computer

बापाची संपत्ती सोडून चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या मुलाला आनंद महिंद्रा इंटर्नशीप का देत आहेत?

उद्योजक आनंद महिंद्रा हे ट्विटरवर चांगलेच ऍक्टिव्ह असतात. जिथे कुठे त्यांना मेहनती लोक दिसतात त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ते करताना दिसतात. मध्यंतरी कर्नाटकातील शेतकऱ्याने ट्री बाईक बनवली तेव्हा त्यांनी त्याची स्तुती केली होती. तसेच त्यांनी आम्ही मागे लिहिलेल्या इडलीवाल्या अम्माच्या बिजनेसमध्ये सुद्धा गुंतवणूक केली होती.

आता सध्या ते अश्याच एका 19 वर्षीय होतकरू तरुणासाठी पुढे आले आहेत. गुजरातचे बिझनेसमन राकेश ठक्कर यांचा मुलगा द्वारकेश ठक्कर अनेक दिवसांपासून बेपत्ता होता. आता तो शिमल्यात एका चहाच्या दुकानात काम करताना सापडला आहे. मंडळी, हा गडी स्वतःला सिद्ध करण्यासाठी बापाची श्रीमंती नाकारून घरातून पळून गेला होता. 

हा भाऊ गुजरातमध्ये इंजिनिअरिंग करत होता, पण त्याला त्यात रस नसल्याने आणि स्वतःचे काहीतरी वेगळे निर्माण करायचे असल्याने 14 ऑक्टोबर पासून बेपत्ता होता. त्याच्या घरचे, पोलीस अशा कुणाच्याच हाताला तो लागत नव्हता. पोलिसांनी त्याची फाईल बंद करण्याची पण तयार केली होती. त्त्यायाच काळात त्याने एका हॉटेल मॅनेजरकडे जॉबसाठी अर्ज केला होता. त्या मॅनेजरने त्याला ओळखले आणि पोलिसांना बोलवले. त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या कुटुंबाच्या हवाली केले. 

मंडळी, आता ही गोष्ट सोशल मीडियावर पसरली आणि आनंद महिंद्रांच्या कानावर गेली. त्याला त्या पोराचे कौतुक वाटले, त्यांनी त्याला थेट एका इंटर्नशिपची ऑफर दिली. एका ट्विटद्वारे त्यांनी ही माहिती दिली. मी या मुलात उद्याचा यशस्वी उद्योजक पाहतो अशा शब्दात त्यांनी त्याचे कौतुक केले. 

ही गोष्ट द्वारकेशला समजली तेव्हा तो अतिशय आनंदी झाला. 'माझे भविष्य मला कुठे घेऊन जाईल हे मला माहित नाही, पण ही इंटर्नशिप एक मोठी संधी आहे, आणि या संधीचे मी नक्कीच सोने करून दाखवेन.' ही गोष्ट जेव्हा राकेश ठक्कर यांना समजली तेव्हा त्यांना सुद्धा या गोष्टीचा आनंद झाला...

सबस्क्राईब करा

* indicates required