झाडावरची सगळी फळं स्वतःच खायची नसतात...

विनोबाजी म्हणत,
माझी भाकरी मी खायची, तुझी तू
ही प्रकृती.
माझी भाकरी मी खायची, शिवाय तुझी हिरावून घ्यायची
ही विकृती.
आणि तुझी भूक जास्त म्हणून
माझी अर्धी भाकरी मी तुला द्यायची
ही संस्कृती.
या व्याख्येत आपण कुठे बसतो ?
जागतिकीकरण म्हणजे स्पर्धेचा जमाना
सर्वात जास्त लायक तोच तगेल
सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट !
पण आपण सगळेच
कुठल्या ना कुठल्या बाबतीत
अनफिट असतो.
म्हणून काय -
मी-मला-माझ्यापुरता
याच्यापलीकडेच समाज असतो.
वेड्या-मागासलेल्या भावाला
काठावर पास होणाऱ्याला
कशीबशी नोकरी करणाऱ्याला
आपल्यातच सामावून घ्यायचं असतं.
चपळाईने गाडीत चढणाऱ्याने
इतरांसाठी कधी कधी
विंडोसीट सोडायची असते.
आजी-आजोबांना रस्ता
ओलांडता यावा म्हणून
मोटारवाल्याने थांबायचं असतं.
झाडावरची सगळी फळं
स्वतःच खायची नसतात...
काही थोडी पक्ष्यांसाठीही
मागे सोडायची असतात.
सौजन्य : श्री. भानू काळे,
संपादक - अंतर्नाद