अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्यापूर्वी हे जरूर वाचा !!!

आज अक्षय तृतीया आहे. हिंदू पंचांगाप्रमाणं महत्वाचे जे मूहूर्त आहेत त्यापैकी हा एक मूहूर्त. आजच्या दिवशी सोन्याची छोटी-मोठी  खरेदी हा एक ठरलेला अलिखित कार्यक्रम असतो. सोन्याच्या खरेदीची पारंपारिक कारणं अनेक असतील.  पण महत्वाचं सामाजिक कारण असं आहे की लगेच पुढच्या दोन महिन्यात अनेक लग्नसोहळे येतात. आजच्या काळात रुढी परंपरेचा मान म्हणून सोनं खरेदी करायला काहीच हरकत नाही पण बदलत्या आर्थिक युगात सोनं खरेदी कदाचित नुकसानीचा सौदा असू शकेल.

का ? विचारा तुम्ही, सांगतो आम्ही...

१ जुन्या काळात बँका नसायच्या. मग अचानक पैसे उभे करायचे झाले तर सोनं हे उत्तम माध्यम होतं. पैसे सुरक्षित जमा करून ठेवण्याचा हा सोपा मार्ग होता. आता तशी परिस्थिती राहिली नाहीय. त्यामुळं केवळ "अर्ध्या रात्री पैसे लागले तर " या भीतीपोटी सोनं खरेदी करणे निरर्थक आहे.

२ जागतिक बाजारात सोन्याचा भाव युद्ध आणि युद्धजन्य प्रसंगानं सतत वर-खाली होत असतो. उदाहरणार्थ सांगायचं तर, ओसामा बिन लादेनचा खातमा ज्या दिवशी झाला, त्या दिवसापासून सोने-चांदीचा भाव घसरत गेला. सध्या सिरीया आणि आसपासच्या प्रदेशात इसिसच्या धाकामुळे सोन्याचा भाव टिकून आहे. येत्या काही दिवसात इसिसचा नायनाट झाला की सोन्याचे भाव घसरतील.

३ कच्च्या तेलाचा भाव गेली काही वर्षे दबलेला आहे आणि आणखी काही वर्षे तो तसाच राहणार आहे. तेलाचे भाव कमी असले की डॉलरचे रुपयामधले भाव पण कमी असतील. म्हणून सोन्याचे भाव कडाडण्याची भीती आता किमान काही वर्षे तरी नाही.

४ तरीसुद्धा सोनं घेऊन ठेवावं असं वाटत असेल तर सोन्याऐवजी गोल्ड बाँड घ्यावेत. या बाँडला सार्वभौम सुरक्षा आहे. शेअर बाजारात हे बाँड कधीही विकता येतात. बाँडची मुदत संपल्यावर त्या वेळी जो एक ग्रॅम सोन्याचा भाव असेल त्या भावाने पैसे मिळतात. अशी सुरक्षित गुंतवणूकीची संधी उपलब्ध असताना सोनं घेऊन घरात किंवा लॉकरमध्ये ठेवण्यात काहीही अर्थ नाही.

५ सोनं खरेदी करणे आणि सोन्याचा दागिना खरेदी करणे यामध्ये घट-घडणावळ  याचा विचार केला, तर ज्या दिवशी खरेदी कराल त्याच दिवशी गुंतवणूकीची किंमत १० ते  १५ टक्के कमी झालेली असते.

६ आपल्या आर्थिक प्रगतीसोबत डॉलरचा भाव येत्या ७/८ वर्षात ५४ ते ५५ रुपये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे भाव येत्या काही वर्षात वाढणार नाहीत.

आता, तुम्हीच विचार करा पैसे सोन्यात गुंतवावे की नाही?

सबस्क्राईब करा

* indicates required