computer

सांगलीच्या मुलीने पंचकुला स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक! ती पुढच्या ऑलिंपिक्समध्येही जाऊ शकते!!

मराठी पाऊल पडते पुढे आणि मुलींची उंच भरारी हे एकाचवेळी म्हणता येणे हा योगायोग भन्नाट असतो. ही संधी महाराष्ट्राला पुन्हा एकदा मिळाली आहे. यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत सांगलीच्या अवघ्या १६ वर्षे वयाच्या काजल सरगरने सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला आहे.

काजलने केलेला हा पराक्रम महत्वाचा आहे. भारताला पुढच्या ऑलिम्पिकमध्ये अजून एका पदकाची अपेक्षा धरायला काहीही हरकत नाही. तसेच एका मराठी कुटुंबातील एका मुलीने घेतलेली ही झेप निश्चितच अभिमानास्पद म्हणावी अशी आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खेलो इंडिया स्पर्धा भरविण्यात आली होती. यंदा स्पर्धचे यजमान होते हरियाणा राज्य!! पंचकुला येथे या स्पर्धा पार पडल्या. पूर्ण स्पर्धेत पदकपालिकेत महाराष्ट्राने दबदबा राखत पहिला क्रमांक मिळवला आहे. काजलने वेटलिफ्टिंग या खेळात सहभाग घेतला होता. महिलांच्या ४० किलो वजनी गटात खेळणाऱ्या १६ वर्षांच्या काजलने तब्बल ११३ किलो वजन उचलत भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावली.

काजल सांगलीत राहाते. तिच्या वडिलांचा चहाचा स्टॉल आहे. अनेक घरांमध्ये दिसते त्याप्रमाणे काजल आपला भाऊ वजन उचलतो म्हणून प्रभावित झाली होती. तिचे खेळाबद्दलचे प्रेम बघून घरातून तिला कधी विरोध झाला नाही. तिचा मोठा भाऊ संकेत हा देखील वेटलिफ्टिंग याच खेळात राष्ट्रीय खेळाडू आहे, त्याने २०२१ कॉमनवेल्थ खेळामध्ये सहभाग घेतला होता.

काजल भावाची प्रॅक्टिस बघण्यासाठी त्याच्यासोबत लहानपणापासून जात असे. पण ती सांगते की आपण कधी भावासोबत खेळाबाबत विशेष चर्चा केली नाही. तिला आपण खेळाडू व्हावे असे वाटण्यासाठी विशेष घटना घडली. २०१९ खेलो इंडिया स्पर्धा पुण्यात भरवण्यात आल्या होत्या. यावेळी सांगलीच्याच असणाऱ्या रुपा हांगडी यांना सुवर्णपदक जिंकताना बघितले आणि आपण पण आता याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे या प्रेरणेने ती कामाला लागली.

काजलने हा प्रवास करताना कुठल्याही मोठ्या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतले नाही. सांगलीतील दिग्विजय इन्स्टिट्यूट येथे मयूर सिंहांसे यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे प्रशिक्षण पार पडले. ती सांगते की, 'आता ही कुठे सुरूवात आहे, आपल्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे.'

याआधी २०१९ साली येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले होते. पण लॉकडाऊन काळात तिच्या प्रशिक्षणावर देखील परिणाम झाला. असे असूनही मिळालेला वेळ कामी लावत तिने हा पराक्रम करून दाखवला आहे. तिच्या भावाचे डाएट आणि इतर गोष्टींमध्ये केलेले मार्गदर्शन देखील उपयोगाचे ठरले असेही ती सांगतो.

प्रशिक्षण आणि खेळाडूंसाठीचा योग्य आहार या गोष्टी सामान्य कुटूंबातील मुलांसाठी सोप्या नसतात. सांगलीतील कस्तुरबाई वालचंद कॉलेजमध्ये सायन्स शिकणारी काजल कॉलेज, प्रशिक्षण आणि वडिलांचा स्टॉल अशी सर्व कसरत करून इथंपर्यंत पोहोचली आहे. तिचे कौतुक करावे तितके कमीच आहे. आपल्या सांगलीच्या मुलीने घेतलेली ही झेप मोठीच आहे. भविष्यात थेट ऑलिम्पिक गाजवण्यासाठी तिला बोभाटाकडून शुभेच्छा...

सबस्क्राईब करा

* indicates required