शनिवार स्पेशल : नवीन वर्षासाठी हे पाहा ७ सामाजिक संकल्प...तुम्ही आणखी कोणता वेगळा संकल्प करणार आहात ??

मंडळी बघता बघता गेलं हे वर्षं ! नवीन वर्षं आपल्या प्रत्येकासाठी वेगळ्या अपेक्षा आणि आव्हाने घेऊन येणार आहे. आपल्या सामाजिक जाणिवांचा कस येणाऱ्या काही दिवसात लागणार आहे. या जाणिवा बावन्नकशी आहेत की हिणकस आहे याचा पडताळा करणारे हे वर्ष असणार आहे यात काही शंका नाही.
वैयक्तिक पातळीवर अनेक प्रतिज्ञा केल्या जातील आणि थोड्याच दिवसात मोडल्या जातील. आमचे 'बोभाटा'चे वाचक बहुतांशी नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. तर, येत्या वर्षात आमचे वाचक कोणत्या सामाजिक परीवर्तनात भाग घेणार आहेत याची आम्हाला उत्सुकता आहे.
काही प्रस्ताव आम्ही आमच्या परीने आम्ही मांडत आहोत, तुम्ही त्यात भर टाकायची आहे.
१. पाण्याचा अपव्यय टाळणे
या वर्षातील दोन उदाहरणं आपल्या समोर आहेत. आज केपटाऊनवर जलसंकट ओढवलय. २०१९ पर्यंत केपटाऊन मध्ये पाण्याच्या एक थेंब उरणार नाही अशी भाकितं केली जात आहेत. दुसरं उदाहरण आपल्या भारतातलंच आहे. पाणीटंचाईमुळे शिमल्यातील लोक पर्यटकांना शिमल्यात येऊ नका म्हणत होते. पाण्यासाठी लांबच लांब रांगा लावण्यात आल्या होत्या.
मंडळी, या मोठमोठ्या समस्येसाठी आपण काय करू शकतो ? तर, पाण्याच्या अपव्यय टाळायचा. कमीत कमी पाणी वापरायचं. आपल्यावरही असंच संकट येऊ नये म्हणून आपल्यालाच फुल ना फुलाची पाकळी इतका तरी वाटा नक्कीच उचलावा लागेल.
२. सामाजिक चळवळीत भाग घेणे
हे वर्ष #MeToo चळवळीचं होतं. #MeToo चळवळीला सोशल मिडियामुळे मोठया प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. त्याहीपूर्वी २०१० साली अरब देशांमध्ये खळबळ माजवणाऱ्या अरब स्प्रिंग चळवळीची पहिली ठिणगी ही सोशल मिडीयावरच पडली होती. अशा सामाजिक चळवळीत तरुणांचा सहभाग हा महत्वाचा असतो. तरुणांच्या सहभागातून भारतात #MeToo सारख्या कित्येक नवीन चळवळी उभारता येतील. उदाहरणार्थच घ्यायचं झालं तर घरगुती हिंसाचार ही एक मोठी समस्या आहे.
२०१९ वर्षात आपण सामाजिकदृष्ट्या सजग नागरिक बनू असा संकल्प करूया.
३. रिसायकल
रिसायकल करण्याची सुरुवात आपल्या घरापासून करता येऊ शकते. घरातील ओल्या कचऱ्याचं खातात रुपांतर करता येतं. यावर्षी प्लास्टिक बंदीने प्लास्टिकला बरेच नवीन पर्याय निर्माण करून दिले. कापडी पिशव्या ते अगदी रद्दीतले कागद पण प्लास्टिकला पर्याय होऊ शकतात. बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक समान आपण कचऱ्यात फोकून देतो, ते पर्यावरणासाठी घातक ठरू शकतं. याउलट त्यांचा नव्याने वापर होऊ शकतो. जसे की मोबाईल फोन. जुना फोन हल्ली एकस्चेंग करता येऊ शकतो. अगदीच ‘डब्बा’ झाला असेल तर तो आपण मोबाईल शॉपला देऊ शकतो. जुने फोन घेणाऱ्या संस्था आता तयार झाल्या आहेत त्यांची मदतही घेता येऊ शकते.
