computer

७३व्या वर्षी २५०० किमीचा प्रवास सायकलवरून करणारे निवृत्त आयआयटी प्राध्यापक! या प्रवासाचं कारणही महत्त्वाचं आहे.

काही लोक प्रचंड उत्साही आणि ऊर्जावान असतात. या लोकांसाठी वय म्हणजे फक्त नंबर असतो. यांनी आयुष्यात जे मिळवायचे ते सगळे केलेले असते. पण काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणण्याचा ध्यास यांना काही स्वस्थ बसू देत नाही. आज आपण वाचणार आहोत डॉ. किरण सेठ यांच्याबद्दल! त्यांचं वय आहे ७३ वर्षे!! आयआयटीमधून प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेला माणूस!! देशासाठी दिलेल्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असे व्यक्तिमत्त्व.

त्यांनी एक संकल्प केला तब्बल २५०० किलोमीटरचा प्रवास करायचा, तोही सायकलने. इतका मोठा प्रवास सायकलने करणे म्हणजे सोपे काम नाही. पण डॉ. सेठ कामाला लागले. ११ मार्चला दिल्ली येथील महात्मा गांधींची समाधी राजघाट येथून त्यांनी हा प्रवास सुरू केला. नुकताच ५ तारखेला त्यांचा हा प्रवास पूर्ण झाला.

बरं, हा आगळावेगळा प्रयोग का केला, यामागील त्यांचे कारण समजून घेतले तर अभिमान वाटेल. देशातील लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी. तरुण मुलांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी ही यात्रा केली. या काळात त्यांनी देशभर फिरून विविध कॉलेज आणि इतर ठिकाणी जाऊन विद्यार्थी आणि लोकांशी संवाद साधला.

दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, उज्जैन या आणि अशा अनेक प्रमुख शहरांना त्यांनी या काळात भेटी दिल्या. डॉ. सेठ यावर थांबणार नाहीत. वर्षाच्या शेवटी महात्मा गांधींना आदरांजली म्हणून ते कश्मीर ते कन्याकुमारी अशी सायकलयात्रा करणार आहेत. एकूणात सतत कार्यमग्न राहणे हाच त्यांचा स्वभाव झालेला आहे.

डॉ. सेठ हे भारताला याआधी वेगळ्या कारणासाठी माहीत होते. त्यांनी आयआयटी दिल्ली येथे १९७७ साली spic macay या संस्थेची स्थापना केली होती. Society for the promotion of Indian classical music and culture among youth असा या संस्थेच्या नावाचा फुलफॉर्म आहे. म्हणजेच भारतातील तरुणांमधुर शास्त्रीय संगीत आणि भारतीय संगीत याबद्दल प्रेम वाढीस लागावे यासाठी ही संस्था काम करते.

जगात या संस्थेच्या ३०० पेक्षा अधिक शाखा आहेत. याचाच अर्थ डॉ सेठ आपले संपूर्ण आयुष्य आयआयटीत शिकवत असताना नव्या तंत्रज्ञानावर पकड असणारे तरुण तयार करताना, त्यांच्यात भारतीय संस्कृतीविषयी आदर निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नरत होते. याच कामाचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री मिळाला आहे.

पण वय झाले म्हणून किंवा निवृत्त झालो म्हणून थांबणे त्यांना पसंत नाही. जोवर जीवात जीव आहे तोवर काम करत राहावे हेच त्यांचे म्हणणे आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required