computer

३० वर्षांपासून केवळ १ रुपयात इडली आणि सांबर विकणाऱ्या आजीबाई !!

मंडळी, काही ठराविक दिवसांमध्ये स्वस्तात चालवली जाणारी हॉटेल्स तुम्ही बघितली असतील. पण एक आजीबाई फक्त १ रुपयात इडली आणि डोसा विकते ते ही गेल्या ३० वर्षांपासुन!!   थोडा सांबार किंवा चटणी एक्स्ट्रा   मागितली तरी बिल लावणारे लोक असताना एवढ्या स्वस्तात हॉटेल चालवणे म्हणजे मोठी गोष्ट आहे राव!!

तामिळनाडूमध्ये वेदीवलामपलयम नावाचं एक गाव आहे.  तिथे के. कमलाथल नावाच्या आजीबाई फक्त १ रुपयात इडली आणि सांबर विकतात. गेल्या ३० वर्षांपासून त्यांचे हे काम सुरू आहे.

या आजी आधी एकत्र कुटुंबात राहायच्या. साहजिकच त्यांना जास्त लोकांचा स्वयंपाक करण्याची सवय होती. त्यामुळे रोज सकाळी उठून इडली सांबर बनवणे आणि ते विकणे हाच त्यांचा दिनक्रम आहे. 

कमलाथल या खूप मेहनती आहेत. त्यांचे ग्राहक तर सांगतात की फक्त १ रुपयात मिळते म्हणून नाही पण जर इतरांपेक्षा महाग विकली असती तरी आम्ही त्यांच्याकडून इडली घेतली असती. कारण त्या उत्तम सुगरण आहेत आणि अर्थातच त्यांच्या हातच्या इडलीची चव पण भारी आहे. 

१० वर्षांपूर्वी त्यांच्या इडलीची किंमत फक्त ५० पैसे होती.  नंतर ती वाढवून १ रुपया केली गेली. इतक्या कमी किंमतीत रोजच्या रोज हजार इडल्या त्या विकतात. इडलीची किंमत कमी ठेवण्याचे कारण त्या सांगतात की त्या परिसरातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. म्हणून पैसे नाहीत म्हणून कुणी उपाशी राहिले असे घडू नये म्हणून त्यांनी इडलीची किंमत कमी ठेवली आहे.  त्यांचा हॉटेल चालवण्याचा हेतू पैसे कमावणे हा नाही राव!! तरी दिवसभरात त्यांची चांगलीच कमाई होते. त्यांना अनेकांनी इडलीची किंमत वाढवायची विनंती केली, पण त्यांनी ती ऐकली नाही. 

मंडळी, समाजात असे परोपकारी लोक खूप कमी आढळतात. कमलाथाल करत असलेले काम खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्यासारख्या लोकांची आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे.

 

लेखक : वैभव पाटील.

सबस्क्राईब करा

* indicates required