मुलाच्या गेममुळे वडिलांना कार का विकावी लागली? इंग्लंडच्या मुलाने काय पराक्रम केलाय?

लहान मुलांचा मोबाईलकडे आपसूक ओढा असतो. गेम्स, कार्टून अशा गोष्टींमुळे मुले मोबाईलचा जास्तीतजास्त वापर करतात. पालक पण कधी मुलांचे मनोरंजन व्हावे म्हणून, कधी मुलांनी 'डिस्टर्ब' करू नये म्हणून, तर कधी मुले टेक्नोसॅव्ही व्हावी म्हणून मुलांकडे मोबाईल देत असतात. पण हे महागात पडू शकते. यामागे अनेक कारणे आणि उदाहरणे देता येतील. नुकतेच इंग्लंडमध्ये एका पालकाला आपल्या मुलाच्या पराक्रमामुळे कार विकावी लागली आहे.
युकेतील नॉर्थ वेल्स येथे अयाज नावाचा ७ वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांच्या आयफोनमध्ये ड्रॅगन्स राईज ऑफ बर्क्स हा गेम खेळत होता. तुम्ही बघितले असेल की बऱ्याच गेम्समध्ये काही लेव्हल या फ्री असतात तर त्यापुढील लेव्हलसाठी किंवा नव्या फिचर्ससाठी पैसे मोजावे लागतात. या मूलाचे वडील मोहम्मद मुताजा यांनी तासाभरानंतर मोबाईल घेतला तर आपल्या लाडक्याने तब्बल १.३३ लाखाची खरेदी करून ठेवली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मोहम्मद यांना सुरुवातीला वाटले की आपण फसवले गेलो आहोत, पण जेव्हा त्यांनी हा व्यवहार कुठून आणि कसा झाला याचे इमेल्स बघितले तेव्हा त्यांची ट्यूब पेटली. त्यांनी मग याची तक्रार ऍपलकडे केली. ऍपलने त्यांना 21 हजारांचा रिफंड दिला. पण तरी उरलेली रक्कम ही मोठी होती. शेवटी नाईलाजाने या बिचाऱ्या बापाला आपली कार विकून पैसे भरावे लागले.
अशा आर्थिक व्यवहारांना पासवर्ड असतो. मोहम्मद यांना शंका आहे की आपल्या मुलाने कधीतरी आपल्याला पासवर्ड टाकताना बघितले असेल आणि तो पाठ करून ठेवला असेल. ज्यामुळे एका पाठोपाठ एक करत इतक्या मोठ्या रकमेचे गेम्सचे फिचर तो खरेदी करू शकला. पण असे असले तरी मोहम्मद आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.
त्यांचे म्हणणे आहे, की लहान मुलांसाठी असलेल्या फ्री गेम्सना एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार करण्याची परवानगी असता कामा नये. हा सगळा गेम कंपन्यांचा पैसे उकळण्यासाठीचा खेळ असतो. काहीही असले तरी ७ वर्षांच्या लहानग्याच्या छोट्या चुकीमुळे मात्र बापाला कार विकावी लागली आहे.
यानिमित्ताने पुन्हा लहान मुलांना मोबाईल देताना काळजी घ्यायला हवी हे अधोरेखित होते.