आयपीएल सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा धक्का! २ कोटी खर्च करून घेतलेल्या खेळाडूची स्पर्धेतून माघार

इंग्लंड संघाचा दिग्गज फलंदाज जेसन रॉयने आयपीएल २०२२ स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आयपीएल स्पर्धेत तो हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार होता. जेसन रॉयला दीर्घ काळ बायो बबलमध्ये राहणे टाळायचे आहे, त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

जेसन रॉयला आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात २ कोटींच्या मूळ किमतीत खरेदी करण्यात आले होते. परंतु त्याने आता स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नक्कीच गुजरात टायटन्स संघाच्या चिंतेत वाढ झाली असेल. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, जेसन रॉयने गुजरात टायटन्स फ्रँचायजीला याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान जेसन रॉय ऐवजी कुठल्या खेळाडूला ते आपल्या संघात स्थान देणार याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाहीये.

नुकताच पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत जेसन रॉयने विस्फोटक फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याला या स्पर्धेत अवघे ६ सामने खेळण्याची संधी मिळाली परंतु या संधीचा पुरेपूर लाभ घेत, त्याने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले होते. 

जेसन रॉयच्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने क्वेटा ग्लॅडीएटर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ५०.५० च्या सरासरीने ३०३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २ अर्धशतक तर १ शतक झळकावले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required