निग्रोऐवजी आफ्रिकन-अमेरिकन हा शब्द जगाला देणारा, मानवी हक्क चळवळीचा समर्थक: माल्कम एक्स! वाढत्या लोकप्रियतेनेच याचा घात केला!!
सिव्हील राईट्स मूव्हमेंट म्हणजेच मानवी हक्क चळवळ हा शब्द तुमच्या कधीतरी कानावर पडला असेल. वंशभेद, तसंच कृष्णवर्णीय आणि बिगर श्वेतवर्णीय यांच्यावर होणारा अन्याय यांच्या विरोधात अमेरिकेत ही चळवळ उभी राहिली. काळ्यांना गोऱ्यांच्या बरोबरीने अधिकार असावेत ही चळवळकर्त्यांची मागणी होती. या चळवळकर्त्यांमध्ये एक नाव आघाडीवर होतं : माल्कम एक्स. हा सिव्हील राईट्स चळवळीचा खंदा समर्थक आणि आफ्रिकन अमेरिकन राष्ट्रवादी नेता होता. वयाच्या अवघ्या एकोणचाळिसाव्या वर्षी त्याची हत्या झाली.
माल्कमचा जन्म अमेरिकेतल्या नब्रास्का इथला. त्याचे वडील बाप्टिस्ट धर्मोपदेशक होते आणि मार्कस गारवी या कृष्णवर्णीय नेत्याचे समर्थक होते. त्याबद्दल त्यांना
अनेकदा धमक्याही मिळाल्या होत्या, पण ते बधले नाहीत. पुढे माल्कम सहा वर्षांचा असताना एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात होता की जाणूनबुजून घडवलेला घातपात, हे शेवटपर्यंत समोर आलं नाही. माल्कम शाळेत जाण्याच्या वयाचा झाला. कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची होती, तरी त्याने शिक्षण सुरू ठेवलं. मात्र आठवीत असताना एका शिक्षकांनी त्याला, "तू वकील होण्यापॆक्षा सुतारकाम कर" असा सल्ला दिला आणि झालं! त्याचा शाळेतला रस संपला. त्यानंतर लवकरच त्याने शाळा सोडली. त्यानंतर त्याने एक वेगळीच वाट धरली- गुन्हेगारीची.
१९४६ मध्ये तो २१ वर्षांचा असताना त्याला चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आलं. तिथे एलिजाह मोहम्मद नावाच्या मुस्लिम नेत्याच्या तो संपर्कात आला. त्यावेळी या मोहम्मदची नेशन ऑफ इस्लाम नावाची संघटना होती. मोहम्मद कृष्णवर्णीयांच्या राष्ट्रवादाचा प्रसार करत असे. युरोपियन, अमेरिकन असे गोरे लोक त्याचे शत्रू होते. मोहम्मदच्या शिकवणुकीचा माल्कमवर सखोल परिणाम झाला. त्याच दरम्यान तुरुंगात त्याला त्याचा भाऊ भेटायला यायचा. त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता. तोही नेशन ऑफ इस्लामचा सदस्य होता. या सगळ्यातून कृष्णवर्णीयांसाठी आपण काहीतरी करायला हवं हे माल्कमच्या मनाने घेतलं. त्यासाठी त्याने आधी स्वतःच स्वतःला शिक्षित करायचं ठरवलं. जोडीला आपल्या नावाच्या पुढे एक्स हे अक्षर जोडलं. त्याच्या हरवलेल्या आफ्रिकन अस्मितेचं प्रतीक म्हणजे हा एक्स.
त्याची तुरुंगातून सुटका झाली, तेव्हा तो नेशन ऑफ इस्लामचा एकनिष्ठ सदस्य बनला होता आणि न्यूयॉर्कजवळच्या हार्लेम इथून संघटनेचं काम करत होता. पण त्याची विचारसरणी आणि काम करण्याची पद्धत वेगळी होती. 'स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आणि आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी- आफ्रिकन अमेरिकनांची मुक्तता करण्यासाठी- कोणत्याही, अगदी कोणत्याही, मार्गाचा वापर करायला हरकत नाही' असं त्याचं मत होतं. त्यानेच सर्वप्रथम 'निग्रो' आणि 'कलर्ड' या शब्दांऐवजी कृष्णवर्णीय आणि आफ्रिकन-अमेरिकन हे पर्यायी शब्द वापरायला सुरुवात केली.
