केलेले कर अदा केल्याचा स्टँप असलेले एक्के असे होते.
नंतर जरी हा टॅक्स बंद झाला, तरी पण डेक बनवणाऱ्या कंपनीने सजवलेला इस्पिक एक्का बनवण्याची ही पद्धत सुरूच ठेवली आणि ती आजतागायत सुरूच आहे.
म्हणूनच पत्त्याच्या पानातील इस्पिक एक्का हा आजही नक्षीदार असतो.
मेघश्री श्रेष्ठी