रिसायकलचे अनेक पर्याय आहेत. २०१९ मध्ये रिसायकलचा संकल्प नक्की करा.
४. विजेची बचत
गेल्यावर्षी रेल्वे विभागाने मोठ्या प्रमाणात विजेची बचत केली होती. या बचतीमुळे तब्बल ५,००० कोटी रुपये वाचले. आपणही आपला हातभार लावू शकतो. थंडीच्या दिवसात पंखा-एसी सारख्या उपकरणांना बंद ठेवणे, दिवसा उजेडासाठी खिडक्या उघड्या ठेवणे, निदान बाथरूम मधून आल्यावर बाथरूमचा दिवा बंद केला तरी भरपूर विजेची बचत होऊ शकते. येणाऱ्या वर्षात लाईट बिल वाचवण्याचा संकल्प करा. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर ५००० कोटी पेक्षा जास्त रुपयांची बचत होऊ शकते.
५. पुस्तक वाचणे
मेसेजेस आणि फॉरवर्ड्सच्या जमान्यात पुस्तक वाचणं मागे पडत चाललं आहे. पुस्तक वाचन ‘बोरिंग’ वाटू शकतं, पण त्याचे फायदेही आहेत. तुमची एकाग्रता वाढते, धावपळीतून ब्रेक मिळतो, आकलनशक्ती वाढते, भाषा सुधारते, स्मरणशक्ती वाढते आणि आणखी बरेच फायदे होतात.
एका अभ्यासानुसार तुम्ही जर कामाच्या वेळेतुन थोडा वेळ वाचनासाठी दिला तर तुमचा मेंदू फ्रेश राहतो. येणाऱ्या वर्षात कंटाळा न करता किमान १ तास वाचनाच निश्चय करा राव.
६. आरोग्याची काळजी
हल्ली शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा वाढतोय. गरजेपेक्षा जास्त काम, वेळेवर न जेवणे, अपुरी झोप, मोबाईलचं व्यसन, अशा कारणांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे सगळं टाळण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. दिवसातून कमीत कमी १ तास ‘मोबाईल फ्री’ वेळ घालवला तरी बराचसा ताण कमी होऊ शकतो. यासोबत शारीरिक स्वास्थ्य राखणंही तेवढंच गरजेचं आहे. येणाऱ्या वर्षात आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्याचा आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे.
दिवसभराच्या कामात मेंदूला ताजंतवानं ठेवण्यासाठी आमचा खालील लेख वाचायला विसरू नका :
रोजच्या व्यस्त जीवनात मेंदू फ्रेश ठेवण्यासाठी करा ही सोप्पी ट्रिक !!
७. सोशल मिडीयावरच्या अफवांना थारा न देणे
मंडळी येणारं वर्ष हे निवडणुकांच वर्ष असणार आहे. निवडणुकांच्या मोसमात अफवांना पिक येतं. तर्हेतर्हेचे मेसेजेस व्हायरल होत असतात. येणाऱ्या वर्षात आणि पुढील काळातही आपण असे मेसेजेस फॉरवर्ड करणार नाही असा संकल्प करू. फेक मेसेजेसचे काय परिणाम होतात हे यावर्षी पुन्हा एकदा दिसलं. व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या लहान मुलांच्या अपहरणाच्या व्हिडीओने २० पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला होता.
मंडळी, यासाठी बोभाटाचा सल्ला आहे की सोशल मिडीयावर येणारे मेसेजेस, बातम्यांची एकदा खात्री करून घेतली पाहिजे. बऱ्याचदा खोट्या बातमीवर क्लिक केल्याने तुमची खाजगी माहिती चोरली जाऊ शकते.
तर मंडळी, नवीन वर्षाच्या संकल्पाचे आम्ही काही पर्याय सुचवले आहेत. यात तुम्ही आणखी भर घाला. कमेंट मध्ये तुमच्या आयडिया सांगायला विसरू नका !!!