१९६० च्या सुमारास त्याने आपल्या गुरूलाही मागे टाकलं. त्यामुळे माल्कम आणि मोहम्मद यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला. संघटनेला राजकीयदृष्ट्या कोणती दिशा द्यायची या मुद्द्यावर त्यांच्यात मतभेद होते. माल्कमच्या मते नेशन ऑफ इस्लामने मानवाधिकार चळवळीच्या माध्यमातून अधिक जोरदार आंदोलन छेडायला हवं होतं. तुलनेने एलिजाह मोहंमदचे प्रयत्न फारसे तीव्र नाहीत असं त्याला वाटत होतं. शिवाय स्वतः मोहम्मद नेशन ऑफ इस्लामच्या नैतिक आचारसंहितेचा भंग करत होता. यामुळे माल्कम नाराज होता. मोहम्मदचे आपल्या सहा सेक्रेटरी महिलांपैकी सहाजणींशी संबंध होते आणि त्यातून त्याला मुलंही झाली होती. त्यापैकी दोन मुलांनी पॅटर्निटी स्यूट फाईल केले आणि हा मुद्दा सार्वजनिक केला. ही गोष्ट कळल्यावर तर माल्कमला चांगलाच धक्का बसला होता. दुसरीकडे माल्कमची पॉवर वाढत चालली आहे हे मोहम्मदच्या लक्षात येऊ लागलं होतं. तो अस्वस्थ झाला होता. माल्कमला संघटनेतून बाहेर काढण्यासाठी त्याला आता फक्त एक संधी हवी होती.
त्याचदरम्यान केनेडींची हत्या झाली. त्यावेळी माल्कम बोलून गेला, " ही हत्या म्हणजे chickens coming home to roost चं उदाहरण आहे.'' या वाक्याचा अर्थ हा, की हिंसेचं उत्तर म्हणून हिंसाच होणार. या बोलण्याने तो चांगलाच अडचणीत आला. लोक खवळले. मोहम्मदनेही त्याला समज दिली. त्याने तिथून पुढे ९० दिवस शांत राहावं अशी सूचना दिली. अशा लहानलहान गोष्टींमधून त्यांच्यातला संघर्ष वाढत गेला, आणि अखेर माल्कमने स्वतःच नेशन ऑफ इस्लाम सोडली.
नंतर त्याने मक्केची यात्रा केली. पण तिथल्या परंपरावादी, कर्मठ मुस्लीमांमध्ये ना बंधुभाव होता, ना स्वतःच्या वंशाबद्दल अभिमान. याचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. तो अमेरिकेला परतला आणि तिथे त्याने आफ्रिकन अमेरिकन लोकांची संघटना स्थापन केली. मुख्यतः आफ्रिकन अस्मितेचा पुरस्कार करणं आणि आफ्रिकन लोकांचा मोठा शत्रू गोरे लोक नाहीत तर वंशवाद आहे हे सिद्ध करणं, या दोन गोष्टींवर त्याने भर दिला. त्याच्या संघटनेने हळूहळू बाळसं धरलं. त्याला अनेक अनुयायी येऊन मिळाले. त्याचं तत्त्वज्ञान सिव्हील राईट चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होऊ लागलं. मात्र या लोकप्रियतेनेच त्याचा घात केला.
२१ फेब्रुवारी १९६५ या दिवशी आओडोबॉन बॉलरूमच्या स्टेजवर माल्कमवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याची गरोदर बायको आणि चार मुली होत्या. मुजाहिद अब्दुल हलीम, मोहम्मद अजीज, आणि खलील इस्लाम या नेशन ऑफ इस्लामच्या तीन कार्यकर्त्यांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला. या सर्वांना दोषी ठरवून वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
माल्कमच्या विचारांनी आणि भाषणांनी कृष्णवर्णीयांचा राष्ट्रवाद आणि ब्लॅक पॉवर चळवळ यांच्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असंख्य माहितीपट, पुस्तकं आणि चित्रपट यांद्वारे माल्कम एक्सचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे सरकला आहे. १९९२ मध्ये आलेला ऑस्कर नामांकन मिळालेला माल्कम एक्स हा चित्रपट याचंच उदाहरण.
स्वतः माल्कम एक्स न्यूयॉर्कच्या हार्ट्सडेल येथील फर्नक्लिफ स्मशानभूमीत चिरविश्रांती घेत आहे.
स्मिता जोगळेकर




