१८ वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये राहिल्या, भारतात परतल्यावर १५ दिवसांत मृत्यू...कोण होत्या हसीना बेगम??

पाकिस्तानच्या जेलमध्ये गेलेला भारतीय माणूस परतणे मोठे कठीण काम असते. अनेकांचे भारतात परतण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही, तर जे परत येतात ते भरभरून जगण्याचा आनंद घेतात. पण एक आजीबाई मात्र या सगळ्याला अपवाद ठरल्या आहेत.
तब्बल १८ वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये राहून परत आलेल्या हसीना बेगम या ६५ वर्षीय आजीबाईचे भारतात आल्याच्या अवघ्या १५ दिवसांत निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे.
मुळच्या औरंगाबादच्या असलेल्या हसीना बेगम यांचे लग्न दिलशाद अहमद यांच्यासोबत झाले होते. १८ वर्षांपूर्वी त्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी लाहोरला गेल्या होत्या. पण तिथे त्यांचं सामान हरवलं. सामानात ठेवलेला पासपोर्ट पण हरवल्याने त्यांना ओळख सांगता येत नव्हती. त्यांना मग तेथील पोलिसांनी तुरुंगात टाकले.
या घटनेला १८ वर्ष उलटल्यावर औरंगाबाद पोलिसांनी हसीना बेगम यांची सर्व माहिती दिल्यावर गेल्याच महिन्यात त्यांची सुटका करण्यात आली होती. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्या भारतात परतल्या होत्या. भारतात परतल्यावर त्यांना झालेला आनंद मावत नव्हता.
'देशात परत आल्यावर मला शांतीची अनुभूती येत आहे. असे वाटत आहे जणू मी स्वर्गात आहे. मला पाकिस्तानात जबरदस्ती कैद करण्यात आले होते.' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. पण हा आनंद त्यांना जास्त दिवस घेता आला नाही. आपल्या कुटुंबासोबत जेमतेम १५ दिवस घालवले असतील आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे.